Home Blog Page 3

पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला! कडबा कुट्टी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

0

आष्टी — बळीराजासाठी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण सुरू असतानाच आष्टी तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चिखली येथील शेतकऱ्याचा गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

शहाजी लक्ष्मण आवारे (वय ४४, रा. चिखली, ता. आष्टी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी आवारे हे आपल्या गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टीचे काम करीत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार करंट लागला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोळ्याच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने आवारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने चिखली गावावरही शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्दैवी योगायोग

ज्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा-राजाची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच दिवशी एका शेतकऱ्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे.

MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची पुन्हा तपासणी, SIT चौकशीचे आश्वासन

0

मुंबई — राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये मंत्रालयात तब्बल पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपरची पुन्हा तपासणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. तसेच परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांची विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांनी सांगितले.

आठ दिवसांत ठोस कारवाईचे आश्वासन

पेपरफुटीच्या प्रकरणात पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेतील गुणांची पुन्हा तपासणी करण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. गुणांशी संबंधित प्रश्नांवर दळवी समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

परीक्षेशी संबंधित विविध प्रश्न व्ही. राधा समितीसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षेचे पेपर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले.

मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती पुढे ढकलण्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. परीक्षा प्रक्रियेतील प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत या मुद्द्यावरही विद्यार्थ्यांनी भूमिका मांडली.

MPSC अध्यक्षांच्या राजीन्याची मागणी कायम

दरम्यान, बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ नयेत यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक आणि ठोस बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

उपोषण मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. बैठकीनंतर विद्यार्थी प्रतिनिधी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. सरकारकडून दिलेली आश्वासने आणि त्यावर होणारी कार्यवाही याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे आता SIT चौकशी, पेपरची फेरतपासणी आणि गुणांबाबतच्या निर्णयाकडे राज्यसेवा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

एक हजार कोटींचा आरोप अन् ईडीची चौकशी; जरांगे गटासमोर आता नवे संकट

0

बीड —  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात मराठा आंदोलक अजय बारसकर यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तक्रार केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप बारसकर यांनी केला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने ईडी कार्यालयाने बारसकर यांना बोलावून माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपलब्ध पुरावे अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगितले.

ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पांडुरंग तारक, किशोर गलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरुंदकर, संजय कटारे, स्वप्निल तारक, बद्रिनाथ तारक आणि विलास खेडकर यांच्यासह अन्य व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

‘किमान एक हजार कोटींचा भ्रष्टाचार’

बारसकर यांनी आरोप केला की, संबंधितांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, या प्रकरणात किमान एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची आमची भूमिका आहे. संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

डिफेंडर गाड्या कुठून आल्या, लिलावती हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च कुठून करण्यात आला, पांडुरंग तारक यांनी ५० एकर जमीन कशी खरेदी केली, यासह इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही बारसकर यांनी केली.

वाळू धंद्याचीही चौकशी करा

जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित असल्याचा आरोप केलेल्या वाळू व्यवसायाचीही चौकशी करण्याची मागणी बारसकर यांनी केली. या प्रकरणात उपलब्ध पुरावे ईडी अधिकाऱ्यांकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.

दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या; काळकुटेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, अजय बारसकर यांच्या आरोपांवर गंगाधर काळकुटे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले. आमची नावे ज्यांना घ्यायची असतील त्यांनी घ्यावीत; चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, असे काळकुटे म्हणाले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले तर आम्ही चौकशीला जाण्यास तयार आहोत. ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे सांगत त्यांनी ईडी, सीबीआय किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची तयारी दर्शवली.

मी वाळूचा किंवा कोणताही बेकायदेशीर व्यवसाय करत असेल तर माझ्यावर कारवाई करावी. आमची कोणतीही चौकशी करा, असे आव्हानही काळकुटे यांनी दिले. बारसकर यांनी केलेल्या आरोपांमधील पुरावे समोर आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

अशा प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधातील तक्रारीनंतर आता ईडीकडून पुढे काय कारवाई होते, याकडे राजकीय आणि मराठा आंदोलनाच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाच मोठी घडामोड; ‘या’ जातीचा ओबीसीमध्ये समावेश

0

मुंबई —  राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची धग कायम असतानाच राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एका समाजाला ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील मोठी अडचण आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी याबाबत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित समाजातील नागरिकांना यापूर्वी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता मिळवताना नावातील फरकामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा आधार घेत या संदर्भात स्पष्टता करण्यात आली आहे.

