Home राज्य परवानगी नाकारली अन् जरांगे आक्रमक; १९ सप्टेंबरला आंदोलन होणारच!

परवानगी नाकारली अन् जरांगे आक्रमक; १९ सप्टेंबरला आंदोलन होणारच!

0
10

मुंबई —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर जाहीर केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे शनिवारी आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज सादर करण्यात आला होता. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल आणि पोलिसांनी घातलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी विविध कारणे पुढे करत परवानगी नाकारली आहे.

परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून आंदोलनाला परवानगी द्यावीच लागेल. १९ सप्टेंबरचे आंदोलन होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, आता सलाईन आणि पाणीही बंद करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्या वतीने वीरेंद्र पवार हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे गणेशोत्सव, कायदा-सुव्यवस्था, आझाद मैदानाची मर्यादित क्षमता आणि यापूर्वीच्या आंदोलनाचा अनुभव ही प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

१४ सप्टेंबरपासून मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील सुरक्षा यंत्रणेवर आधीच मोठा ताण असणार आहे.

याशिवाय, आझाद मैदानाची क्षमता आणि प्रस्तावित आंदोलकांची संख्या हा देखील महत्त्वाचा मुद्दा पोलिसांनी मांडला आहे. जरांगे पाटील यांनी सुमारे ४ हजार ते ४ हजार ५०० आंदोलक मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात जमल्यास दक्षिण मुंबईतील वाहतूक, शाळा, व्यवसाय आणि रुग्णालयांच्या दैनंदिन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी २०२४ मधील मुंबई आंदोलनाचाही संदर्भ दिला आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले होते आणि वाहतूक तसेच जनजीवनावर परिणाम झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. काही आंदोलकांवर गुन्हेही दाखल झाले होते. यापूर्वी मुंबई बंदचे आवाहन करण्यात आल्याने भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील अमित सहानी प्रकरणातील आदेश, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि ‘जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५’ मधील संबंधित तरतुदींचा आधार घेत आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या नकारानंतरही जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांनी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे.

मराठा आरक्षणाची ही शेवटची आणि आरपारची लढाई असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी समाजाला मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, असा शब्द देतानाच आंदोलनातील एखाद्या तरुणाचे रक्त सांडल्यास अवघ्या दहा मिनिटांत महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबईत येणे शक्य नसलेल्या मराठा बांधवांनी आपल्या मोर्चाच्या मार्गावर १५० किलोमीटरपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे. मराठा भगिनींनीही मोठ्या संख्येने मुंबईला यावे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यापर्यंत हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आता मुंबई पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय आणि जरांगे पाटील यांचा १९ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार यामुळे पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकार या निर्णयाचा पुनर्विचार करणार का, जरांगे पाटील यांची मुंबईकडे होणारी वाटचाल कशी असेल आणि १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर नेमकी परिस्थिती काय निर्माण होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here