बीड — जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती येथील युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्यात आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा कट उघडकीस आणला असून मृताच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी सोबत असलेल्या प्रेम संबंधातून हे हत्या प्रकरण घडले असल्याचे निदर्शनास आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवती येथील किरण बंडू सोनवणे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी लिंबागणेश-अंजनवती मार्गावरील गणेश माळ परिसरात आढळून आला होता. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल, तांत्रिक तपास आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे किरण सोनवणे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तपासाची दिशा बदलत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तळोजा-पनवेल परिसरातून दशरथ परदेशी आणि धीरज येडे या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मृताची पत्नी प्रियांका सोनवणे (वय २५, रा. अंजनवती) हिचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले.
प्रेमसंबंधातून पतीच्या खुनाचा कट?
प्राथमिक तपासात प्रियांका सोनवणे हिचे मुख्य आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संबंधातून पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कटात सक्रिय सहकार्य केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी प्रियांका सोनवणे हिला अटक केली.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींसह महिला आरोपीच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाने तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्यामागील नेमके कारण, कटातील इतर संभाव्य सहभागी, तसेच पुराव्यांची साखळी मजबूत करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट
सोमवारी (दि. ८) सायंकाळी केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी नेकनूर पोलीस ठाण्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला. त्यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

