बीड — बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर कासार तालुक्यात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाने या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने संयुक्त पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदतीसह पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, बीड व शिरूर कासार तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. प्रारंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, ऐन सोयाबीन शेंगा भरण्याच्या आणि कापूस पाते -बोंड धरण्याच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पावसाने दीर्घकाळ दडी मारली. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक भागांत उभी पिके करपून गेली आहेत. पावसाअभावी परिसरातील नदी-नाले, विहिरी आणि साठवण तलावांमधील पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पर्यायी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतीबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. बियाणे, खते, औषधे व मशागतीसाठी कर्ज काढून केलेला खर्चही आता वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महसूल, कृषी व संबंधित यंत्रणांमार्फत दोन्ही तालुक्यातील गावनिहाय पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना निकषानुसार तत्काळ आर्थिक सहाय्य, पीकविम्याची भरपाई आणि शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.

