बीड — परळी तालुक्यातील एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा आणि न्यायव्यवस्थेतील विलंबाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. विवाहाचे आश्वासन देत तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार दिल्याचा आरोप असलेल्या अग्निवीर जवानाविरोधात गुन्हा दाखल होऊनही अद्याप अटक न झाल्याने पीडित तरुणीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील भरत तोंडे या अग्निवीर जवानाने विवाहाचे आश्वासन देत एका तरुणीसोबत दीर्घकाळ संबंध ठेवले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह निश्चित झाला होता. ६ मे रोजी विवाहसोहळा पार पडणार होता. लग्नासाठी पत्रिका वाटप, खरेदी आणि इतर सर्व तयारी पूर्ण झाली होती.

मात्र, विवाहाच्या काही दिवस आधीच भरत तोंडे याने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून भरत तोंडेसह ११ जणांविरोधात लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊन सुमारे एक महिना उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी अग्निवीर जवान असल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्यास विलंब होत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. “गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. न्याय मिळत नसल्याने माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे,” असे तिने पत्रात नमूद केले आहे..
या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि पुढील तपासात कोणती माहिती समोर येते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

