मंगल कार्यालयाच्या किचनमध्ये महिला मजुरावर अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आष्टी —  बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील एका मंगल कार्यालयात काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिला मजुरावर मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह चौघांविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला बीड-अहिल्यानगर महामार्गावरील एका मंगल कार्यालयात मजूर म्हणून काम करते. या कार्यालयाच्या शेजारी कडा येथील रहिवासी हेमंत गोकुळ मेहेर यांची जमीन आहे. सोमवारी दुपारी हेमंत मेहेर हा कार्यालयाच्या किचनमध्ये आला. त्याने महिलेला कामाबाबत विचारणा करत, तीन महिन्यांपूर्वी येथे काम करू नकोस, असे सांगितले होते, असे म्हणत तिच्याशी वाद घातला.

महिलेने आपण मजूर असून मालक आणि जमीन मालकांनी आपापसातील बाबी पाहाव्यात, असे सांगितले. या उत्तराचा राग आल्याने हेमंत मेहेर याने महिलेच्या कानशिलात लगावून तिला जमिनीवर पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी त्याचा मुलगा संदेश मेहेर आणि अन्य दोन व्यक्ती तेथे उपस्थित होते. त्यांनीही महिलेला शिवीगाळ करून धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर इतर तिघे बाहेर गेल्यानंतर हेमंत मेहेर याने महिलेला जबरदस्तीने खाली पाडले. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडावर रुमाल दाबून आवाज बंद केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अत्याचारानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी हेमंत मेहेर याने दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेने रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

महिलेच्या फिर्यादीवरून हेमंत गोकुळ मेहेर, संदेश हेमंत मेहेर (दोघे रा. कडा, ता. आष्टी) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आष्टीचे पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे आणि सहायक पोलीस निरीक्षक नाना सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाना सुर्यवंशी करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles