Home Blog Page 7

शिक्षक भरतीत मोठा दिलासा; नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी वयोमर्यादा हटवली

0

पुणेशिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या मात्र वयोमर्यादेच्या अटीमुळे संधीपासून वंचित राहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये उमेदवारांची तात्पुरती शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.

उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्राद्वारे नोंदविलेल्या माहितीच्या आधारे ही तात्पुरती शिफारस करण्यात आली आहे. मात्र, नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कागदपत्रांत तफावत आढळल्यास नियुक्ती नाही

स्व-प्रमाणपत्रामध्ये दिलेली माहिती आणि पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या मूळ कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे शिफारस झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रे सादर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी वयोमर्यादेची अट नाही

शिक्षण विभागाने स्पष्ट केलेल्या महत्त्वाच्या बाबीनुसार, खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.

मात्र, संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निर्धारित मुदतीत पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. इयत्ता नववी ते दहावीच्या शिक्षक पदासाठी पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी, तर इयत्ता अकरावी ते बारावीच्या शिक्षक पदासाठी पदव्युत्तर स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे.

पहिली ते आठवीसाठी टीईटी (TET) आणि सीटीईटी (CTET) पात्रता आवश्यक

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी MAHA TET किंवा CTET पेपर-१, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी संबंधित विषयानुसार पेपर-२ पात्रता आवश्यक राहणार आहे.

याशिवाय उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे तसेच लागू असलेली इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

२ ते ५ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी

शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी पदस्थापनेचे समुपदेशन ७ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणार आहे.

उमेदवारांची संख्या कमी असल्यास ५ सप्टेंबरपूर्वीच नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत.

नियुक्तीपूर्वी चारित्र्य आणि वैद्यकीय तपासणी

कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पोलिस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. तसेच नियमानुसार वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच नियुक्तीची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, अपात्र उमेदवाराला नियुक्ती दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खासगी शाळा व्यवस्थापनाची राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

वयोमर्यादेमुळे आतापर्यंत शिक्षक भरतीची संधी गमावणाऱ्या उमेदवारांसाठी नववी ते बारावीच्या शिक्षक पदांबाबत शिक्षण विभागाने घेतलेली ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

परभणीतील मेळाव्यावरून राजकारण तापले; एकनाथ शिंदेंचा जरांगेंना थेट संदेश

0

परभणी — मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत आयोजित करण्यात आलेला शेतकरी आणि युवक मेळावा स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, या मेळाव्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. यापूर्वीही मेळावा रद्द झाल्याने आजचा कार्यक्रम घेण्यात आला, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली.

परभणीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केले. “आम्ही कोणत्याही आंदोलनकर्त्यांच्या विरोधात नाही. हा मेळावा कोणाला आव्हान देण्यासाठी आयोजित केलेला नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

बळीराजाच्या आड राजकारण येऊ नये

शिंदे म्हणाले की, हा केवळ एका समाजाचा मेळावा नसून शेतकरी, मराठा समाज आणि सर्व समाजाचा मेळावा आहे. बळीराजाच्या प्रश्नांच्या आड राजकारण येता कामा नये, यावर आपली आणि मनोज जरांगे पाटील यांचीही भूमिका समान आहे, असे त्यांनी सांगितले.

“जरांगे पाटील यांची मराठा समाजासाठी असलेली तळमळ आम्हाला माहिती आहे. ते सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून समाजासाठी लढत आहेत. मुख्यमंत्री असताना मी दोन वेळा त्यांच्या आंदोलनस्थळी गेलो. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे,” असे शिंदे म्हणाले.

