बीड — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील अनेक नेत्यांनी केले होते. मुंबई पोलिसांनीही कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा आणि न्यायालयीन निर्देशांचा दाखला देत जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, आता जरांगे यांनीच आंदोलनाची दिशा बदलत सरकारसमोर नवा प्रश्न उभा केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी ते दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्याचवेळी त्यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे न येता आपापल्या ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.
‘मी एकटाच मुंबईला येत आहे, आता तरी परवानगी नाकारणार का?’ असा थेट सवाल जरांगे यांनी सरकारला केला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयानंतर मुंबई आंदोलनाला परवानगी मिळणार की पुन्हा नकार दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवात आंदोलन नको; सरकारकडून आवाहन
यापूर्वीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदान परिसरासह प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईतील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याचा मुद्दा पुढे करत न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आंदोलनाबाबत कडक भूमिका घेतली होती.
यावेळी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सरकारमधील नेत्यांनीही गणेशोत्सवात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, असे आवाहन केले होते.
मात्र, जरांगे यांनी यावेळी आंदोलकांना मुंबईत न बोलावता स्वतःच मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने आंदोलनाला परवानगी नाकारण्यासाठी दिलेली कारणे आता कितपत लागू होतात, हा मुद्दा पुढे आला आहे.
‘सरकारकडून मराठ्यांवर वार’; जरांगेंचा गंभीर आरोप
आपली पुन्हा फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हे आंदोलन शेवटचे असल्याचे सांगत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
गणेशोत्सवाच्या आडून मराठा समाजावर वार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा समाजाला दंगलीचा डाग लागावा, असा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपण एकटेच मुंबईकडे जात असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
‘मी एकटा जातोय, आता परवानगी नाकारणार का?’
जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न परवानगीचा निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येणार नसतील आणि स्वतः जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईत जाऊन आंदोलन करणार असतील, तर त्यांना आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी दिली जाणार का, याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, परवानगी नाकारल्यास करोडो मराठे विनापरवानगी मुंबईत दाखल होतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला कोणताही निर्णय पुढील आंदोलनाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
उपोषण सुरू झाल्यास सरकारवरील दबाव वाढणार
जरांगे पाटील मुंबईत पोहोचून आझाद मैदानात उपोषणाला बसले, तर सरकारवरील राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. उपोषण लांबत गेले तर राज्याच्या विविध भागांतून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
त्यामुळे एकीकडे गणेशोत्सवातील कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आणि दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. जरांगे यांचा ‘एकटाच मुंबईला जाण्याचा’ निर्णय वरकरणी छोटा वाटत असला, तरी त्यातून सरकारची चोहोबाजूंनी कोंडी होण्याची शक्यता आहे.
आता मंगळवारी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर पोलिस आणि राज्य सरकार जरांगे यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



त्यानुसार प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावा लागणार आहे. या काळात नागरिकांच्या तक्रारी, अर्ज आणि गाऱ्हाणी थेट संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून घ्यायची आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे.







कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यंदाही त्यासाठी विविध विभागांतून बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मराठवाड्यातून १३०० बस बाहेर गेल्याने स्थानिक एसटी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.