Home Blog Page 4

परळी : १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; २७ वर्षीय तरुणाला अटक

0

परळी — खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आडबाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून परळी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश भरत नागरगोजे (वय २७, रा. जिरेवाडी) असे आहे.

खेळण्यासाठी गेली, मात्र घरी परतलीच नाही

मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पीडित मुलगी गावातील मारुती मंदिर परिसरात खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

कुटुंबीयांनी मंदिर परिसरासह गावात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, काही वेळ ती आढळून आली नाही.

घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली

दरम्यान, काही वेळानंतर मुलगी घरी परतली. ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर तिने आरोपी आकाश नागरगोजे याने खेळत असताना फूस लावून तिला एका आडबाजूच्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने परळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा; आरोपी अटकेत

तक्रारीच्या आधारे परळी पोलिसांनी आकाश नागरगोजे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करत आरोपीला तातडीने अटक केली आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास परळी पोलीस करत असून, तपासातील निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

0

मराठवाड्याबरोबरच विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासाठी देखील मुंडेंची मागणी

मुंबई — बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 17 सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत लवकरात लवकर मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना व शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने तीव्र ताण दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप हंगामात मराठवाड्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे पेरलेली सर्व खरीप पिके करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

त्याचबरोबर विहिरी आणि तलावांतील जलस्रोत कोरडे पडल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करणार आहे, यावरही तातडीने उपाययोजना करणे व वेळीच योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच औचित्यावर किंवा तत्सम वेळेत लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन मराठवाड्यासाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशीही विनंती मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

मराठवाड्यातील संकटाच्या काळात नेहमीच राज्य सरकारने पुढाकार घेऊन मदत केलेली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आधीही अनेकदा मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने मराठवाड्यात ही विशेष मंत्रिमंडळ बैठक आयोजित करून कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती देणे, खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई, रब्बी हंगामाचे नियोजन, तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असेही श्री मुंडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाअभावी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह या भागांसाठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठका घेऊन तातडीने निर्णय घेण्यात यावेत, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी पत्रात केली आहे.

शिरूरमध्ये पाणबुडी मोटार चोरीचा छडा; चार आरोपी निष्पन्न, चोरीचा मुद्देमाल जप्त

0

बीड — शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तागडगाव परिसरात पाणबुडी मोटार चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी समांतर तपास करत दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला आहे. तपासादरम्यान एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून चोरीला गेलेल्या पाणबुडी मोटारी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. १९८/२०२६, कलम ३०३ (२) बी.एन.एस. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींची माहिती मिळवली.

या तपासात योगेश गोरख पोकळे (वय ३६), राजेश रंगनाथ तांबारे (वय २२) आणि सलिम बानूभाई शेख (वय ३०), तिघेही रा. तागडगाव, ता. शिरूर, जि. बीड, यांचा पाणबुडी मोटार चोरीच्या घटनेत सहभाग निष्पन्न झाला.

तपासात चोरी केलेल्या पाणबुडी मोटारी भरत रामभाऊ पवार (वय ३८, रा. तागडगाव) याला विकण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. २०१/२०२६, कलम ३०३ (२) बी.एन.एस. या आणखी एका पाणबुडी मोटार चोरीच्या गुन्ह्यातही याच चार आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) बी.एन.एस. अन्वये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

पोलिसांच्या पथकाचे कामगिरी

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर  आणि आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. शेखर औटे, पोलीस हवालदार अशोक दुबाले, आनंद मस्के, सोमनाथ गायकवाड, बालासाहेब सानप, पोलीस अंमलदार अश्विनकुमार सुरवसे आणि चालक पोलीस शिपाई सिद्धार्थ मांजरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तुमसे ना हो पायेगा’; बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

बीडबीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीज मिळावी, जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवावा आणि जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ‘तुमसे ना हो पायेगा’ या घोषवाक्याखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला.

