४.४७ कोटींची एफआरपी थकीत
परळी — परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ४ कोटी ४७ लाख ६ हजार रुपये अद्याप थकीत असल्याने साखर आयुक्तालयाने कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थकीत एफआरपीसोबतच त्यावर १५ टक्के व्याज वसूल करण्याचेही आदेशात नमूद आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर गेल्या वर्षी ओंकार ग्रुपला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय जड अंतःकरणाने घेतल्याचे तत्कालीन संचालक पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. मात्र, कारखान्याशी संबंधित आर्थिक अडचणी अद्याप कायम असल्याचे एफआरपी थकबाकीच्या प्रकरणातून समोर आले आहे.
४.४७ कोटींची एफआरपी बाकी
साखर आयुक्तालयाच्या ३१ जुलै २०२६ रोजीच्या अहवालानुसार, ओंकार कारखान्याने २०२५-२६ हंगामात ३ लाख ४० हजार ९१६ टन उसाचे गाळप केले. या उसापोटी कारखान्यावर एकूण ७६ कोटी १४ लाख ६५ हजार रुपये एफआरपी देय होती. त्यापैकी ७१ कोटी ६७ लाख ५९ हजार रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. मात्र, ४ कोटी ४७ लाख ६ हजार रुपये अद्याप थकीत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
एफआरपीची रक्कम विहित मुदतीत न दिल्यास संबंधित थकबाकीवर १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार थकीत एफआरपी आणि व्याजाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
साखर, मोलॅसिस, बगॅस विकून वसुलीचे निर्देश
साखर आयुक्तांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी मालमत्ता जप्तीचा आदेश जारी केला आहे. कारखान्याकडे असलेली साखर, मोलॅसिस, बगॅस यांसारखी उत्पादने विकून थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातूनही पूर्ण वसुली न झाल्यास आवश्यकतेनुसार तारण नसलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून तिची नियमानुसार विक्री करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
या आदेशाची प्रत अंमलबजावणीसाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. संबंधित ऊस उत्पादकांची प्रमाणित यादी तसेच कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.
आंदोलनानंतरही शेतकऱ्यांची थकबाकी कायम
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने ८ व ९ मे तसेच १ ते ३ जून या कालावधीत कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी कारखाना प्रशासनाने थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. परमेश्वर गित्ते यांनी केला आहे.
साखर आयुक्तांनी आदेश देऊन तीन आठवडे उलटूनही मालमत्ता जप्तीची कारवाई अपेक्षित वेगाने होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. थकीत एफआरपीची तातडीने वसुली न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे.