दोन महिन्यांपासून सुरू होती मेळाव्याची तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा पुढे ढकलण्याची मागणी केली असली तरी कार्यक्रमाची तयारी अचानक झालेली नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून परभणीतील मेळाव्याची तयारी सुरू होती. मराठवाड्यातील अनेक तरुणही एक दिवस आधीच परभणीत दाखल झाले होते. यापूर्वी हा मेळावा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका आयोजकांनी घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी सरकारने निर्णय घेतले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी २०१४ नंतरच्या सरकारच्या निर्णयांचा उल्लेख केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. २०१४ मध्ये मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या काळात काय घडले, यावर आपल्याला टीका करायची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषण केले, त्यावेळी सरकारने त्यांची भूमिका आणि समाजाची भावना समजून घेतली. मराठा समाजातील ५२०० लोकांना नोकरी देण्याच्या मुद्द्यावरही आपण ठाम भूमिका घेतली होती, असे शिंदे यांनी सांगितले.

कुणाचे काढून कुणाला आरक्षण दिले नाही

शिंदे कमिटी आणि न्यायमूर्ती सुक्रे आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमर्यादेतही वाढ करण्यात आली. पूर्वीची १० लाख रुपयांची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

“आम्ही कुणाचं काढून कुणाला दिलेलं नाही. सर्व समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार मराठा समाजाच्या पाठीशी

परभणीतील मेळावा हा कोणालाही आव्हान देण्यासाठी नसल्याचे सांगत शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

“शेतकरी आणि मराठा समाजाच्या पाठीशी सरकार आहे. आपण दोघेही एकाच मार्गावर आहोत. गरीब आणि गरजू समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी जे काही करता आले, ते केले. अजून काही प्रश्न बाकी असतील तर कायद्याच्या चौकटीत आणि सनदशीर मार्गाने त्यावर तोडगा काढता येईल,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेचा आदर असून, कोणत्याही समाजावर अन्याय न करता सर्व समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका कायम राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुलाच्या कठड्यावर कार आदळली, दोघांचा मृत्यू

0

केज  —  केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जवळबन येथील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात घडला. या घटनेमुळे जवळबन गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज येथून तिघेजण कारमधून जवळबनच्या दिशेने जात होते. चंदनसावरगाव शिवारातील पुलाजवळ कार भरधाव वेगात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन आदळली.

धडक एवढी जोरदार होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील तिघेही वाहनात अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काढून तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८), दोघेही रा. जवळबन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या अपघातात दत्ता तपसे (वय ४३, रा. चंदनसावरगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची नवी ‘टीम’ तयार; 10 प्रवक्त्यांची नियुक्ती

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाकडून एकूण 10 प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली.

कोण आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रवक्ते?

पक्षाने नियुक्त केलेल्या 10 प्रवक्त्यांमध्ये जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, ॲड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, ॲड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.

आगामी काळात विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट करणे तसेच विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर पक्षाची अधिकृत बाजू मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असेल.

4 ऑगस्टला जुन्या नियुक्त्या रद्द

दरम्यान, 4 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यापूर्वी नियुक्त केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे याबाबत माहिती देण्यात आली होती.

त्यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील, असे स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, आता पक्षाने पुन्हा नव्या 10 प्रवक्त्यांची नियुक्ती केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपली मीडिया रणनीती अधिक आक्रमक करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नव्या प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महिलेचा विनयभंग केला तिच्या पतीने जाब विचारताच डोक्यात गजाने वार केला 

0

केज —  घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आणि त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीवर लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास ३० वर्षीय विवाहित महिला घरात एकटी असताना आबा गोरख गायकवाड हा तिच्या घरात शिरला. त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यानंतर तिच्याशी झोंबाझोंबी करून पदर ओढत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्याने २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीकडे जाऊन याबाबत जाब विचारला. यावेळी गोरख उत्तरेश्वर गायकवाड याने लोखंडी गजाने महिलेच्या पतीच्या डोक्यात वार केल्याच तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून महिला आणि तिच्या पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ११५(२), ११८(१), ३३३ आणि ३५२ अन्वये आबा गोरख गायकवाड आणि गोरख उत्तरेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार पल्लवी तरकसे तपास करीत आहेत.

एस.पी. नवनीत ची संकल्पना ठरतेय प्रभावी; ‘पोलीस आपल्या बांधावर’ने 20 वर्षांचा वाद मिटवला!

0

पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याऐवजी पोलीस थेट शेताच्या बांधावर; कावळ्याची वाडीतील दोन भावांमध्ये समेट

बीड — शेतीच्या बांधावरून सुरू होणारे छोटे वाद पुढे मोठ्या भांडणात आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नात रूपांतरित होऊ नयेत, यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत यांनी मांडलेली ‘पोलीस आपल्या बांधावर’ ही संकल्पना आता ग्रामीण भागात प्रभावी ठरत आहे. नागरिकांच्या समस्या पोलीस ठाण्यात येण्याची वाट न पाहता थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन समजून घेणे आणि संवादातून वाद मिटविणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे.

या उपक्रमांतर्गत सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळ्याची वाडी येथे तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या दोन भावांमधील शेतीच्या बांधाचा वाद अखेर मिटविण्यात आला.

याप्रकरणी Public NC No. 247/2026 आणि 248/2026 दाखल झाल्यानंतर सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतीचा बांध नुकसानग्रस्त करण्यात आल्याचे तसेच बांधावरील दगड तक्रारदाराच्या शेतात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दोन्ही पक्षांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दोन्ही भावांची बाजू ऐकून घेत वादाची पार्श्वभूमी समजून घेण्यात आली. केवळ कारवाई करण्याऐवजी संवाद, समन्वय आणि कायदेशीर मार्गाचा आधार घेत दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यात आला. परिणामी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला शेतीच्या बांधाचा वाद अखेर संपुष्टात आला.

नवनीत यांच्या संकल्पनेचा उद्देश काय?

ग्रामीण भागात शेतीची हद्द, बांध, शेतातील वाट, पाण्याचा वापर किंवा अन्य शेतीविषयक कारणांवरून वाद निर्माण होतात. अनेकदा हे वाद वर्षानुवर्षे सुरू राहतात आणि किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता असते.

हीच बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत यांनी ‘पोलीस आपल्या बांधावर’ ही नागरिककेंद्री संकल्पना पुढे आणली. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांच्या समस्या त्यांच्या ठिकाणी जाऊन समजून घ्याव्यात, वाद वाढण्यापूर्वी त्यावर संवादातून तोडगा काढावा आणि गावातील शांतता अबाधित ठेवावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

पोलिसांचा थेट बांधावर संवाद; दोन दशकांचा वाद संपला

कावळ्याची वाडीतील प्रकरण हे या संकल्पनेचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे. 20 वर्षांपासून सुरू असलेला वाद पोलिसांनी शेताच्या बांधावर जाऊन दोन्ही पक्षांशी चर्चा करून मिटवला. त्यामुळे संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही टळली आहे.

‘पोलीस आपल्या बांधावर’च्या माध्यमातून पोलीस आणि ग्रामीण नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत करण्याबरोबरच शेतीविषयक वाद वेळीच सोडविण्यावर भर दिला जात आहे. पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या या संकल्पनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात अशाच पद्धतीने प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न बीड जिल्हा पोलिसांकडून सुरू आहे.

वाद झाला तर कायदा हातात घेऊ नका!

शेतजमिनीची हद्द, बांध, वाट, पाणी अथवा अन्य कारणांवरून वाद निर्माण झाल्यास नागरिकांनी परस्पर भांडण करून परिस्थिती चिघळवू नये. कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा आणि ‘पोलीस आपल्या बांधावर’ या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, माढ्यात मंत्र्यांच्या गाडीखाली शिरला आंदोलक

0

बीड/माढा — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराटी आंतरवाली येथे सुरू झालेल्या आंदोलनाला आज दोन वेगवेगळ्या घटनांमुळे वेगळे वळण मिळाले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा गेवराई परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तर सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे एका मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनासाठी निघालेल्या बीडच्या आंदोलकाचा मृत्यू

केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी सुग्रीव बापू शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी आंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते.

त्यांचे वाहन गेवराई परिसरात आले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते सराटी आंतरवालीकडे जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. सुग्रीव शिंदे यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर नांदुर घाट परिसरासह मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

माढ्यात आंदोलकाचा मंत्र्यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनासमोर मराठा आंदोलकाने आक्रमक आंदोलन केले. बापू गायकवाड असे या आंदोलकाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांचा ताफा पुढे जात असताना बापू गायकवाड यांनी धावत जाऊन त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी थेट वाहनाखाली घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला.

यावेळी आंदोलकांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकाला वाहनाखालून बाहेर काढले. त्यानंतर मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला.

घटना घडत असताना मंत्री बाबासाहेब पाटील वाहनातच होते. त्यांनी वाहनातून खाली न उतरता परिस्थिती पाहिली.

29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून सराटी आंतरवाली येथे त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज मुंबईत धडकणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून मराठा समाजातील कार्यकर्ते आणि आंदोलक सराटी आंतरवालीकडे रवाना होत आहेत.

या पार्श्वभूमीवर बीडमधील आंदोलकाचा मृत्यू आणि माढ्यातील आंदोलनाची घटना यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची चर्चा पुन्हा एकदा राज्यभरात झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांची सुपारी घेतली आहे काय? ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याने संताप

0

बीड — रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन दिला जातो; पण त्याच ऑक्सिजनच्या ह्युमिडिफायरमध्ये चक्क गढूळ पाणी आढळत असेल, तर याला रुग्णसेवा म्हणायचे तरी कसे? बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षातील हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ह्युमिडिफायरमधील गढूळ पाणी स्पष्टपणे दिसत असतानाही ते रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी वापरले जात होते. संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर ह्युमिडिफायर बदलण्यात आला. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन देण्यापूर्वी उपकरणाची साधी पाहणीही केली जात नाही का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

डॉक्टरांनी रुग्णांची सुपारी घेतली आहे काय?

या प्रकारावर डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांची सुपारी घेतली आहे काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची? ऑक्सिजनसारख्या अत्यावश्यक उपचाराच्या उपकरणात गढूळ पाणी आढळत असेल, तर रुग्णांच्या सुरक्षिततेकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

सेमी आयसीयूमधील रुग्णाला ऑक्सिजन; ह्युमिडिफायरमध्ये गढूळ पाणी

बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी खाली आणण्यात येत होते. त्यावेळी रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन मास्क लावण्यात आला.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जोडलेल्या ह्युमिडिफायरकडे लक्ष दिल्यानंतर त्यातील पाणी गढूळ असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या प्रकाराचे छायाचित्रही समोर आले आहे.

प्रकार लक्षात येताच संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. त्यानंतर ह्युमिडिफायरमधील पाणी काढून नवीन ह्युमिडिफायर लावण्यात आला आणि ऑक्सिजन पुरवठा सुरू ठेवण्यात आला.

गढूळ पाणी दिसत असतानाही रुग्णाला ऑक्सिजन?

या घटनेचा सर्वात गंभीर भाग म्हणजे ह्युमिडिफायरमधील पाणी डोळ्यांना स्पष्टपणे गढूळ दिसत असतानाही ते उपकरण वापरात होते.

रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची स्वच्छता, देखभाल आणि नियमित तपासणी कोणाच्या जबाबदारीत आहे? ह्युमिडिफायरमधील पाणी कधी बदलले गेले? उपकरणाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण कधी झाले? याची नोंद ठेवली जाते का?

या प्रश्नांची उत्तरे रुग्णालय प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर रुग्णांच्या जीवाशी संबंधित प्रश्न

गढूळ पाणी नेमके कशामुळे झाले, त्यात कोणते घटक किंवा सूक्ष्मजीव होते, हे वेगळ्या तपासणीतून स्पष्ट होऊ शकते. मात्र रुग्णाला ऑक्सिजन देताना ह्युमिडिफायरमध्ये स्वच्छ पाणी नसणे ही बाब स्वतःमध्येच गंभीर आहे.

