Home Blog Page 6

मराठा बांधव आक्रमक,पाडळशिंगी येथे टायर जाळले; धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प

0

बीड — अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पाडळशिंगी येथे आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी टोलनाक्याजवळ आंदोलक एकत्र आले. यावेळी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. टायर जाळल्यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन ठप्प झाली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलनामुळे पाडळशिंगी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

प्राध्यापक पंजाबराव येडे यांना मातृ शोक !

0

बीड — अंजनवती येथील प्रा. पंजाबराव येडे यांच्या आई सौ कुशावर्ताबाई श्रीरंग येडे यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सौ कुशावर्ताबाई येडे या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सर्व परिचित होत्या. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या त्या चुलती होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्यावर अंजनवती ता.जी. बीड येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.”सह्याद्री माझा” परिवार येडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

तरुणीच्या छेडछाडीचा आरोप; कड्यात ‘पटवा हटवा’ आंदोलन, डॉ. पटवा निलंबित

0

कडा — उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील नागरिकांनी आंदोलन करत संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली.

घटनेची माहिती  समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

या घटनेच्या निषेधार्थ कडा शहरातील नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी ‘पटवा हटवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. निषेध म्हणून शहरातील काही भागांतील दुकाने बंद ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, या आंदोलनानंतर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाने डॉ. महेंद्र रसिकलालजी पटवा यांच्यावर संस्थात्मक कारवाई केली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष योगेश सुमतीलालजी भंडारी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र १ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे तरुणीच्या आरोपानंतर सुरू झालेल्या या प्रकरणात आता संस्थेच्या पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीला आमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदावरूनही हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची भूमिका आहे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या प्रकरणात आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे तरुणीने केलेल्या आरोपांमागील वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे कडा शहरासह परिसराचे लक्ष लागले आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा मोठा संपाचा इशारा; सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यांत आंदोलन

0

नवी दिल्ली — बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या मंचाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात टप्प्याटप्प्याने संप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर 2026 रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतर 28, 29 आणि 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप केला जाणार आहे. या आंदोलनानंतरही मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाला नाही, तर 26 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या

बँक कर्मचारी संघटनांनी सरकार आणि बँक व्यवस्थापनासमोर प्रामुख्याने चार मागण्या मांडल्या आहेत.

  • बँकांमध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा.
  • कामगिरीच्या आधारे दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम योजना रद्द करावी.
  • प्रोत्साहन पद्धतीत कोणताही बदल करण्यापूर्वी कर्मचारी संघटनांशी चर्चा करावी.
  • कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा.

पाच दिवसांचा आठवडा कधीपासून प्रलंबित?

बँक कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, 2015 मध्ये या मागणीबाबत सहमतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी देण्याचा निर्णय लागू झाला.

2020 मध्ये पुन्हा पाच दिवसांच्या कामकाजाचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी झालेल्या वेतन करारात पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याला औपचारिक मान्यता देण्यात आली, असा संघटनांचा दावा आहे. त्यासाठी सोमवार ते शुक्रवार दररोज सुमारे 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे.

मात्र, या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे पाठवून दोन वर्षांहून अधिक काळ उलटला असतानाही अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

ग्राहकांच्या बँकिंग वेळेवर परिणाम होणार नाही, संघटनांचा दावा

पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या बँकिंग सेवांच्या वेळेत कपात होणार नाही, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करून ही भरपाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

रिझर्व्ह बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय साधारण विमा महामंडळ आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांसारख्या संस्थांमध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा आधीपासूनच लागू असल्याचेही संघटनांनी निदर्शनास आणून दिले आहे.

प्रोत्साहन रकमेच्या नव्या पद्धतीला विरोध

कामगिरीच्या आधारे दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन रकमेची नवी पद्धत हा देखील या आंदोलनातील प्रमुख मुद्दा आहे. या प्रश्नावर कर्मचारी संघटनांनी यापूर्वीही आंदोलनाचा इशारा दिला होता.

