Home जिल्हा पांगरी-तळेगाव वीजवाद; परळी — बीड महामार्गावर रास्ता रोको, ३ खांब तोडले

पांगरी-तळेगाव वीजवाद; परळी — बीड महामार्गावर रास्ता रोको, ३ खांब तोडले

0
11

परळी —  पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधून होणाऱ्या वीजपुरवठ्यावरून पांगरी आणि तळेगाव या दोन गावांमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्रपणे रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली. दरम्यान, महावितरणच्या पाहणीत तळेगावच्या ११ केव्ही वीजवाहिनीचे तीन खांब हातोड्याच्या साहाय्याने तोडल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तळेगावचा वीजपुरवठा पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधून स्वतंत्र फिटरद्वारे केला जातो. मात्र, रविवारी सकाळी या फिटरच्या तारा काढण्यात आल्याने तसेच विद्युत खांब तोडण्यात आल्याने गावचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप तळेगाव ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून वीज नसल्याने शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या प्रकाराच्या निषेधार्थ तळेगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. स्वतःच्या गावातील शेतीसाठी वीज मिळावी, यासाठी पांगरीतील काही व्यक्तींनी तळेगावचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप तळेगावच्या सरपंचांनी केला. याप्रकरणी महावितरण तसेच परळी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, पांगरी (गोपीनाथ गड) येथील ३३ केव्ही सबस्टेशन १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बंद असल्याने पांगरीसह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळातच ३३ केव्ही वीजवाहिनीवर मुद्दाम फॉल्ट करण्यात आल्याचा आरोप पांगरी ग्रामस्थांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत महामार्गावर रस्ता रोको केला. वीजवाहिनीमध्ये बिघाड करणाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोन्ही गावांच्या आंदोलनामुळे परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परळी ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके आणि पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे यांच्यासह १५ पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

दरम्यान, महावितरणच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पांगरी येथील काही व्यक्तींनी हातोड्याच्या साहाय्याने तळेगाव गावठाणाच्या ११ केव्ही वीजवाहिनीचे तीन खांब तोडल्याचे पाहणीत निष्पन्न झाल्याची माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विशाल खंडारे यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, पुढील कारवाईकडे दोन्ही गावांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here