Home Blog Page 5

बीडच्या भूमिपुत्राचा मोठा सन्मान! अशोककुमार भिल्लारे पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

0

चौसाळा गावच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती; कायदेविषयक आणि प्रशासकीय अनुभवाची शासनाकडून दखल

बीड —  बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा गावचे सुपुत्र तथा अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त संचालक अशोककुमार भगवानराव भिल्लारे यांची विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील अधिसूचना आणि नियुक्ती आदेश जारी केले आहेत.

अशोककुमार भिल्लारे यांनी अभियोग संचालनालयात संचालक म्हणून जबाबदारी सांभाळताना कायदेविषयक तसेच प्रशासकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव मिळवला आहे. त्यांच्या या अनुभवाची दखल घेत राज्य शासनाने पुणे विभागातील महत्त्वाच्या पोलीस तक्रार निवारण यंत्रणेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

गृह विभागाकडून अधिकृत नियुक्ती

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२-स नुसार पुणे विभागीय क्षेत्रासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर शासनाने अशोककुमार भिल्लारे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.

गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अनुप कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील प्रक्रियेनंतर उपसचिव बापूसाहेब सोनवणे यांच्या स्वाक्षरीने १ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना, तर ४ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्ती आदेश जारी करण्यात आला.

चौसाळा ते राज्याच्या महत्त्वाच्या प्रशासकीय पदापर्यंतचा प्रवास

चौसाळा येथील भूमिपुत्र असलेल्या अशोककुमार भिल्लारे यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर प्रशासकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. अभियोग संचालनालयाचे संचालक म्हणून त्यांनी बजावलेली जबाबदारी आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आता पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या कामकाजासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून भिल्लारे यांचे अभिनंदन होत असून, चौसाळा परिसरातही त्यांच्या नियुक्तीबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.

कुटुंबाचीही प्रशासकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात वाटचाल

अशोककुमार भिल्लारे यांच्या कुटुंबाचीही प्रशासकीय आणि कायदेविषयक क्षेत्राशी घट्ट नाळ आहे. त्यांचे जावई आयपीएस अधिकारी असून सध्या दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा निहार मुंबई उच्च न्यायालयात वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

दरम्यान, आपल्या जन्मभूमी चौसाळा येथे अशोककुमार भिल्लारे यांचा लवकरच मित्रमंडळी आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या मित्रमंडळींनी दिली आहे.

औषधी अंमली पदार्थावर एलसीबीची कारवाई; १६० बाटल्या जप्त, एकाला अटक

0

बीड — शहरातील चांदणी चौक ते काळा हनुमान चौक मार्गावर औषधी अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंमली पदार्थ सदृश्य औषधांच्या १६० बाटल्या आणि अॅक्सेस स्कुटी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार गोविंद राख, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदणी चौक ते काळा हनुमान चौक मार्गावर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस स्कुटीच्या फुटरेस्टमध्ये पांढऱ्या पिशवीत अंमली पदार्थ सदृश्य औषधांच्या बाटल्या घेऊन विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधव जगन्नाथ निमसे यांच्यासोबत पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला.

काळा हनुमान चौक परिसरात MH 23 BL 4259 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस स्कुटीवर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन जाताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता पिशवीमध्ये प्लास्टिकच्या सिलबंद, विना लेबलच्या १६० बाटल्या आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांची अंदाजे किंमत ४० हजार रुपये, तर अॅक्सेस स्कुटीची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव अफताब सलीम खान पठाण (वय २८, रा. दाऊदपुरा, पेठ बीड, ता. जि. बीड) असे आहे. त्याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यासह भारतीय न्याय संहिता आणि औषधीद्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर , उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधव जगन्नाथ निमसे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार गोविंद राख, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सहभागी होते.

नशामुक्त बीड’साठी पोलिसांचे आवाहन

बीड पोलीस दलाकडून ‘नशामुक्त बीड’ अभियान राबविण्यात येत आहे. अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

पोलिसांचा थरारक पाठलाग; थारमधील 5 शस्त्रधारी आरोपी जेरबंद

0

बीड — शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच शस्त्रधारी आरोपींना महिंद्रा थारसह जेरबंद केले. पोलिसांच्या गस्ती पथकाने आरोपींचा दुचाकीवरून पाठलाग करत राष्ट्रवादी भवनाजवळ त्यांना अडवले. या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

1 सप्टेंबर रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरात प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी शेती खरेदीच्या कारणावरून तसेच पूर्वीच्या वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी एका गटाकडून दुसऱ्या गटावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सचिन आगलावे आणि बाळू रहाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे लक्षात येताच संशयितांनी वाहनातून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला.

