बीड — वाढवणा ते चौसाळा (ता. बीड) या दहा किलोमीटर अंतरासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप करत पिंपळगाव घाट, वाडवाना, मानेवाडी, माळेवाडी आणि रुईगव्हाण येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या कामाची बाहेरील जिल्ह्यातील स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 494.67 लक्ष रुपये अपेक्षित खर्चाच्या सुरू असलेल्या चौसाळा वाढवाना रस्त्याच काम मस्के इन्फ्रास्ट्रक्चर बीड करीत आहे. या रस्त्यावर टाकण्यात येत असलेला छोट्या खडीचा लेयर इस्टिमेटनुसार नसून अत्यंत कमी जाडीचा आहे. तसेच खडीमध्ये आवश्यक प्रमाणात डांबर न वापरता ऑइलचा अधिक वापर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे डांबरीकरणाचे काम सुरू असतानाच काही ठिकाणी रस्ता उधळून गेल्याचे दिसून येत आहे.

पहिल्याच पावसात खडीवरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था पुन्हा मुरूम रस्त्यासारखी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याशिवाय चौसाळा परिसरातील पुलालाही मोठे भगदाड पडले असून पावसाळ्यापूर्वीच पूल धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाला भेट देऊन दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संबंधित ठेकेदार प्रशासन आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मार्गावरून पाच गावांतील नागरिकांचे दैनंदिन दळणवळण सुरू असल्याने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. खराब रस्त्यामुळे नागरिकांना मणक्याचे विकार, श्वसनाचे त्रास तसेच गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास धुळे-सोलापूर महामार्गावर पाचही गावांच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर पाचही गावांतील नागरिकांच्या मोठ्या संख्येने सह्या करण्यात आल्या आहेत.
आवाज उठवला म्हणून धमक्या
रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना मस्के इन्फ्रास्ट्रक्चर बीड कडून धमक्या दिल्या जात असल्याचं गावकऱ्यांचा म्हणणं आहे. या धमक्यांनाही आळा घालण्यात यावा व रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने दर्जेदार करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे

