बायपासवरील उड्डाणपूल व सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर ; आ.क्षीरसागरां कडून पाहणी

डिसेंबर २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आ.संदीप क्षीरसागर यांचे निर्देश
 बीड — बीड शहरा जवळील बायपास मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि स्लीप सर्व्हिस रोडच्या कामांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रलंबित असलेली ही कामे आता प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले असून, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्र सरकार आणि आयआरसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बीड शहरात प्रवेश करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल, तसेच बीड-इमामपूर, बीड-नाथापूर आणि बीड-परळी मार्गांना जोडणारे स्लीप सर्व्हिस रोड असणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही कामे रखडली होती. या दुर्लक्षामुळे बायपासवर झालेल्या अपघातांत आतापर्यंत १३ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका क्र. ११७६/२०२४ दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका मान्य करत २५ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल, तसेच बीड-इमामपूर, बीड-नाथापूर व बीड-परळी मार्गांवर स्लीप सर्व्हिस रोड उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आता छत्रपती संभाजी महाराज चौक आणि महालक्ष्मी चौक येथील उड्डाणपूल तसेच इतर मार्गांवरील स्लीप सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आ.क्षीरसागर यांनी या कामांची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १२ किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गावर उर्वरित भागातही ५.५ मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.बीडकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी जनतेच्या हक्काचा संघर्ष कायम ठेवणार असल्याचे आ.क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे वैभव अबाधित राहणार; पुलापेक्षा स्मारकाची उंची अधिक ठेवण्याचे निर्देश
महालक्ष्मी चौक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर हा बीड शहराच्या अस्मितेशी जोडलेला आहे. या परिसरातूनच उड्डाणपूल जाणार असल्याने, स्मारकाच्या गौरवाला आणि वैभवाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये, अशा विशेष सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची ही उड्डाणपुलापेक्षा अधिक असावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केल्या आहेत. विकासकामे महत्त्वाची असली, तरी इतिहास, संस्कृती आणि प्रेरणास्थानांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून बीडच्या गौरवशाली वारशाच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ.क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles