कुटेवाडीतील विवाहितेची आत्महत्या नव्हे तर हत्याच ! अखेर सत्य उलगडलं

बीड —  तालुक्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सासरच्यांनीच धारदार शस्त्राने वार करून विवाहितेची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कुटेवाडी येथील संध्या किसन घुले (वय 23) हिचा विवाह 20 मे 2022 रोजी पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. विवाहावेळी चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळे सोने देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच संध्याचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
सासरच्यांकडून “तू काळी आहेस, तुला स्वयंपाक करता येत नाही, पांढऱ्या पायाची आहेस” अशा शब्दांत सतत अपमान केला जात होता. तसेच ऑटो रिक्षा खरेदीसाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणीही केली जात होती. या छळाला कंटाळून संध्या काही काळ माहेरी राहिली होती. मात्र दीड वर्षांच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून नातेवाईकांनी तिची समजूत काढत पुन्हा सासरी पाठवले होते.
दरम्यान, 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरीच्या परिसरात आढळून आली. यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरच्या नातेवाईकांना माहिती दिली. विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाची पाहणी करण्यात आली असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा आढळल्या. तसेच हात-पायांवरही मारहाणीच्या खुणा असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत माहेरच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्याला अटक केली असून फरार सासूचा शोध सुरू आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles