बीड, — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडजवळ पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक दरोड्याच्या घटनेत अज्ञात तिघांनी चाकूचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून नेली. या घटनेत एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटे प्रवासादरम्यान कार अडवून दरोडा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८) पहाटे सुमारे ५.२५ वाजण्याच्या सुमारास आहेरवडगाव शिवारातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. फिर्यादी राहुल उद्धवराव पोहेकर (वय ३०, रा. नवीन मोंढा, जालना) हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कारमधून (एमएच २१ सीजी ०४००) प्रवास करत होते.
यावेळी अज्ञात तीन आरोपींनी त्यांची कार अडवून चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नी, आई आणि मावशी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१.६९ लाखांचा ऐवज लंपास
दरोडेखोरांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४५ हजार रुपये रोख रक्कम, मावशीच्या अंगावरील अंदाजे ३१ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच आईच्या अंगावरील सुमारे ५० हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके सक्रिय केली आहेत.

