पाटोदा — बसस्थानक परिसरात महिलेच्या बॅगेतून चोरीला गेलेले लाखोंचे सोने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीच्या या प्रकरणाचा समांतर तपास करताना पोलिसांनी महिला आरोपीला चुंबळी फाटा येथून ताब्यात घेतले. तिच्याकडून 8 तोळे 4 ग्रॅम सोने आणि 10 हजार रुपये रोख, असा एकूण 13 लाख 97 हजार 160 रुपये किमतीचा संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाटोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं. 0261/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीच्या गुन्ह्यातील महिला आरोपी सोजर सुरेश भोसले (वय 45, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) ही चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चुंबळी फाटा येथे थांबली असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष चुंबळी फाटा येथे कारवाई केली. यावेळी महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिच्याकडून 4 तोळे 4 ग्रॅम सोने आणि 10 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले.
तपासात उर्वरित चोरीचा मुद्देमालही हस्तगत झाल्याने या गुन्ह्यातील 8 तोळे 4 ग्रॅम सोने आणि रोख 10 हजार रुपये असा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे पाटोदा बसस्थानकातील चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, बाळासाहेब सानप, आनंद मस्के, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंढे, चंद्रकला नागरगोजे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्विनकुमार सुरवसे आणि चालक पोलीस अंमलदार सिद्धार्थ मांजरे यांचा सहभाग होता.




