केज — ऊसतोड मजुराच्या १३ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुणे येथून संबंधित अल्पवयीन मुलीला आणि तिचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब २०२५-२६च्या ऊसतोड हंगामासाठी कर्नाटकातील बागलपूर जिल्ह्यातील मुधोळ परिसरातील एका साखर कारखान्यावर गेले होते. जानेवारी २०२६मध्ये ग्रामदैवताच्या यात्रेसाठी कुटुंब गावी परतले होते.
७ जानेवारी रोजी देवदर्शनानंतर घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरात दिसून आली नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता रोहन अर्जुन समुद्रे याने मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मुलीच्या आईने २३ एप्रिल २०२६ रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून रोहन शंकर समुद्रे, अर्जुन शंकर समुद्रे, करण अर्जुन समुद्रे आणि मीरा अर्जुन समुद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०८/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी पुणे येथून आरोपी तरुणासह अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करीत असून, अल्पवयीन मुलीची सुरक्षितता, तिच्यावरील अत्याचाराचे स्वरूप तसेच प्रकरणातील इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे.

