कोकणासाठी १३०० लालपरी रवाना; मराठवाड्यात ‘सुखाचा प्रवास’ गर्दीत हरवला!

बीड — गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातील तब्बल १ हजार ३०० एसटी बस मुंबई-ठाणे परिसराकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम मराठवाड्यातील नियमित एसटी वाहतुकीवर झाला असून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. परिणामी अनेक बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून बस मिळविण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. प्रवासासाठी गाडीचे उपलब्ध नसल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच दुपट्ट तिप्पट पैसे देऊन गावी पोहोचावे लागत आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यंदाही त्यासाठी विविध विभागांतून बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मराठवाड्यातून १३०० बस बाहेर गेल्याने स्थानिक एसटी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या नियोजनानुसार बीडमधून सर्वाधिक ३१०, छत्रपती संभाजीनगरमधून ३०७, धाराशिवमधून २०८, लातूरमधून २०५, जालन्यातून १२०, परभणीतून ११० आणि नांदेडमधून ४० बस कोकणातील गणेशोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत.

या बस बाहेर गेल्याने मराठवाड्यातील नियमित वाहतुकीच्या तब्बल २९ लाख ३२ हजार किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या प्रमुख मार्गांवरील बसफेऱ्या ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांची गैरसोय

एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. बस उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी नियमित भाड्याच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत.

ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी आणि रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकांवर गर्दी वाढल्याने उपलब्ध बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे ‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ या घोषणेऐवजी सध्या प्रवाशांना गर्दीच्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे.

१३०० बस कुठून जाणार?

विभाग पाठविण्यात येणाऱ्या बस
बीड ३१०
छत्रपती संभाजीनगर ३०७
धाराशिव २०८
लातूर २०५
जालना १२०
परभणी ११०
नांदेड ४०
एकूण १,३००

मराठवाड्यातील किती किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम?

मराठवाड्यातून बस बाहेर गेल्याने एकूण २९ लाख ३२ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द/कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागनिहाय नियोजनानुसार बीडच्या ८ लाख २५ हजार, छत्रपती संभाजीनगरच्या ९ लाख ३५ हजार, धाराशिवच्या ५ लाख, लातूरच्या ६६ हजार, नांदेडच्या १ लाख ३१ हजार आणि परभणीच्या ४ लाख ७५ हजार किलोमीटरच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

दरम्यान, जालना विभागातून पाठविण्यात येणाऱ्या १२० बसपैकी २५ बससाठी जळगाव विभागातील चालकांची मदत घेण्यात येणार आहे. वाहतूक आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय मुंबई, तसेच नाशिक आणि नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणातील गणेशोत्सवासाठी पाठविण्यात आलेल्या बस आपापल्या आगारात परतल्यानंतरच मराठवाड्यातील नियमित बससेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना एसटीच्या कमी झालेल्या फेऱ्यांचा फटका सहन करावा लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles