बीड — मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार… आरोपीसह अल्पवयीन मुलगी अचानक गायब… बीडमध्ये शोध घेऊनही दोघांचा ठावठिकाणा नाही… अखेर पोलिसांना थेट कोल्हापूरचा धागा मिळाला आणि शिरोली एमआयडीसीतून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, बीडमध्ये परतल्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबाने या संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण मिळाले. तपासात बालविवाह, पैशांची मागणी आणि त्यानंतर दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यानंतर पोलिसांनी मूळ फिर्यादी असलेल्या आई-वडिलांनाच आरोपी केले.
नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४/२०२६, कलम १३७(२) बीएनएस २०२३ अंतर्गत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मुलीचा शोध घेण्यासाठी प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे (AHTU) वर्ग करण्यात आले.
AHTUच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी गुन्ह्याची फाइल तपासून फिर्यादी आणि साक्षीदारांची चौकशी केली. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. संशयित मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले; मात्र सुरुवातीला तपासाला ठोस दिशा मिळाली नाही.
त्यानंतर तांत्रिक तपासासोबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. पीडित मुलगी आणि आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी AHTUचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले.
शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकून पीडित मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दोघांना बीडला आणल्यानंतर पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला.
आणि याच जबाबातून प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा खुलासा झाला.
पोलिसांच्या तपासानुसार, आई-वडिलांनीच मुलीचा बालविवाह लावून दिला होता. त्यानंतर आरोपीकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार रुपये ऑनलाइन आणि १० हजार रुपये रोख घेण्यात आले. उर्वरित रक्कम न मिळाल्यानंतर मुलीच्या अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यातील तपासाने अचानक वेगळे वळण घेतले आणि ज्यांनी मुलीच्या अपहरणाची फिर्याद दिली, त्यांनाच पोलिसांनी आरोपी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना , अपर पोलीस अधीक्षक समीर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या) AHTUच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उषा चौरे, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब कारले यांच्या पथकाने केली.