नेमका कोणता निर्णय?

राज्य सरकारने हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही नावांचा एकच सामाजिक घटक म्हणून विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संबंधित समाजातील पात्र नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे.

ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना या प्रकरणांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाव वेगळे असल्याने येत होती अडचण

यापूर्वी हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी अशा वेगवेगळ्या नावांमुळे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे समोर आले होते.

या तिन्ही नावांमागील सामाजिक घटक एकच असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे स्पष्ट करण्यात आल्याने आता संबंधित प्रकरणांमध्ये पडताळणी समित्यांना त्यानुसार कार्यवाही करता येणार आहे.

शिक्षण, नोकरी आणि योजनांमध्ये काय फायदा?

या निर्णयाचा थेट फायदा पात्र नागरिकांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना होणार आहे.

यामुळे शिक्षणातील प्रवेश, सरकारी नोकरी तसेच पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांमध्ये ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुलभ होऊ शकतो.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची चर्चा

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे.

या संवेदनशील आरक्षणाच्या वातावरणातच सरकारकडून ओबीसी प्रवर्गाशी संबंधित हा निर्णय घेण्यात आल्याने त्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, हा निर्णय पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला सुलभ करणारा असून, संबंधित प्रकरणांमध्ये विभागीय पडताळणी समित्यांनी आयोगाच्या अहवालाचा विचार करून नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

डीवायएसपी भारत पांढरे यांच्या नेतृत्वात सलग 3 कारवाया; 11.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक आणि मटका जुगाराविरोधात पोलिसांनी सलग कारवाया केल्या. तीन स्वतंत्र कारवायांमध्ये टेम्पोसह वाळू, रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ११ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे पथकासह गस्तीवर असताना कॅनाल रोड, नगर नाका परिसरातून नाट्यगृहाच्या दिशेने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नगर नाका बाजूकडून येणारा टाटा ७०९ टेम्पो क्रमांक MH 06 G 8459 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू आढळली.

ही वाळू राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड येथील गोदावरी नदीपात्रातून आणल्याचे चौकशीत समोर आले. या कारवाईत टेम्पो चालक नारायण आत्माराम धुताडमल (वय २४, रा. कांबी, ता. जि. बीड) आणि टेम्पो मालक अजय अशोक लेंडाळ (वय २३, रा. गोरे वस्ती, बांगर नाला, बीड) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि १२ हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बीएनएस कलम ३०३(२), ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

कॅनाल रोडवर मटका जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

याचदरम्यान कॅनाल रोड, नगर नाका परिसरात विनापरवाना ‘कल्याण’ मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांसह छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान हमेद खान नादेर खान (वय २९, रा. अमराई, बालेपीर नगर रोड, बीड) हा लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देताना आढळून आला.

त्याच्याकडून १३ हजार रुपये रोख, चिटबुक, कार्बनचा तुकडा, बॉलपेन, १ लाख रुपये किमतीची बर्गमन स्कुटी (MH 23 BB 4487) आणि १० हजार रुपये किमतीचा ओपो मोबाईल, असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी हमेद खान नादेर खान तसेच गुंड पाटील, पूर्ण नाव माहीत नसलेला, रा. बीड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

चिंतामणी हॉस्पिटलसमोर छापा; मटका चालक पसार

दरम्यान, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, कॅनाल रोड येथे बाबा शेख हा विनापरवाना ‘कल्याण’ मटका चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संयुक्त पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच बाबा शेख घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी परिसराची पंचांसमक्ष झडती घेतली असता १,८१० रुपये रोख, चिटबुक, कार्बनचा तुकडा आणि काळ्या रंगाचा बॉलपेन असा मुद्देमाल मिळून आला.

सदर साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आला असून बाबा शेख, पूर्ण नाव माहीत नसलेला, रा. बीड याच्याविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखाली कारवायांची मालिका

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र आघाव, राठोड, नवनाथ डाके, अक्षय लोंढे, योगेश निर्धार आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला.

अवैध वाळू वाहतूक आणि मटका जुगाराविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या सलग कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चंपावतीचा प्रशांत कुलकर्णी संस्था चालकांचा जावाई आहे की संचालक, शिक्षणाधिकारी याच्या ताटाखालची मांजरं आहेत?