विशेषतः सेमी आयसीयू किंवा गंभीर रुग्णांच्या उपचाराच्या ठिकाणी उपकरणांची स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे.

आधी शस्त्रक्रियेचा प्रकार, आता ह्युमिडिफायर

काही दिवसांपूर्वी वडवणी येथील संध्या सूरज पवार यांच्या सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य शरीरात राहिल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर संसर्ग झाल्याने गंभीर शस्त्रक्रिया करावी लागल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचार व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

“पाणी गढूळ दिसत असतानाही जबाबदारी कोणाची?”

डॉ. गणेश ढवळे यांनी या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. ह्युमिडिफायरची देखभाल, पाणी बदलण्याची प्रक्रिया, उपकरणांचे निर्जंतुकीकरण आणि ऑक्सिजन प्रणालीची नियमित तपासणी याबाबत रुग्णालय प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणी पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

आता कारवाई कधी?

रुग्णालय म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट संबंधित व्यवस्था. तिथे एखाद्या उपकरणातील पाणी गढूळ दिसत असताना ते रुग्णाच्या उपचारासाठी वापरले जात असेल, तर “हे असे झाले कसे?” याचे उत्तर शोधणे प्रशासनाचे कर्तव्य आहे.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या माणसाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था आहे की निष्काळजीपणामुळे त्याचा जीव धोक्यात घालण्यासाठी?

डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केलेला “जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांची सुपारी घेतली आहे काय?” हा सवाल त्यामुळे केवळ संतापाची प्रतिक्रिया न राहता, रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

गेवराईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 28.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — जिल्ह्यातील अवैध जुगार व इतर अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला वेग आला असून, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने गेवराई तालुक्यातील देवकी येथे जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. बंद हॉटेल तुळजाई येथे टाकलेल्या छाप्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 8 लाख 59 हजार 260 रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 28 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


भारत यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धडक
देवकी गावाच्या हद्दीतील गट क्रमांक 137 मधील बंद हॉटेल तुळजाई येथे काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच भारत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता पंचांसमक्ष हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान काही इसम जुगार खेळताना आढळून आले. पथकाने घटनास्थळावरून 8,59,260 रुपये रोख, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी, नऊ मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 28.59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 मधील कलम 4 व 5 अन्वये 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

भारत यांच्या नेतृत्वाखाली पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर आणि गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस शिपाई अक्षय, अविनाश, चालक पोलीस शिपाई योगेश तसेच QRT पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

अपहृत अल्पवयीन मुलगी तरुणासह पुण्यातून ताब्यात, वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे निष्पन्न

0

केज — ऊसतोड मजुराच्या १३ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुणे येथून संबंधित अल्पवयीन मुलीला आणि तिचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब २०२५-२६च्या ऊसतोड हंगामासाठी कर्नाटकातील बागलपूर जिल्ह्यातील मुधोळ परिसरातील एका साखर कारखान्यावर गेले होते. जानेवारी २०२६मध्ये ग्रामदैवताच्या यात्रेसाठी कुटुंब गावी परतले होते.

७ जानेवारी रोजी देवदर्शनानंतर घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरात दिसून आली नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता रोहन अर्जुन समुद्रे याने मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मुलीच्या आईने २३ एप्रिल २०२६ रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून रोहन शंकर समुद्रे, अर्जुन शंकर समुद्रे, करण अर्जुन समुद्रे आणि मीरा अर्जुन समुद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०८/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी पुणे येथून आरोपी तरुणासह अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करीत असून, अल्पवयीन मुलीची सुरक्षितता, तिच्यावरील अत्याचाराचे स्वरूप तसेच प्रकरणातील इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे.