
मुंबई — राज्यातील सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा समविचारी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंखे आणि मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला.
मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका करण्यात आली. यावेळी एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील अपयशाचा उल्लेख करत या गुणपत्रिकेत त्यांना ‘नापास’ घोषित करण्यात आल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सागर साळुंखे यांनी आरोप केला की, सीईटी आणि टीईटी परीक्षांतील कथित गैरव्यवहारामुळे सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून लाखो पालक मानसिक तणावाखाली आहेत. शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून शिक्षकांवर विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
तसेच नंदुरबारमधील आदिवासी विद्यार्थ्यांची कथित आर्थिक फसवणूक, बोगस नर्सिंग महाविद्यालयांचा वाढता सुळसुळाट, काही महाविद्यालयांकडून आकारले जाणारे अवाजवी शुल्क आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंब यांसारखे प्रश्न उपस्थित करत शिक्षण विभागाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी सांगितले की, टीईटी प्रकरणानंतरही सरकारने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.




