Home राज्य १८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय?

१८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय?

0
10

मुंबई —  राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. कमी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पिकांची स्थिती, नुकसानीचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती याचा प्रशासनाकडून सध्या सविस्तर आढावा घेतला जात आहे.

संबंधित १८ जिल्ह्यांकडून सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

या १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती

अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मात्र, या सर्व जिल्ह्यांतील परिस्थिती एकसारखी नाही. पावसाचे प्रमाण, भौगोलिक परिस्थिती, पिकांची अवस्था आणि नुकसानीची तीव्रता यामध्ये फरक आहे. त्यामुळे जिल्हानिहाय अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

उपग्रहाद्वारे पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन

पिकांचे अचूक नुकसान निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून पारंपरिक पाहणीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. उपग्रह छायाचित्रे आणि डिजिटल प्रतिमांच्या माध्यमातून पिकांची सद्यस्थिती तपासली जात आहे.

सध्या प्राथमिक सर्वेक्षण सुरू असून जिल्ह्यांचे सविस्तर अहवाल आल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नुकसान निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठवाड्यात सोयाबीन, कापूससह खरीप पिकांना फटका

मराठवाड्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या खंडाचा खरीप पिकांवर परिणाम झाला आहे.

या भागात सोयाबीन, कापूस, हळद, उडीद आणि मूग या पिकांवर पावसाअभावी परिणाम झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून काही भागांत उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

बीडसह तीन जिल्ह्यांत चाऱ्याची चिंता

पिकांसोबतच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या नुकसानीसोबतच चाऱ्याच्या उपलब्धतेबाबतही स्वतंत्र अहवाल मागविण्यात आला आहे.

विदर्भातील कापूस, सोयाबीन, तुरीवर परिणाम

विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाच्या कमतरतेचा खरीप पिकांना फटका बसला आहे.

या जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक आढाव्यात समोर आले आहे. पावसातील खंडामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोलापूर, नंदुरबारमध्येही परिस्थिती चिंताजनक

सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यांतही पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. सोलापूरमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचाही दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जिल्हानिहाय अहवाल

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून १८ जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती घेतली.

पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची स्थिती आणि आवश्यक उपाययोजनांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंगळवारी काय निर्णय होणार?

सोमवारपर्यंत जिल्हानिहाय अहवाल सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी सरकार कोणती मदत जाहीर करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

नुकसानीचे अंतिम मूल्यांकन आणि जिल्हानिहाय अहवालाच्या आधारे मदत, पाणी आणि चाऱ्यासंदर्भातील पुढील उपाययोजना निश्चित होणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here