बीड — पवनचक्की कंपन्याना पोलिसांकडून मिळणार संरक्षण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आज पर्यंत ठरत आला आहे. पोलीस अधीक्षकांपासून ते साध्या शिपायापर्यंत पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरत आली आहे. त्यातच आता आवादा कंपनीच्या चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने नेकनूर पोलीसांच्या कोठडीतच फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या आरोपीवर मकोका देखील लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बालाजी शिंदे (वय २२, रा. वाशी) असे या आरोपीचे नाव आहे. आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान बालाजीने लॉकअपमध्ये पांघरुणाच्या रगचा दोरा उसवून त्याच्या साहाय्याने गळ्याभोवती फास आवळला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हालचाली केल्या. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा प्रश्न
नेकनूर पोलीस ठाण्याचे जे कारभारी झाले ते पवनचक्की कंपन्यांचे लाड पुरवणारेच निघाले. हा विषय माध्यमांनी अनेक वेळा हाताळला असला तरी पोलीस अधीक्षकांनी कधीच यावर कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.
नेकनूर ठाण्याचा कारभार विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने लॉकअपमधील देखरेख, बंदिवानांची सुरक्षा आणि कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने अशा प्रकारचे पाऊल उचलण्यापर्यंत परिस्थिती कशी निर्माण झाली, याची चौकशी होणे महत्त्वाचे आहे. या घटनेची अधिकृत चौकशी आणि त्यातून समोर येणारी माहिती याकडे आता लक्ष लागले आहे.