अंबाजोगाईत स्लॅब भरताना विजेचा धक्का; दोन कामगारांचा मृत्यू

अंबाजोगाई — शहरातील मुख्य रस्त्यावर पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (१२ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडली. यशवंत (खंडू) कोंडीराम वाघमारे (वय ३३) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०), दोघेही रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यावरील भिसे यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू असताना काँक्रीट मिक्सर मशीनच्या सहाय्याने स्लॅब भरण्यात येत होते. याच परिसरातून ३३ केव्ही तसेच स्ट्रीट लाईटच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत.

स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना दोन्ही कामगारांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात अंबाजोगाई शहरावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

यशवंत उर्फ खंडू वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. साधारण दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

बबन वाघमारे हे कुशल वाहनचालक म्हणून परिचित होते. वाढत्या महागाईत कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी सेंट्रिंगचे कामही करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी स्लॅबचे काम सुरू होते, त्या परिसरातून विद्युत वाहिन्या गेल्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता का आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, काँक्रीट मशीनचा चालक विश्वनाथ चव्हाण (रा. झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles