कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे
बीड — जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ सोमवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक व त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आदी पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने आश्रमशाळा “प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”प्रमाणे चालवल्या जात असल्याचा आरोप डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला.
प्रमुख मागण्या
१) सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट व ऑनलाइन हजेरी आश्रमशाळांमधील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी सुरू करावी तसेच सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय समितीकडून विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
२) अंथरवणपिंप्री तांडा प्रकरणाची चौकशी गेवराई तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा विष्णू चव्हाण यांना कायदेशीर वेतनाची मागणी केल्यामुळे मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या पतीवर संस्थेच्या सचिवांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
३) वडझरी आश्रमशाळेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील आश्रमशाळेत पटसंख्येबाबत अनियमितता, शिक्षक मान्यतेतील कथित नियमभंग, वेतन अपहार व शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
४) सहाय्यक संचालकांवर कारवाईची मागणी संस्थाचालकांची कथित पाठराखण करून कारवाईस विलंब केल्याचा आरोप करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बीड येथील सहाय्यक संचालकांवर प्रशासकीय कारवाई करून संबंधित प्रकरणांची तटस्थ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, हनुमान घोडके, किष्किंधा पांचाळ,बाळासाहेब मोरे पाटील ( शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष), माजी सैनिक अशोक येडे( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), प्राचार्य डी.जी.तांदळे ( मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ बीड), नितीन जायभाये ( अध्यक्ष बीड शहर बचाव मंच), बाजीराव ढाकणे,सुहास जायभाये,ज्येष्ठ सामाजसेवक डॉ.संजय तांदळे, किसन पुंड (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ),धनंजय सानप (बीड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), पवार बी.एच.( जिल्हाध्यक्ष हिंगोली महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), जमजाळ आर.डी.( प्रसिद्ध प्रमुख महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), सहशिक्षक,संजय जायभाये, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, राहुल थिटे,नेवळे प्रदीप, कालिदास वनवे, सतिश राठोड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.