0

बीड — शहरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या “चंपावती” शिक्षण संस्थेत टीईटी परीक्षा पात्र नसल्याच्या कारणावरून दलित शिक्षकाला सेवा जेष्ठता असताना देखील जातीयवादाच्या कारणावरून मुख्याध्यापक पदाला मुकावे लागले. त्याचवेळी प्रशांत कुलकर्णी नावाचा शिक्षक संस्थाचालकांच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगण्यास पुरेसा आहे.हा महाभाग टीईटी पास तर नाहीच नाही शिवाय टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याच्या कारणावरून त्याच्यावर सायबर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला इतकच नाही तर टीईटी परीक्षेत बसण्यास त्याला राज्य परीक्षा परिषदेने प्रतिबंध ही केलेला आहे.तरी देखील तो संस्थेत कार्यरत आहे. मग तो संस्थाचालकांचा जावई आहे की, संस्थाचालक शिक्षणाधिकारी त्याच्या ताटाखालची मांजर आहेत? का त्याला संस्थेतून काढून टाकल्यावर संस्थाचालकांची अंड पिल्लं बाहेर येण्याची भीती संस्थाचालकांना वाटत आहे असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) पास न झाल्याच्या कारणावरून राम शिंदे नावाच्या शिक्षकाला मुख्याध्यापक पदावरून हाकालपट्टी करण्यासाठी संस्थाचालकांनी आपले डावपेच खेळले. डावपेचात ते यशस्वी ही झाले. राम शिंदे यांना मुख्याध्यापक पदावर बसवायचं तर शिक्षण संस्थेतल्या भ्रष्टाचाराला आळा बसतो. हे कारण तर आहेच आहे पण जातीयवादाचा किडा चावलेल्या संस्थाचालकांना दलित व्यक्ती मुख्याध्यापकपदी कसा चालेल हा खरा मोठा प्रश्न होता. याबाबत पोलिसात तक्रार देऊन संस्थाचालकावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. पण त्यांना पायउतार करण्यासाठी ज्या टीईटी पात्रता परीक्षेचा मुद्दा मोठा केला. त्याच पात्रता परीक्षेच्या नियमांना हरताळ फासण्याचं काम संस्थाचालक मात्र राजरोस करत आहेत. त्याला कारणही तसेच आहे प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी नावाचा हा शिक्षक ,शिक्षक भरती प्रक्रिया 2012 पासून बंद असताना 7 फेब्रुवारी 2015 साली बोगसपणे नियुक्त करण्यात आला. संस्थाचालकांना शिक्षण विभागात माफियागिरी करणाऱ्या चंद्रकांत मुळे ची मर्जी संपादन करून संस्थेत नंगानाच करायचा होता त्यासाठी त्याचा हा प्यादा संस्थेत घेतला. मग काय चंपावती संस्थेत बोगस शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर झाली. आपण सगळे भाऊ भाऊ लुटून सगळी चंपावती खाऊ हा मूलमंत्र बनला गेला.

प्रशांत कुलकर्णी चा टीईटी परीक्षेत घोटाळा

बोगस शिक्षक भरतीत संस्थेत घुसलेल्या या महाभागाने टीईटी पात्रता परीक्षा पास असणं गरजेचं असतं मग त्यासाठी “वाट्टेलं ते” असं म्हणत 2019 20 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत ही त्याने गैरप्रकार केला. परिणामी सायबर पोलिसांनी पुणे शहर पोलीस ठाण्यात गुरनं 56/2021 भादवि कलम 406 ,409, 420, 465, 467, 468 ,34 ,120 ब तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 (डी) आणि महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये येणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1990 (सुधारित) कलम 7,8 अन्वये 16 डिसेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या नगावर नुसता गुन्हाच दाखल केला नाही तर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी त्याला कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला. त्या परीक्षेत त्याचा आसन क्रमांक 530 11 10 120 असा होता. असाच टीईटी परीक्षेत प्रशांत कुलकर्णी याने 2018 मध्ये झालेल्या परीक्षेत देखील केला होता. या प्रकरणी देखील सायबर पोलिसांनी गुरनं 58/2021 नुसार विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला होता. 2018 साली झालेल्या परीक्षेचा आसन क्रमांक 5302310238 हा होता. एवढं मोठं गंभीर प्रकरण असताना देखील त्याच्यावर कुठलीच कारवाई संस्थेला करावीशी वाटली नाही.