राष्ट्रवादी भवनाजवळ थार अडवली

पाठलाग करत पोलिसांनी राष्ट्रवादी भवनाजवळ आरोपींचे वाहन अडवले. त्यानंतर इतर पोलीस अधिकारी व अंमलदारही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी थारमधील पाच आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे शस्त्रे असल्याने परिस्थिती गंभीर होती. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संशयितांना वेळीच ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच आरोपी अटकेत

अटक केलेल्या आरोपींमध्ये बाबू उर्फ मिनिनाथ शहादेव जाधव, हनुमान शहादेव जाधव, संभाजी संतराम जाधव, यशराज रामा जाधव आणि सागर गंगाराम जाधव यांचा समावेश आहे. सर्व आरोपी वायभटवाडी, बीड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.

काळ्या रंगाची थार जप्त

पोलिसांनी गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेली महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची थार (MH 23 BS 0808) जप्त केली आहे. याशिवाय इतर वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

तपासात परिसरातील CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी नागरिकांची माहिती आणि मोबाईलवर रेकॉर्ड झालेले व्हिडिओ महत्त्वाचे पुरावे ठरण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक शीतलकुमार , सहायक पोलीस निरीक्षक सतीश, पोलीस अंमलदार सचिन, बाळू , बालाजी , रवी, अनिल , अनंत , राजेभाऊ  आणि नितीन  यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश  करीत आहेत.

फेरफार नोंदीसाठी 1 लाखाची लाच; मंडळ अधिकारी भुसेवाड वर एसीबीची कारवाई 

0

अंबाजोगाई —  शेतजमिनीच्या फेरफाराची नोंद महसूल दप्तरी करून देण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील मंडळ अधिकारी सतीश विठ्ठलराव भुसेवाड यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराला आपल्या शेतीच्या फेरफार नोंदी महसूल दप्तरी करून घ्यायच्या होत्या. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी भुसेवाड यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने लाच मागितल्याच्या आरोपाची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये फेरफार नोंदीच्या कामासाठी भुसेवाड यांनी 1 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाईची तयारी केली. मात्र, ऐनवेळी मंडळ अधिकारी भुसेवाड यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाच स्वीकारल्याची कारवाई होऊ शकली नसली, तरी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसारख्या महसूल विभागातील नियमित कामासाठीच तब्बल 1 लाख रुपयांची मागणी झाल्याने या कारवाईने अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

खरीप पिके हातातून गेली, तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी – मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

तीव्र पाणीटंचाईची भीती; कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचीही धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई  — यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने तीव्र ताण दिला असून ऑगस्ट अखेर सरासरीच्या १०% सुद्धा पाऊस बीड जिल्ह्यात पडलेला नाही, परिणामी शेतकरी व सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सवलती देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

यावर्षी अवर्षणामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी यांसह सर्वच पिके ओलाव्याअभावी करपू लागली आहेत. यंदाचा खरीप हंगाम १००% हातातून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तलाव, विहिरी आदींमधील पाणी पातळी झपाट्याने खालावली असून तलाव कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे ऊसा सारख्या पिकांना पाणी मिळण्याचे तर दूरच राहिले पण पिण्याच्या पाण्याचे देखील तीव्र संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले असून, या दुष्काळ चक्रामुळे बीड जिल्ह्यात विदारक परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने महसूल व कृषी विभागाच्या वतीने सर्व महसूली मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना प्राथमिक आर्थिक मदत देण्याची विनंती केली असून, पर्जन्यमानाच्या आकडेवारी तपासून अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मिळणाऱ्या शासकीय सवलती देण्याची मागणी केली आहे.

भविष्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होणार असून या सर्वच गोष्टींचा विचार करून बीड जिल्ह्यात कृत्रिक पावसाचे प्रयोग करण्याचीही मागणी श्री मुंडे यांनी केली आहे.

चंपावती शिक्षण संस्थेवर जातीयवादाचा घाव; पीडित शिक्षकाची पोलीस अधीक्षकांकडे धाव

0

बीड —  चंपावती शिक्षण संस्थेच्या चंपावती प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीवरून वाद चिघळला असून, अनुसूचित जाती प्रवर्गातील शिक्षकाला जातीय भेदभावातून पदोन्नतीपासून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षक राम गणपती शिंदे यांनी बीडच्या पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार देत संबंधित संस्था पदाधिकारी, संचालक आणि इतरांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिंदे यांच्या तक्रारीनुसार, ते 9 डिसेंबर 1991 पासून चंपावती प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुख्याध्यापक मच्छिंद्र सखाराम गायकवाड हे 31 जानेवारी 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्याध्यापक पद रिक्त झाले. सेवाज्येष्ठतेनुसार आपण पात्र असल्याने 15 जानेवारी 2025 रोजी संस्थेकडे तसेच शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्याची मागणी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिक्षण विभागाने तीन वेळा प्रस्ताव मागविल्याचा दावा

मुख्याध्यापक पदासाठी आपले नाव विचारात घेण्याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाने संस्थेला 28 मे 2025, 7 जुलै 2025 आणि त्यानंतरच्या पत्राद्वारे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीय भेदभावाच्या कारणातून प्रस्ताव पुढे पाठवला नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

यानंतर त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अपील केले. त्या अपिलाचा निर्णय आपल्या बाजूने झाल्यानंतर शिक्षण विभागाने 18 डिसेंबर 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापक म्हणून मान्यता दिल्याचे शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मान्यता रद्द करण्यासाठी खोटी माहिती दिली’

मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना संस्थेचे सचिव प्रा. जगदीश वासुदेवराव काळे यांनी शिक्षण विभागाकडे आपल्या विरोधात खोटी तक्रार केली, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली. हा आदेश 29 जून 2026 रोजीचा दाखवण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात तो 30 जून रोजी रात्री 8.38 वाजता व्हॉट्सॲपद्वारे मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याच कालावधीत संस्थेच्या बैठकीच्या तारखांमध्येही गंभीर विसंगती असल्याचे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 1 जुलै रोजी सूचना देऊन 3 जुलै रोजी बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ही बैठक संस्थेच्या घटनेनुसार नसल्याचे काही संचालकांनी लेखी नमूद केल्यानंतर ती रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असताना 29 जून 2026 रोजीच बैठक झाल्याचे दाखवून ठराव तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापकपदाची केली नियुक्ती 

तक्रारीतील आणखी गंभीर आरोप म्हणजे, सेवाज्येष्ठता यादीत 20व्या क्रमांकावर असलेल्या सारंग तुकाराम जोशी यांना मुख्याध्यापकपदी नियुक्त करण्यासाठी सेवाज्येष्ठतेचे नियम डावलण्यात आल्याचा दावा. जोशी यांची नियुक्ती 7 फेब्रुवारी 2015 रोजी झाली असून, नियुक्तीच्या वेळी ते शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यानंतर 24 जून 2015 रोजी त्यांनी TET उत्तीर्ण केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीची आणि मुख्याध्यापक पदावरील मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली का, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

संस्थेने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता आणि नियमबद्धता तपासणे आवश्यक असताना शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी पुरेशी पडताळणी न करता सारंग जोशी यांच्या मुख्याध्यापक पदाला मान्यता दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

शिंदे यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्याला केवळ अनुसूचित जातीतील असल्यामुळे मुख्याध्यापक पदापासून दूर ठेवण्यासाठी करण्यात आलेले पूर्वनियोजित कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. जातीय भेदभाव, मानसिक व आर्थिक त्रास तसेच सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अॅट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणात संबंधित संस्था पदाधिकारी, संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच खोटी माहिती, बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. तसेच संबंधितांकडून आपल्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली असून संरक्षण आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

लाडांची लाडीकता कामी आली; जरांगे पाटलांनी पाणी घेतले उपोषण सुरूच

0

अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी, २ सप्टेंबर रोजी पाचवा दिवस आहे. सरकारच्या वतीने भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी रात्री अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार असल्याचे सांगत लाड यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया गुरुवारी दुपारपासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रसाद लाड यांनी दिले. मात्र, केवळ प्रमाणपत्र वाटपाची घोषणा न करता त्यांची वैधता कशी निश्चित केली जाणार, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

सातारा-कोल्हापूर गॅझेटसाठी तातडीने जीआरची मागणी

सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असेल, तर त्यासाठी तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांच्याकडे केली.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि रद्द झालेल्या वैध व्हॅलिडिटी पुन्हा बहाल करणे, या मागण्यांचाही सरकारने विचार करावा, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे लाड यांनी सांगितले; मात्र जरांगे पाटील यांनी त्यावर समाधान न मानता अंमलबजावणीचा आग्रह कायम ठेवला.