मार्च 2025 मध्ये बँक कर्मचारी संघटनांनी संपाची घोषणा केली होती. मात्र, मुख्य कामगार आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर तो संप पुढे ढकलण्यात आला. त्यावेळी बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांनी प्रोत्साहन पद्धतीतील बदलांबाबत चर्चा करावी, असे निर्देश देण्यात आले होते.

संघटनांनी या चर्चेदरम्यान आपली भूमिका मांडली. मात्र, मार्च 2026 मध्ये सरकारने बँकांना सुधारित प्रोत्साहन पद्धती लागू करण्याचे निर्देश दिले, असा संघटनांचा आरोप आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या प्रोत्साहन रकमेची तरतूद?

कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, 2020 च्या करारानुसार बँक कर्मचाऱ्यांसाठी समान प्रोत्साहन पद्धत लागू करण्यात आली होती. कार्यालयीन कामकाजातील कर्मचाऱ्यांपासून महाव्यवस्थापक स्तरापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. बँकेच्या कामगिरीच्या आधारे जास्तीत जास्त 15 दिवसांच्या वेतनाइतकी प्रोत्साहन रक्कम मिळण्याची तरतूद होती.

मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये वित्तीय सेवा विभागाने वरिष्ठ अधिकारी श्रेणीतील चौथ्या ते सातव्या स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रोत्साहन पद्धत लागू करण्याचे निर्देश दिल्याचा संघटनांचा दावा आहे. या पद्धतीत वैयक्तिक कामगिरीलाही महत्त्व देण्यात आले आहे.

या नव्या पद्धतीमुळे सुमारे 40 हजार वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाभ मिळू शकतो. बँकिंग क्षेत्रातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या जवळपास पाच टक्के आहे. नव्या पद्धतीनुसार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमाल 365 दिवसांच्या वेतनाइतकी प्रोत्साहन रक्कम मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी कमाल प्रोत्साहन रक्कम 15 दिवसांच्या वेतनाइतकीच असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रोत्साहन रकमेबाबत मोठी असमानता निर्माण होईल, असा आक्षेप बँक कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

26 ऑक्टोबरपासून बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता

पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, प्रोत्साहन रकमेची पद्धत आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सरकार व बँक व्यवस्थापनाने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सप्टेंबरमधील दोन टप्प्यांतील संपानंतर 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संप सुरू झाल्यास देशभरातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मात्र, संपामुळे नेमक्या कोणत्या बँकांच्या कोणत्या सेवा किती काळ प्रभावित होतील, हे संबंधित बँका आणि कर्मचारी संघटनांच्या पुढील निर्णयांवर अवलंबून राहणार आहे.

शेतात गांजाची लागवड; एस पी नवनीतच्या मार्गदर्शनात 130 झाडे जप्त

0

गेवराईगेवराई तालुक्यातील राजपिंप्री शिवारात कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी कारवाई करत 130 गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन सुमारे 10 किलो असून त्यांची अंदाजे किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्यातील पथकाने 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजपिंप्री शिवारातील शेत गट क्रमांक 31 मध्ये कारवाई केली.

या शेतात कापूस आणि तुरीच्या सरीमध्ये फुले व बिया असलेली गांजाची छोटी-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून एकूण 130 झाडे जप्त केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन सुमारे 10 किलो असल्याचे समोर आले.

या प्रकरणी शेतमालक भाऊसाहेब काशिनाथ केदार (वय 75) यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत, पोलीस निरीक्षक किशोर, सहायक पोलीस निरीक्षक समाधान, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

शेतविहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी 60 हजारांची लाच; ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

0

बीड — नरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या शेतविहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 61 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 60 हजार रुपये स्वीकारणाऱ्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी झालेल्या या कारवाईने बीड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे एसीबीच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मुकेश भोकरे याने तक्रारदाराकडे 61 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने मागणीची पडताळणी केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत 60 हजार रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने भोकरे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत शिंगारे आणि प्रभारी उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आष्टीत भेसळयुक्त दूध प्रकरणाला नवे वळण; व्हे पावडर पुरवठ्याच्या आरोपावरून दिलीप हंबर्डे अटकेत

0

आष्टी —  भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व पुरवठ्याच्या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. दिलीप जानदेव हंबर्डे याला ३१ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे व्हे पावडरचा पुरवठा नेमका कुठे आणि कोणासाठी केला जात होता, याचा तपास आता अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.

आष्टी-जामगाव रोडवरील नक्षत्र लॉन्ससमोर व्हे पावडरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH-13 CU-4141 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली. वाहनात २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या व्हे पावडर आढळून आल्या.

चौकशीदरम्यान वाहनचालकाने आष्टी शहरातील एका ठिकाणी यापूर्वीच २५ गोण्यांचा पुरवठा केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत आणखी २५ गोण्या व्हे पावडर जप्त केल्या. या कारवाईत एकूण ७२ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, मुद्देमालाची अंदाजे किंमत २ लाख ६९ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी बीड येथील अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत एका आरोपीने दिलीप जानदेव हंबर्डे यांचे नाव घेतल्याचे समोर आले. हंबर्डे यांच्या सांगण्यावरून व्हे पावडरच्या पुरवठ्याचे काम सुरू असल्याचा जबाब आरोपीने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हंबर्डे यांना अटक केली.

आता पोलिसांकडून व्हे पावडरचा नेमका वापर कुठे केला जात होता, त्याचा पुरवठा कोणाला केला जात होता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करून बाजारात विकले जात होते का, याचा तपास केला जात आहे.

या प्रकरणामुळे आष्टी तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या संभाव्य साखळीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या तपासातून या प्रकरणामागील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

रस्त्यावर वाढदिवसाचा धिंगाणा घालून सेलिब्रेशन; पोलिसांची कारवाई

0

माजलगाव —  सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशा पद्धतीने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजलगाव शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणातील अजीज सालेम चाऊस याने पोलिसांसमोर आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली असून, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती न करण्याची समज त्याला देण्यात आली आहे.

माजलगाव शहरातील बसस्थानकासमोरील सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना काही जणांनी केलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

व्हिडिओची गंभीर दखल घेत माजलगाव शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 285/2026 दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 285, 126(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 135 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात अजीज सालेम चाऊस, सिकंदर चाऊस, दिनेश आहाड, निहाल पटेल, महेंद्र कांबळे, करण कांबळे, वीर बलवीर अल्हांडे, अक्षय पोपटके आणि कृष्णा रा. टाकरवन यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, अजीज सालेम चाऊस याने पोलिसांसमोर आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रम साजरा करून नागरिकांना त्रास होईल, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, अशी समज पोलिसांनी संबंधितांना दिली आहे.

व्हिडिओतील इतरांचीही चौकशी

या घटनेच्या व्हिडिओमध्ये आरोपींसोबत आणखी 10 ते 15 जण वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तपासात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियासाठी दहशतीचे प्रदर्शन करू नका

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे किंवा नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारे प्रकार करू नयेत, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांनी केले आहे. अशा घटनांचे व्हिडिओ किंवा माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रु ; पाथरूडमधील व्हिडिओ व्हायरल, मंदिरात भाविकांची गर्दी

0

भूम (धाराशिव ) — तालुक्यातील पाथरूड गाव सध्या एका अनोख्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. गावातील पुरातन प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या डोळ्याजवळ पाण्याचे थेंब दिसून आल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.

पाथरूड येथील श्री गणपती मंदिरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि तयारीची कामे सुरू आहेत. त्याचवेळी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करत असताना पुजाऱ्यांचे लक्ष गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या डोळ्याकडे गेले. मूर्तीच्या डोळ्याच्या भागातून पाण्यासारखे द्रवाचे थेंब बाहेर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सुरुवातीला हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत मंदिरातील उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर ही माहिती परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचली. काही वेळातच मंदिरात नागरिकांची गर्दी होऊ लागली. प्रत्यक्ष हा प्रकार पाहण्यासाठी तसेच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात दाखल होत आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

मूर्तीच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब येत असल्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला. त्यामुळे पाथरूडमधील या घटनेची चर्चा आसपासच्या परिसरातही सुरू झाली.

श्रावणी सोमवारच्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. काही भाविक या घटनेकडे श्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहत असून, गणपतीचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

नेमके कारण काय? वैज्ञानिक तपासणीची मागणी

मात्र, मूर्तीच्या डोळ्यातून पाण्यासारखे थेंब येण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेला थेट चमत्कार ठरवण्याऐवजी त्यामागील वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे मतही काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मूर्तीमध्ये साचलेली आर्द्रता, वातावरणातील बदल, पाण्याचे शोषण किंवा मूर्तीच्या साहित्याशी संबंधित काही नैसर्गिक अथवा रासायनिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता असू शकते. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत वैज्ञानिक निष्कर्ष समोर आलेला नाही.

त्यामुळे मूर्तीची पाहणी करून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, श्रद्धा आणि कुतूहलाचा विषय ठरलेली ही घटना सध्या पाथरूड परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

अहिल्यानगर-बीड रेल्वेचा वेग मंगळवार पासून वाढणार; नवे वेळापत्रक जाहीर

0

बीड — अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गासाठी तब्बल ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता हळूहळू वेग येताना दिसत आहे. अनेक आंदोलने, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेली अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वे मागील वर्षभरापासून संथगतीने धावत होती. मात्र, आता रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वेचा वेग वाढवण्यात येणार असून, प्रवासाचा वेळ तब्बल १ तास ३५ मिनिटांनी कमी होणार आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने डेमू सेवेच्या वेगात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकामुळे अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर प्रवास अधिक जलद होणार आहे.

चार तासांत होणार अहिल्यानगर-बीड प्रवास

सध्या अहिल्यानगरहून बीडकडे येण्यासाठी डेमू रेल्वेला सुमारे साडेपाच तास लागत होते. नव्या वेळापत्रकानुसार हा प्रवास सुमारे चार तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

गाडी क्रमांक 71441 अहिल्यानगर-बीड डेमू १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी ६.५५ ऐवजी ७.४५ वाजता सुटेल. म्हणजेच गाडी ५० मिनिटे उशिराने सुटणार असली, तरी वेग वाढल्यामुळे ती बीड स्थानकावर पूर्वीच्या दुपारी १२.३० ऐवजी सकाळी ११.४५ वाजता पोहोचणार आहे.

बीड-अहिल्यानगर परतीचा प्रवासही वेगवान

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 71442 बीड-अहिल्यानगर डेमू बीड स्थानकावरून दुपारी १ वाजण्याऐवजी १२ वाजता सुटणार आहे. ही गाडी अहिल्यानगरला पूर्वीच्या सायंकाळी ६.३० वाजता पोहोचण्याऐवजी दुपारी ४ वाजताच पोहोचेल.

म्हणजेच परतीच्या प्रवासातही प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

प्रमुख स्थानकांवरील थांबे कायम

वेग वाढवण्यात आला असला तरी या डेमू रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानकांवरील थांबे कायम ठेवण्यात आले आहेत. अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हातोला, अमळनेर भांड्याचे, जाटनांदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी नवगण आणि बीड या स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे.

४५ वर्षांची मागणी, चार हजार कोटींच्या घरात खर्च

अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गाची मागणी गेल्या ४५ वर्षांपासून केली जात आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सुमारे २०० कोटी रुपयांच्या घरात अपेक्षित होता. मात्र, कामाला झालेला विलंब आणि वाढत्या खर्चामुळे प्रकल्पाची किंमत आता तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.

एकूण २४० किलोमीटरच्या या रेल्वेमार्गापैकी अहिल्यानगर ते बीड या सुमारे १३५ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर-बीड डेमू सेवा सुरू करण्यात आली.

विद्युतीकरणाचे कामही वेगात

डेमू रेल्वे सुरू झाली असली तरी मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेचा वेग मर्यादित राहिला होता. आता रेल्वे प्रशासनाने वेग वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर-बीड मार्गावरील विद्युतीकरणाचे कामही वेगाने सुरू असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

बीड-वडवणी रेल्वेचीही चाचणी पूर्ण

दरम्यान, बीड ते वडवणी या लोहमार्गाची चाचणीही पूर्ण करण्यात आली आहे. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर-बीड रेल्वेचा वेग वाढल्याने मराठवाडा आणि नगर परिसरातील प्रवाशांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या रेल्वेसेवेचा प्रवास आता खऱ्या अर्थाने वेग घेणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.