बीड — सध्या जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळ्याची पाळे”मुळे“उखडण्याचं काम सुरू करण्यात आलं असून एसआयटी चौकशी देखील सुरू आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील वैयक्तिक संच मान्यता प्रकरणांमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीची प्रक्रिया गतीमान केली आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी प्रक्रिया सूरु केली आहे.

बीड जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा चर्चेचा विषय ठरला असून देशभक्तीचे,संस्कार, त्याग समर्पणाचे कथित धडे देणाऱ्यांच्या संस्था देखील भ्रष्टाचाराच्या पाळ्या “मुळ्यां” नी जखडून टाकत त्या संस्था उध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं आहे. “चंद्रा” (अति शहाणा) माणूस संगतीला घेतला की काय होतं याच्या ज्वलंत उदाहरणाचे धागेदोरे उलगडू लागले आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये संच मान्यता घेताना तसेच तुकडी मान्यता घेतांना तत्कालीन संचालकांच्या खोट्या सह्या, शिक्षण अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून साध्या कागदावरच नियूक्तीपत्र दिले गेले.संस्थेचे तसेच शिक्षण विभागातील लेटर हेड(पॅड) वापरणे बंधनकारक असताना तसे केले गेले नाही.यातून लाखोंची कमाई करण्यात आली. मात्र हीच अनियमितता शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे.
शिक्षण संचालक (मिपा) यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार काही वैयक्तिक मान्यता संचिकांमध्ये प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या दि. 23 ऑगस्ट 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार संबंधित शाळा, व्यवस्थापन, मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांना त्यांची भूमिका आणि स्पष्टीकरण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रशासनाकडून संबंधित प्रकरणांचे चौकशी अहवाल उपलब्ध करून देण्यात आले असून, मुख्याध्यापकांना ते शाळा व्यवस्थापन आणि संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रांसह संबंधितांना त्यांच्या मान्यतेच्या समर्थनार्थ पुरावे, अभिलेख आणि स्पष्टीकरण सादर करता येणार आहे.
सुनावणीची तारीख व वेळ स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या प्रक्रियेनंतर संबंधित मान्यतांबाबत अंतिम प्रशासकीय निर्णय घेतला जाणार असल्याने शिक्षण क्षेत्रात या प्रकरणाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हालचाली वाढल्या असून, संबंधित मान्यता प्रकरणांच्या वैधतेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

