अंबाजोगाई — शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत एका २६ वर्षीय तलाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून त्याची पत्नी दीपाली धनंजय कोळी हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी (वय २६, रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) असे आहे. गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी भरती परीक्षेची तयारी करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी पदावर नियुक्ती मिळवली होती.

विवाहानंतर सुरू झाला वाद
माहितीनुसार, गणेश याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
लग्नानंतर काही दिवसांतच दीपालीच्या वागणुकीत बदल जाणवू लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ती वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा संशय गणेशला आला होता. त्यानंतर तिने हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि अंबाजोगाई येथे परत गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
बहिणीला फोन करून सांगितली व्यथा
२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात गेला होता. त्यानंतर २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच संबंधित बाबी डायरीमध्ये लिहिलेल्या असल्याचेही त्याने सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली.
आईचा गंभीर आरोप
गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत, पत्नीचे कथित प्रेमसंबंध आणि त्यातून झालेला मानसिक त्रास यामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वशिष्ठ कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

