बीड — तालुक्यातील लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका २७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला हा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मृताच्या गळ्यावर आढळलेल्या व्रणांमुळे हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत तरुणाचे नाव किरण बंडू सोनवणे (वय २७, रा. अंजणवती, ता. जि. बीड) असे असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी महिलांना आढळला मृतदेह
सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जाणाऱ्या काही महिलांना गणेशमाळ परिसरात रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली.
घटनास्थळी एमएच १६ एआर २६६१ क्रमांकाची दुचाकीही आढळून आली होती. सुरुवातीला वादळी वाऱ्यामुळे दुचाकीचा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
अपघाताचा संशय; तपासात उघड झाला खून
घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस व वादळी वारे होते. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा, अशी चर्चा होती. मात्र, मृतदेहाची पाहणी आणि पुढील तपासादरम्यान किरण सोनवणे यांच्या गळ्यावर पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने आवळल्याच्या खुणा आढळल्या.
यामुळे हा अपघात नसून नियोजनपूर्वक खून करून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
अज्ञात आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच नेकनूर व लिंबागणेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल व प्राथमिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
परिसरात खळबळ
तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अंजणवती, लिंबागणेश आणि परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अपघात समजल्या गेलेल्या घटनेचे खुनात रूपांतर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