संस्थाचालकांना अंड पिलं बाहेर येण्याची भीती

शिक्षण विभागात काळे कारणामे करणाऱ्या चंद्रकांत मुळेचा डावा हात असलेल्या या प्रशांत कुलकर्णी ने खोटे कागदपत्र तयार करण्याची कलादेखील अवगत केली आहे. मुळेचा माणूस म्हणून विश्वासू मग काय संस्थाचालकांचा सगळाच काळा चिट्ठा याच्या हातात आला. राम शिंदे हे मुख्याध्यापक असताना शालार्थ पासवर्ड, संच मान्यता पासवर्ड, यु-डायस पासवर्ड चा वापर हा प्रशांत कुलकर्णीच करत होता. या संदर्भात मुख्याध्यापक या नात्याने ही बाब अनेक वेळा शिक्षणाधिकारी पे युनिटचे ढाकणे यांच्या निदर्शनास पत्राद्वारे आणून दिली. मात्र शेण खायला भेटलं की काहीही करायची तयारी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्याच्या कारणावरून चंद्रकांत मुळे ने अनेक वेळा राम शिंदे यांना धमकावल्याचे प्रकार घडले होते. याच पासवर्डच्या माध्यमातून प्रशांत कुलकर्णी हा शासनाला खोटी माहिती देणे, बोगस पगार बिले तयार करत शासनाच्या तिजोरीवर दरोडे घालण्याचे काम तो करीतच होता आजही तो प्रकार सुरूच आहे. याच एकंदरीत प्रशांत कुलकर्णीच्या कारनाम्यामुळे
त्याच्यावर कारवाई करायची म्हणजे जेलवारी पक्की याची जाणीव संस्था चालकांना असल्याने त्यांना देखील ताटाखालचं मांजर होऊन म्यांव करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे‌.

शिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षण विभाग लाचार

शालार्थ आयडी घोटाळा, वेतन घोटाळा, बोगस शिक्षक भरती यासारख्या एक ना अनेक घोटाळ्यामुळे बीडचा शिक्षण विभाग सध्या गाजतो आहे. पैसा मिळतो ना, वर कमाई होती ना मग संस्थाचालकांपुढे थोडासा गोंडा घोळला तर बिघडतं कुठं हाच मूलमंत्र जपत शिक्षण विभागातला क्लासवन अधिकारी असो की चपराशी प्रत्येक जण शासनाशी नाहीतर संस्थाचालकांशी ईमान राखण्यात धन्यता मानत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात अनेक बोगस शाळा, बोगस शिक्षक भरती, वेतन घोटाळे झालेले असताना देखील हे काही शिक्षण अधिकाऱ्याने याला पायबंद घालण्यासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही. जो येतो तो संस्थाचालकांच्या चपला उचलण्यातच धन्यता मानतो. मग वरपासून खालपर्यंत मिंधे असलेले अधिकारी कारवाई करणार कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच लाचारीच्या भूमिकेमुळे प्रशांत कुलकर्णी सारख्या गुन्हेगाराचं फावलं आहे.

जवाहरलाल सारडा सारखी हिम्मत इतर संस्था चालक दाखवणार का?

श्री चंपावती शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ पाहिले तर यामध्ये चार प्रथित यश वकील आहेत. चार सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. दोन प्राध्यापक आहेत. यांच्यासारख्या नामवंत लोकांच्या संस्थेत यांच्या संमतीने नंगा नाच सुरू असताना यांची तोंड मात्र शिवली गेलेली आहेत.
यामध्ये जवाहर सारडा हेच खरे प्रामाणिक निघाले असं म्हणायची वेळ आली आहे. जवाहर सारडा यांनी 15 जुलै 2026 रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीमध्ये प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी याच्यावर असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. बोगस प्रमाणपत्र तयार करणे पोलिसात गुन्हा नोंद असताना हा शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत फसवणुकीचे धडे देणार का? असा प्रश्न उपस्थित करत त्याची बेकायदेशीर नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच 7 फेब्रुवारी 2015 ते आज पर्यंत जे वेतन व भत्ते घेतले आहेत ते दंड व्याजासह वसूल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी संस्थेचा संचालक तसेच जागरूक नागरिक या नात्याने सारडा यांनी केली आहे. याबरोबरच कायम मान्यता देत असताना बनावट टी ई टी प्रमाणपत्र तपासणे आवश्यक असताना त्याला मान्यता देण्यात आली. खोटे प्रमाणपत्र दिल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याची देखील प्रशांत कुलकर्णी याने फसवणूक केल्याचा देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीसात कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान सारडा यांनी दिलेल्या तक्रार अर्जाला दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटत असला तरी कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला कुठलीच कारवाई करण्याची गरज वाटली नाही.
एकंदरच या चंपावती शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खेळामध्ये प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी हा संस्थाचालकांचा, शिक्षणाधिकाऱ्यांचा जावई आहे म्हणून कारवाई होत नाही. की सगळे ताटाखालची खालची मांजरं होऊन मिळणाऱ्या खरकट्यावरच जगण्यात धन्यता मानत आहेत. प्रशांत कुलकर्णी वर शिक्षणाधिकाऱ्यासह संस्थाचालक कारवाई करणार का? शिक्षणाधिकारी संस्थाचालक चंपावती संस्थेतून विद्यार्थ्यांना फसवेगिरी, शासनाच्या लुटीचे धडे देणार का? शिक्षणाधिकाऱ्याचा प्रामाणिकपणा थोडा तरी दिसणार का? संस्थेतील भ्रष्टाचाराची सगळी पोलखोल झाल्यानंतरच कारवाई करणार का? आज पर्यंत संस्थाचालकांनी शहरात कमावलेली इज्जत सगळी गेल्यानंतरच जाग येणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

बीडमध्ये 50 लाखांचा गांजा जप्त; क्रेटा कारसह आरोपी ताब्यात

0

बीड  — जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने बीड शहरात मोठी कारवाई करत तब्बल 70 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 35 लाख रुपयांचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 15 लाख रुपयांची क्रेटा कार असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक बीड शहरात गस्त घालत असताना खासबाग मंदिर रोड परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून अवैध गांज्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता, विविध गोण्यांमध्ये भरून ठेवलेला 70 किलो गांजा आढळून आला.

या प्रकरणात मोसीन खान वाहब शेख (वय 31, रा. ताज नगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 अंतर्गत NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीड शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या ही धडक कारवाई पार पाडली.

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा; चार ट्रॅक्टरसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

गेवराई  — गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून चार ट्रॅक्टर आणि चार लोखंडी केन्या असा एकूण 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 8 सप्टेंबर 2026 रोजी गेवराई उपविभागातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत सुरळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरला लोखंडी केन्या जोडून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सुरळेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी काही जण ट्रॅक्टर आणि लोखंडी केन्यांच्या सहाय्याने वाळू उपसा करताना आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करत सोमनाथ शिवाजी मोरे (वय 27), आदेश ज्ञानेश्वर भंडारे (वय 21), सचिन भाऊराव लिबॉरे (वय 24), तिघेही रा. सुरळेगाव, ता. गेवराई, जि. बीड, तसेच विकास अनित तोतरे (वय 25, रा. गुळज, ता. गेवराई) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे चार ट्रॅक्टर आणि चार लोखंडी केन्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 32 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अर्जुन यादव, पोलीस अंमलदार बबन सलगर, मनोज परजणे, अश्पाक सय्यद आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

“दुधारी तलवार” ठरली कारवाई; नेकनूरमध्ये गोवंश तस्करी अन् जुगार अड्ड्यावर धडाधड धाडी

0

बीडनेकनूर पोलीस ठाणे हद्दीत मटका, जुगार, गोवंश तस्करी, अवैध दारू विक्री, रसायन युक्त ताडी यासारखे धंदे राजरोस सुरूच आहेत. हप्तेखोरीमुळे “सा”हेबांचे “बळे“च कर्तव्यदक्षतेचा आव आणून कारभार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी
सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने कत्तलीच्या उद्देशाने आणून दाटीवाटीने शेडमध्ये ठेवलेल्या 36 गोवंशीय जनावरांची सुटका करत 31 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी मांजरसुंबात छापा मारून जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीला खतपाणी घालणारे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत. पोलीस ठाण्याचा कारभारी बदलला मात्र अवैध धंदे करणारे मागे उभा “मंगेश” पुढे उभा “मंगेश”माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.असं गीत गात आनंदी मनाने कारभार हाकत आहेत. या कारभारा विरोधात ठाणे प्रमुखांचे कारवाई करताना मात्र “सा”हेबांचे “बळे” च आव‌ आणत कर्तव्यदक्षतेचे निर्माण करत असलेले चित्र पितळ उघडे पाडणारा दिवस अखेर उजाडलाच. नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत मटका, धाब्यावरून सुरू असलेली अवैध दारू विक्री, रसायन युक्त ताडी, मटका ,जुगार अड्डे कसे चालू आहेत याचं बिंग अखेर फुटलं गेलं.

नेकनूर मधील सरकारी डीएड कॉलेज समोरील एका शेडमध्ये कत्तलीसाठी तसेच तस्करीसाठी गोवंश जनावरांना डांबून ठेवल्याची माहिती ‌सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळाली त्यांनी तात्काळ या ठिकाणी छापा मारून 36 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन क्रमांक MH-17-AG-5439 पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल सहा लाखाची जनावर तसेच 25 लाखाचा आयशर असे मिळून 31 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे कमी होतं की काय म्हणून मांजरसुंबा येथील विराज बिअर बारच्या वरच्या मजल्यावर ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाई करत या ठिकाणी धाड टाकली. या जुगार अड्ड्यावरील सोयी सुविधा पाहून पोलीस पथकालाही धक्का बसला
पत्ते खेळण्यासाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे आणि उपस्थितीच्या नोंदी या ठिकाणी आढळून आल्या. याचाच अर्थ पोलिसांची कुठलीही भीती या जुगार अड्डा मालकाला नव्हती. तोही मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हेच गीत गात आपलं साम्राज्य उभा करत चालला होता. पोलीस अधिकारी भारत पांढरे यांनी टाकलेल्या छाप्यात 19 जण ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे 55 हजार 600 रुपये रोख मिळून आले. मोबाईल वाहने इतर साहित्यांचा विचार केला तर मुद्देमाल जप्तीचा आकडा 72 लाख 86 हजार रुपया पर्यंत पोहोचला. या सलग झालेल्या कारवाया तसेच नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा विचार केला तर दुष्काळाच्या तोंडावर अनेकांच्या संसाराची होरपळ होताना साक्षात गोविंदा “व्यंकटरमना” असं म्हणत देवाला साकडे घालण्याची वेळ आली आहे. साकडे न घातल्यास हप्ते खोरीतून आपले उखळ ” पांढरे” करून घेत “भारता” च्या जनतेचे होणारे हाल साक्षात शिव (मंगेश) देखील रोखू शकणार नाही.

मांजरसुंब्यात जुगार अड्ड्यावर छापा; १९ जणांवर गुन्हा, ७२.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरसुंबा येथील ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळावर पोलिसांनी छापा टाकून जुगार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत  यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह एकूण ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मांजरसुंबा येथील विराज बिअर बारच्या वरच्या मजल्यावर ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. सदर मंडळाला शासनाचा परवाना असला तरी परवान्यातील अटींनुसार तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास मनाई आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासणीत या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

क्लबमध्ये जुगारासाठी विशेष व्यवस्था

पोलिसांच्या कारवाईदरम्यान मंडळाच्या ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे आणि उपस्थितीच्या नोंदी आढळून आल्या. याशिवाय उपस्थित व्यक्तींच्या अंगझडतीमध्ये ५५ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन मिळून आले.

तसेच कारवाईदरम्यान वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

१९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात विलास ज्ञानोबा नाईकवाडे, राम बारीकराव बहिरवाळ, अशोक भालचंद्र वेदपाठक, राहुल सुखाहारी गदळे, उत्तरेश्वर किसन खिंडकर, शेख अशोक शेख रफीक, सज्जाद खान शफीक खान पठाण, राजेंद्र नारायण जाधव, भरत बलभीमराव काळुंके, संतोष जालींदर चादर, मेघराज योगीराज ढोकणे, महादेव नारायण शिंदे, कानिफनाथ गणेश हुंबे, शेख समी शेख नईम, संदीप पिलाजी गोरे, निजामोद्दीन बक्षुद्दीन शेख, शकीलभाई युनूसभाई वोहरा, विष्णू अर्जुन निमुडे आणि संदीप छत्रभुज खोटे अशा एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

परवान्यातील अटींचे उल्लंघन करून जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

भारत यांच्या पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक बीड नवनीत, अपर पोलीस अधीक्षक चेतना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बीड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.