बीड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत शिवसेनेने तातडीने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकरी अडचणीत असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या आंदोलनात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव, मुजीब भाई शेख, मराठवाडा पदवीधर समन्वयक दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, गणेश वरेकर, माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे, कुंडलिक खांडे, महिला आघाडीच्या मीराताई नवले, गोरख शिंगण, नवनाथ प्रभाळे, संजय महाद्वार यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनाला संबोधित करताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “१७ सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला. जुने रजाकार गेले आणि आता हे नवीन रजाकार सत्तेत आले आहेत,” अशी टीका त्यांनी केली. बीड जिल्ह्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या ३७-३८ घोषणांचे पुढे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कंकालेश्वर, राक्षसभुवन आणि परळी वैजनाथ देवस्थानच्या विकासकामांकडे लक्ष वेधत दानवे यांनी जिल्ह्यातील पाणीप्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. बीडमध्ये काही भागात १५ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याचा दावा करत जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. “हे सरकार जनतेचे नसून टक्केवारीचे सरकार आहे,” असा आरोपही दानवे यांनी केला.

आमदार कैलास पाटील यांनीही वीजप्रश्नावरून सरकार आणि महावितरणवर निशाणा साधला. “हे सॅटेलाइट सरकार आहे. बीड जिल्ह्यात एका तरी गावाला सलग आठ तास वीज देऊन दाखवावी. तसे झाल्यास संबंधित अभियंत्यांचा सत्कार करू,” असे आव्हान त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना पुरेशी आणि नियमित वीज मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतरच सरकारला जाग येणार का, असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला. जनतेने सरकारला जाब विचारला नाही तर परिस्थिती बदलणार नाही, असे सांगत यापुढे ‘शिवसेना स्टाईल’ने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी केला. शिवसेनेने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर कस्तुरबा गांधी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जलजीवन मिशनच्या कामांमध्ये बोगस पद्धतीने निधी उचलल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

बीड जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, शेतकऱ्यांना नियमित वीज द्यावी आणि बीड शहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

सरकारने मागण्या मान्य करून बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

रक्ताचा थेंब पडला तरी महाराष्ट्र बंद’; जरांगे पाटलांचा इशारा, 12 सप्टेंबरला अंतरवालीत निर्णायक बैठक

0

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी येताना एखाद्या आंदोलकावर हल्ला झाला आणि त्याच्या अंगावर रक्ताचा एक थेंबही पडला, तर अवघ्या 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

रक्ताचा एक थेंब पडला तरी 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद करा

सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीत मोठी बैठक घेण्यात येणार आहे.

पुणे, नगर, नाशिक तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजाने हातातील कामे बाजूला ठेवून या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कितीही त्रास दिला तरी मराठा समाजाने पोलिसांना त्रास देऊ नये, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, बैठकीसाठी येताना एखाद्या आंदोलकावर हल्ला झाला आणि डोक्यातून रक्ताचा थेंब जरी निघाला, तरी 10 मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाचे नियोजन करण्यासाठीच अंतरवालीत बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकडे निघाल्यानंतर आंदोलकांना अडवण्याचे सरकारचे नियोजन असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांची चूक नसेल तर या संपूर्ण प्रकाराला सरकारमधील नेतृत्व जबाबदार असेल, असा दावा त्यांनी केला.

भाजपलाही जरांगेंचे थेट आव्हान

मराठा समाजासाठी शरद पवार आणि काँग्रेसने काय केले, असा सवाल भाजपकडून केला जात असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी भाजपलाही प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही आधी मराठा समाजासाठी काय केले, हे स्पष्ट करा,’ असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

आता 12 सप्टेंबरच्या अंतरवाली बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा आणि मुंबई आंदोलनाचे नियोजन निश्चित होणार असल्याने या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे; 10 ते 17 सप्टेंबरला मोहीम

0

छत्रपती संभाजीनगर — मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील पात्र नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील मंडळ स्तरावर ही विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी दूर करून प्रलंबित प्रकरणांना गती देण्यावर या मोहिमेत भर राहणार आहे.

प्रलंबित प्रकरणांचा होणार आढावा

जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी, अर्ज प्रक्रिया, पडताळणी तसेच विविध कार्यालयांमधील समन्वयाअभावी अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. विशेष शिबिरांमध्ये अशा प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र अर्जदारांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

या मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रलंबित अर्ज, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल.

तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात पडताळणी समिती यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दररोज तक्रारींचा आढावा

जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीशी संबंधित तक्रारींचा नोडल अधिकाऱ्यांनी दररोज आढावा घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रलंबित प्रकरणांचा अहवाल दर सोमवारी संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत.

शिबिराची माहिती नागरिकांना मिळणार

मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिराची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी ग्रामपंचायत, नोटीस बोर्ड तसेच स्थानिक माध्यमांमधून प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील पात्र नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळातील शिबिराची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

10 ते 17 सप्टेंबरदरम्यान होणारी ही मंडळ स्तरावरील विशेष शिबिरे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

साखर गाळप हंगाम ऑक्टोबर की नोव्हेंबर? बुधवारी फैसला

0

मुंबई — साखरेच्या तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या दराने ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत उसळी घेतल्यानंतर आता यंदाचा साखर गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी दसरा आणि दिवाळीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा केंद्राचा आग्रह आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास उसाचे वजन आणि साखर उतारा घटून शेतकरी व कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी साखर हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी नेमकी कधी पेटणार, म्हणजेच गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करायचा की नोव्हेंबरमध्ये, याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

साखरेचे दर ७५ वरून ५५ रुपयांवर

ऑगस्टमध्ये साखरेचा किरकोळ दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे साखरेचे दर आता ५० ते ५५ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता बाजारात नवीन साखर लवकर उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.

त्यामुळे ऑक्टोबरपासून साखर गाळप सुरू करून दसरा-दिवाळीपूर्वी बाजारात नवीन साखर उपलब्ध करण्याचा केंद्राचा आग्रह आहे.

पावसाच्या तुटीमुळे उसाची वाढ खुंटली

दुसरीकडे, यंदा राज्यात मोसमी पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास साखर उतारा आणि उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता आहे.

कारखानदारांच्या मते, ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास साखर उतारा १ ते १.५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे कारखान्यांना प्रति टन सुमारे ४५० ते ५०० रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

याशिवाय उसाची पुरेशी वाढ न झाल्याने वजनात १० ते १२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ३०० ते ३५० रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर साखर गाळप हंगाम नोव्हेंबरपासून सुरू करावा, अशी भूमिका साखर कारखानदारांनी घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू केल्यास उसाला आणखी वाढीसाठी वेळ मिळेल आणि साखर उतारा व उसाचे वजन टिकून राहण्यास मदत होईल, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. कारखान्यांना प्रति टन ४५० ते ५०० रुपये, तर शेतकऱ्यांना प्रति टन ३०० ते ३५० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष

केंद्राचा ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू करण्याचा आग्रह आणि राज्यातील साखर कारखानदारांची नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी, यामुळे सरकारसमोर निर्णयाचे आव्हान निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार असून, राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

अंतरवाली सराटीत जरांगे आंदोलनाच्या छायेत ओबीसींचे प्रतिआंदोलन; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला इशारा

0

जालना —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता त्याच ठिकाणी ओबीसी समाजानेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. अंतरवालीतील सोनिया नगर येथे अॅड. मंगेश ससाणे, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे यांच्यासह सहकाऱ्यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली.

ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण आणि संविधानिक आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे अॅड. मंगेश ससाणे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारवर दबाव टाकला जात आहे

अॅड. ससाणे म्हणाले की, मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख दाखले देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी टीका केली. ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, सरकारच्या या भूमिकेविरोधात ओबीसी समाजाची भूमिका तीव्र राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका समाजाला स्पेशल ट्रीटमेंट का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ससाणे यांनी निशाणा साधला. एका समाजाला सरकारकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एका व्यक्तीच्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला जात असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘मागेल त्याला कुणबी दाखला देणार’ या कथित वक्तव्याचा संदर्भ देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या संविधानिक आणि लोकशाही मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनस्थळाजवळच प्रतिआंदोलन; वातावरण तापण्याची शक्यता

अंतरवाली सराटीतून ये-जा करणाऱ्या मंत्र्यांवरही ससाणे यांनी टीका केली. सरकारला इशारा देताना त्यांनी मंत्र्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, असे म्हटले.

दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील पात्र व्यक्तींना सरकारी नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळापासून काही अंतरावरच ओबीसी समाजाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे अंतरवाली सराटीतील आरक्षणाचा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारसमोर मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी ताब्यात!

0

बीड — पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तरुणीवर अत्याचार केल्याचा आणि या घटनेचे फोटो-व्हिडीओ मोबाईलमध्ये ठेवून त्याचा आधार घेत वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मकसूद कॉलनी परिसरातील एका तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शिक्षणासाठी बीडमध्ये क्लासेसला जात असताना आरोपी शेख मुस्सवीर शेख वसीम (रा. मकसूद कॉलनी, हिना पेट्रोल पंपामागे) हा तिचा बारावीपासून पाठलाग करत होता. तो प्रेम आणि लग्नाची मागणी घालत होता. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला होता.

९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पीडितेचे आई-वडील घरी नसताना आरोपी तिच्या घरी गेला. त्याने स्वतःजवळील बाटलीतील पाणी तिला पिण्यास दिले. पाणी प्यायल्यानंतर डोके जड होऊन चक्कर येत असल्याचे जाणवताच आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ त्याने मोबाईलमध्ये जतन केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

यानंतर ८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीने चारचाकी वाहनातून बाहेर घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडितेला सोबत घेतले. मांजरसुंबा परिसरातील एका लॉजवर नेल्यानंतर पुन्हा तिला पाणी देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मोबाईलमध्ये ठेवलेल्या अश्लील फोटो आणि व्हिडीओचा वापर करून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. शनिवारी, दि. ५ रोजी चित्रपटगृहात येण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात आला आणि शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शेख मुस्सवीर शेख वसीम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ६४(२)(i), ६४(२)(m), ७५(२), ७८, १२३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास ज्ञानेश्वर धोत्रे करीत आहेत.

नांदूरघाट ग्रामपंचायतीत १.०३ कोटींचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा

0

केज — तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या विकासकामांमध्ये तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासकीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशी समितीने पाच जणांना जबाबदार धरत त्यांच्या वाट्याची रक्कम निश्चित केली होती. त्यानंतर तिघांनी रक्कम शासकीय खात्यात जमा केली; मात्र ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपये न भरल्याने ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूरघाट ग्रामपंचायतीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने विशेष चौकशी समिती नियुक्त केली होती.

समितीने ग्रामपंचायतीचे कागदपत्रे, आर्थिक व्यवहार तसेच प्रत्यक्ष विकासकामांची तपासणी केली. या तपासणीत १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. चौकशीअंती सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शाखा अभियंता आणि तांत्रिक अधिकारी अशा पाच जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.

आठ दिवसांची मुदत; तिघांनी भरली रक्कम

प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्या वाट्याची रक्कम आठ दिवसांत शासकीय खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.

या कारवाईनंतर सरपंच सुनीता युवराज जाधव यांनी ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांनी ८ लाख ७ हजार ५९९ रुपये, तर शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे यांनी ४ लाख १५ हजार १५३ रुपये जमा केले.

या तिघांनी मिळून ४५ लाख ३७ हजार ८९९ रुपये नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या मग्रारोहयो बँक खात्यात जमा केले.

५८.५१ लाखांचा भरणा न झाल्याने पोलिसांत धाव

दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी भगवान यादव सिरसट यांच्या वाट्याची २५ लाख ३६ हजार ४३४ रुपये, तर ग्रामरोजगार सहाय्यक सादेक दिलावर शेख यांच्या वाट्याची ३३ लाख १५ हजार १४७ रुपये रक्कम मुदत संपूनही जमा झाली नाही.

दोघांकडून एकूण ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपये वसूल न झाल्याने अखेर प्रशासनाने फौजदारी कारवाईचा मार्ग स्वीकारला.

केज पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विजयकुमार रामभाऊ मस्के यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भगवान यादव सिरसट आणि सादेक दिलावर शेख यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या कामांमध्ये झालेल्या या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उर्वरित रकमेच्या वसुलीसह पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.