पाणी घेतले; सलाईन घेण्याचाही शब्द

दीर्घकाळापासून उपोषण सुरू असल्याने प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांनी पाणी आणि सलाईन घ्यावे, अशी विनंती केली. लाड यांची विनंती मान्य करत जरांगे पाटील यांनी पाणी घेतले आणि सलाईन घेण्याचाही शब्द दिला. मात्र, यामुळे उपोषण मागे घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता गुरुवारी दुपारपासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रत्यक्ष सुरू होते का, तसेच सातारा-कोल्हापूर गॅझेटियरसंदर्भात सरकारकडून जीआर काढला जातो का, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. कुणबी प्रमाणपत्र, गॅझेटियरची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि वैध व्हॅलिडिटी बहाल करणे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; ६५ वर्षीय आरोपी जेरबंद, गावकऱ्यांचा बंद

0

बीड — पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे नऊ वर्षांच्या चिमुकलीला पैशांचे व खाऊचे आमिष दाखवून शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी ६५ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून, घटनेनंतर नाळवंडी गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निषेध म्हणून गावकऱ्यांनी बंद पुकारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास चिमुकली घराजवळील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला पैशांची नोट देत आणखी पैसे तसेच चॉकलेट व खाऊ देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला जवळील बाजरीच्या शेतात नेल्याचा आरोप आहे.

शेतात नेल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चिमुकलीने आरडाओरड केल्यानंतर जवळच्या घरातील नातेवाईक आणि नागरिक घटनास्थळी धावून गेले. त्यांनी चिमुकलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नाळवंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. निषेध म्हणून गावकऱ्यांनी बंद पुकारला आहे.

बीड–पुणे रेल्वेला 17 सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे नियोजन

0

बीड — बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. बीड–पुणे रेल्वे सेवा 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा आणि बीड–पुणे तसेच बीड–मुंबई रेल्वे सेवांच्या नियोजनासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित कामे आणि पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

17 सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे सुरू करण्याचे नियोजन

बीडकरांची तब्बल 40 वर्षांची रेल्वे प्रतीक्षा संपवत 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली होती. त्यानंतर आता याच ऐतिहासिक दिवशी बीडला पुण्याशी थेट जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बीड–पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वे जोडणी अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

शेती, उद्योग आणि व्यापाराला मिळणार चालना

पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्याने बीडच्या कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि रोजगार क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही याचा फायदा होईल.

डिसेंबरअखेर बीड–मुंबई रेल्वेचे लक्ष्य

बीड–पुणे रेल्वेनंतर आता बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्यावरही प्रशासनाचा भर आहे. डिसेंबर 2026 अखेर ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.

तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सर्व कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच 17 सप्टेंबरच्या बीड–पुणे रेल्वेच्या शुभारंभ कार्यक्रमाची तयारीही नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

बीड–पुणे आणि बीड–मुंबई या दोन्ही रेल्वे सेवा बीडच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे अनेक दशकांपासून रेल्वे कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा करणाऱ्या बीड जिल्ह्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

बीडच्या शिक्षक मान्यता घोटाळ्याची त्रिस्तरीय चौकशी; समिती तीनदा बदलली, आता तीन दिवसांत अहवाल

0

बीड —  बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘बोगस शिक्षक मान्यता’ घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत आवक-जावक रजिस्टरमध्ये छेडछाड, टायपिंग केलेली यादी चिकटवून नोंदींमध्ये फेरफार आणि त्याआधारे शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे प्रकरण चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती तब्बल तीन वेळा बदलण्यात आली आहे. आता विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पुन्हा त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करून अवघ्या तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

२००६ ते २०१२ मधील रजिस्टरमध्ये नेमका काय फेरफार?

बीडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील सन २००६ ते २०१२ या कालावधीतील जावक रजिस्टरमधील नोंदी या प्रकरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. मागील तारखांच्या नोंदी करणे, टायपिंग केलेली जावक क्रमांकांची यादी रजिस्टरवर चिकटवणे आणि मूळ अभिलेखात छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक बाबामिया ईनामदार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. या फेरफारातून खाजगी संस्थांमधील शिक्षकांना बोगस पद्धतीने मान्यता देण्यात आली का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकाच प्रकरणात चौकशी समिती तीन वेळा बदलली

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आतापर्यंत तीन वेळा चौकशी समिती बदलण्यात आली आहे. चौकशी समिती वारंवार बदलण्याची वेळ का आली, याचे कारण काय, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

एखाद्या गंभीर प्रशासकीय प्रकरणाची चौकशी सातत्याने आणि निष्पक्षपणे पूर्ण होणे अपेक्षित असताना समितीमध्ये वारंवार बदल झाल्याने चौकशी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्याची समिती नेमका काय निष्कर्ष काढते, याकडे लक्ष लागले आहे.

२०१२ पूर्वी टायपिंग; २०२६ मध्ये हाताने नोंदी!

या प्रकरणात रजिस्टरच्या नोंदी करण्याच्या पद्धतीनेही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागाच्या जावक रजिस्टरमध्ये टायपिंग करून नोंदी करण्यात आल्या; मात्र २०२६ मध्ये याच प्रकारच्या नोंदी हाताने करण्यात येत आहेत.

नोंदींच्या पद्धतीत हा बदल नेमका कधी, का आणि कोणत्या प्रशासकीय प्रक्रियेनुसार झाला, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. जुने रजिस्टर, त्यातील नोंदी, चिकटविलेल्या याद्या आणि सध्याच्या नोंदी यांची तुलनात्मक पडताळणी झाल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात.

२००६ ते २०१२ मधील नोंदी आणि २०२६ मधील नोंदींच्या पद्धतीतील हा फरक चौकशीचा महत्त्वाचा धागा ठरणार आहे.

आता उपसंचालकांच्या आदेशाने त्रिस्तरीय चौकशी

विभागीय शिक्षण उपसंचालक कैलाश दातखिळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.

सुनील पोलास – सहाय्यक संचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष

श्रीकृष्ण देशमुख – ज्येष्ठ अधिव्याख्याता, डाएट अंबाजोगाई, जि. बीड – सदस्य

रवी जोशी – उपशिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद जालना – सदस्य

तीन दिवसांची मुदत; मूळ रजिस्टर समितीसमोर

चौकशी समितीने संबंधित सर्व व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेऊन तीन दिवसांत स्पष्ट आणि अंतिम अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तऐवज, रजिस्टर आणि संबंधित अभिलेख समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश बीडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

समितीवर दबाव कोणाचा? हा प्रश्नही ऐरणीवर

एकाच प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन वेळा समिती बदलल्यानंतर आता चौकशी समितीवर कोणाचा दबाव आहे का? हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मात्र, दबाव असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सध्याच्या समितीने कोणत्याही दबावाला बळी न पडता मूळ रजिस्टर, नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल देणे अपेक्षित आहे.

या चौकशीत रजिस्टरमध्ये छेडछाड झाली का, टायपिंग केलेली यादी कधी आणि कोणी चिकटवली, मागील तारखांच्या नोंदी कोणी केल्या, त्या नोंदींच्या आधारे मान्यता कशा देण्यात आल्या आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणाची भूमिका होती, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

तीन वेळा बदललेली चौकशी समिती, रजिस्टरमधील संशयास्पद नोंदी आणि २०१२ पूर्वीच्या टायपिंग नोंदी विरुद्ध २०२६ मधील हस्तलिखित नोंदी—या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीच्या अहवालातूनच समोर येणार आहेत.

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील या प्रकरणात दोषी कोण आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सन 2012 पूर्वी चे जावक रजिस्टर छेडछाड व बोगस शिक्षक यांचे मान्यता जावक रजिस्टर मध्ये नोंद करणे व जावक रजिस्टर मध्ये बोगस शिक्षकांचे कायम मान्यता चि नोंद कॉम्प्युटर टाइप करुन 2012 पूर्वी जावक रजिस्टर वरती चिटकून हे शिक्षक खरे आहेत हे दाखवणेसाठी यांनी अक्कल ची शक्कल लढवली
या पूर्ण प्रकरण मध्ये शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक येथील अधिकारी व कर्मचारी व संस्था चालक यांनी संगतमत करून हे प्रकरण जावक रजिस्टर घोटाळा केला आहे या घोटाळ्यात दोषी असणारे सर्व दोषी अधिकारी व कर्मचारी यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तर्फे होणार आहे व लवकर हे भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी व संस्था चालक यांची जेल वारी निश्चित आहे.
           ⬛   इंजी. सादीक इनामदार 

दरम्यान त्रिस्तरीय समितीमुळे बोगस शिक्षक मान्यता घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणात किती जणांचे हात बरबटले आहेत हे उघडकिस येणार आहे