रावसाहेब दानवे यांच्या नातूसह 8 जणांवर 10 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक — माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील शेअर भागीदारीच्या व्यवहारात तब्बल 10 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे उद्योग आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

फिर्यादी कैलास अहिरे हे नाशिकमधील सातपूर एमआयडीसी परिसरातील एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक असून ते भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीवरील आर्थिक अडचणी सोडवून देण्याचे आश्वासन देत कंपनीतील 14 टक्के शेअर्सच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला होता.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या व्यवहाराअंतर्गत सुरुवातीला 14 कोटी 34 लाख 98 हजार रुपये देण्यात आले. मात्र उर्वरित 10 कोटी रुपये देण्यात आले नाहीत. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांनी टाळाटाळ केली. तसेच कंपनीचे शेअर्स परस्पर इतरांच्या नावे हस्तांतरित करून फिर्यादीची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवम मुकेश पाटील (रावसाहेब दानवे यांचा नातू), गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद आणि मंदार टाकळकर यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची रक्कम डमी खात्यांद्वारे वळविणे आणि फिर्यादीची दिशाभूल केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. सातपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles