Home Blog Page 8

परळीतील ओंकार साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची टांगती तलवार

0

४.४७ कोटींची एफआरपी थकीत

परळी — परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ४ कोटी ४७ लाख ६ हजार रुपये अद्याप थकीत असल्याने साखर आयुक्तालयाने कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थकीत एफआरपीसोबतच त्यावर १५ टक्के व्याज वसूल करण्याचेही आदेशात नमूद आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर गेल्या वर्षी ओंकार ग्रुपला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय जड अंतःकरणाने घेतल्याचे तत्कालीन संचालक पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. मात्र, कारखान्याशी संबंधित आर्थिक अडचणी अद्याप कायम असल्याचे एफआरपी थकबाकीच्या प्रकरणातून समोर आले आहे.

४.४७ कोटींची एफआरपी बाकी

साखर आयुक्तालयाच्या ३१ जुलै २०२६ रोजीच्या अहवालानुसार, ओंकार कारखान्याने २०२५-२६ हंगामात ३ लाख ४० हजार ९१६ टन उसाचे गाळप केले. या उसापोटी कारखान्यावर एकूण ७६ कोटी १४ लाख ६५ हजार रुपये एफआरपी देय होती. त्यापैकी ७१ कोटी ६७ लाख ५९ हजार रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. मात्र, ४ कोटी ४७ लाख ६ हजार रुपये अद्याप थकीत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

एफआरपीची रक्कम विहित मुदतीत न दिल्यास संबंधित थकबाकीवर १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार थकीत एफआरपी आणि व्याजाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

साखर, मोलॅसिस, बगॅस विकून वसुलीचे निर्देश

साखर आयुक्तांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी मालमत्ता जप्तीचा आदेश जारी केला आहे. कारखान्याकडे असलेली साखर, मोलॅसिस, बगॅस यांसारखी उत्पादने विकून थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातूनही पूर्ण वसुली न झाल्यास आवश्यकतेनुसार तारण नसलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून तिची नियमानुसार विक्री करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

या आदेशाची प्रत अंमलबजावणीसाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. संबंधित ऊस उत्पादकांची प्रमाणित यादी तसेच कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.

आंदोलनानंतरही शेतकऱ्यांची थकबाकी कायम

थकीत एफआरपीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने ८ व ९ मे तसेच १ ते ३ जून या कालावधीत कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी कारखाना प्रशासनाने थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. परमेश्वर गित्ते यांनी केला आहे.

साखर आयुक्तांनी आदेश देऊन तीन आठवडे उलटूनही मालमत्ता जप्तीची कारवाई अपेक्षित वेगाने होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. थकीत एफआरपीची तातडीने वसुली न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे.

बीडमध्ये म्हैस चोर पकडला; चोरीचे तीन गुन्हे उघड

0

बीड — सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या म्हैस चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी मुंजा भगवान मोरे (वय 26, रा. कारी, ता. धारूर, जि. बीड) याला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चौकशीत तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 244/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार म्हैस चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सिरसाळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्याकडून सुरू होता.
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मुंजा मोरे हा म्हैस चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असून तो म्हतारगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करत त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने सिरसाळा हद्दीतील म्हैस चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवड गावातूनही म्हैस चोरी केल्याचे उघड झाले. तसेच त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता तीही परंडा येथून चोरी केल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईमुळे सिरसाळा, केज आणि परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक चेतना आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी अभिजीत दीपके आक्रमक; सर्व शिक्षणमंत्र्यांना ६ सवाल

0

नवी दिल्ली — देशातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था, शिक्षकांची रिक्त पदे आणि शिक्षणासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या वापराबाबत कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडून नेमकी कोणती पावले उचलली जात आहेत, याचा जाब त्यांनी या पत्रातून विचारला आहे.


अभिजीत दीपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ते आणि त्यांची टीम देशभरातील विविध सरकारी शाळांना भेट देत असून, तेथील पायाभूत सुविधांची वास्तविक परिस्थिती समोर आणत आहेत. त्यानंतर आता त्यांनी सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडे शाळांची सद्यस्थिती स्पष्ट करणारी माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

मूलभूत सुविधांसाठी मुलांना संघर्ष का करावा लागतो?

स्वातंत्र्याला जवळपास ८० वर्षे होत असतानाही देशातील अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे, सुरक्षित वर्गखोल्या आणि बसण्यासाठी बाके यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा दीपके यांनी उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर सरकारी शाळांची जी छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत, ती चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक मुलाला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

शिक्षण व्यवस्थेबाबत सरकारला ६ थेट प्रश्न

अभिजीत दीपके यांनी राज्य सरकारांकडून खालील सहा मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागितली आहे.
१. शाळांच्या दुरुस्तीची स्थिती काय?
गेल्या पाच वर्षांत किती सरकारी शाळांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले? सध्या किती शाळांना दुरुस्तीची अथवा पूर्ण नूतनीकरणाची गरज आहे?
२. शिक्षकांची किती पदे रिक्त?
सरकारी शाळांमध्ये एकूण किती शिक्षक पदे मंजूर आहेत? त्यापैकी किती पदे भरली आहेत आणि किती पदे अद्याप रिक्त आहेत?
३. मंजूर निधीपैकी किती खर्च झाला?
गेल्या पाच वर्षांत सरकारी शाळांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी प्रत्यक्ष किती निधी खर्च करण्यात आला?
४. आणखी किती सरकारी शाळांची गरज?
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी राज्यात आणखी किती सरकारी शाळांची आवश्यकता आहे?
५. शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त कोणती कामे?
अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त सरकारी शाळांमधील शिक्षकांना कोणकोणत्या गैर-अध्यापन जबाबदाऱ्या सोपवल्या जातात?
६. डिजिटल व मूलभूत सुविधा किती शाळांमध्ये?
किती सरकारी शाळांमध्ये संगणक, डिजिटल शिक्षण सुविधा, स्वच्छ व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान आणि आवश्यक क्रीडा साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे?

हा राजकारणाचा नाही, मुलांच्या भविष्याचा प्रश्न

हा मुद्दा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा नसून देशातील मुलांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती काय आहे, यावर त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा फरक पडू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वर्गखोली, स्वच्छ पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृह, बसण्यासाठी बाक आणि शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने सरकारी शाळांची वास्तविक स्थिती आणि उपलब्ध निधीचा वापर याबाबतची माहिती जनतेसमोर जाहीर करून शाळांच्या सुधारणेला युद्धपातळीवर प्राधान्य द्यावे, अशी मागणी दीपके यांनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित; ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५,०८६ कोटींचा लाभ

0

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५,०८६ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५,०२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. त्या वेळी ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता.

दोन टप्प्यांत १२.५८ लाख शेतकऱ्यांना लाभ

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाकडून कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे नेली जात आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे नियोजन आहे. तसेच २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलने केली. सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर योजना जाहीर करण्यात आली.

सुरुवातीला २०१९च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत काही मर्यादा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर या निर्णयात बदल करून अशा शेतकऱ्यांचेही २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

योजनेसाठी ४०,९८० कोटींचा खर्च अपेक्षित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारला अंदाजे ४० हजार ९८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या वेळोवेळी अद्ययावत केली जात असून, कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याची “मुळे” खोलवर; एसआयटीने मागितली पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ 

0

मुंबई — राज्यातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सुमारे तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतांची पडताळणी करण्याचे काम एसआयटीमार्फत सुरू आहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही तपासणी पूर्ण झालेली नसून, शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने तपासाला वेळ लागत आहे. त्यामुळे एसआयटीने शासनाकडे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.


नागपूरमधील काही अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी कथितरीत्या बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाकडून वेतन घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी आणि प्रकरणे समोर आली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन केली. राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील अल्पसंख्यांक आणि बिगर-अल्पसंख्यांक संस्थांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता तसेच शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आलेल्या शालार्थ आयडीची पडताळणी करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली.

सहा महिन्यांनंतरही पडताळणी अपूर्ण

एसआयटीला सुरुवातीला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. निर्धारित कालावधीत तपासणी पूर्ण न झाल्याने समितीला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही वाढीव मुदत ७ ऑगस्ट रोजी संपली, मात्र पडताळणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेबाहेर झालेल्या भरतीतील पदांचीही तपासणी केली जात आहे. यासाठी उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर नियमित प्रशासकीय जबाबदाऱ्या असल्याने तपासणीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर होण्याची शक्यता

तपासणीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने एसआयटीने शासनाकडे पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तपासणी पूर्ण करून ३० नोव्हेंबरपूर्वी शासनाला अहवाल सादर करण्याचे नियोजन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, बनावट शालार्थ आयडी आणि बोगस वैयक्तिक मान्यतांबाबत एसआयटी तसेच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

थर्ड पार्टी तक्रारींवरील कारवाईचा मार्ग मोकळा

शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतेसंदर्भातील तक्रारींमध्ये त्रयस्थ व्यक्तीने केलेल्या तक्रारींवर कारवाई करावी की नाही, याबाबत यापूर्वी संभ्रम होता. त्यामुळे अनेक तक्रारी प्रलंबित होत्या.

मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीवरही संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना कार्यवाही करता येणार आहे. त्यासाठी तक्रारदाराला आपल्या तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद करणारे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता आणि पवित्र पोर्टलच्या बाहेरील भरतीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि दोषी घटकांची भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोचिंग क्लासेसला सरकारचा लगाम; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद

0

मुंबई — नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर (नोंदणी आणि नियमन) विधेयक, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा मसुदा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यात कोचिंग सेंटरची अनिवार्य नोंदणी, शुल्क नियंत्रण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच नियमभंग करणाऱ्यांवर ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

मसुद्यावर नागरिकांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील खासगी कोचिंग सेंटरना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे.

२५ विद्यार्थ्यांपासूनच कायद्याच्या कक्षेत

महाराष्ट्राच्या प्रस्तावित कायद्याची व्याप्ती तुलनेने व्यापक आहे. २५ पेक्षा अधिक विद्यार्थी असलेले ट्युशन किंवा कोचिंग सेंटर या नियमनाच्या कक्षेत येणार आहेत. राजस्थानमध्ये १००, तर आसाममध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या केंद्रांना संबंधित नियम लागू होतात. त्यामुळे महाराष्ट्रात तुलनेने लहान कोचिंग क्लासेसनाही प्रस्तावित कायद्याचे पालन करावे लागणार आहे.

कायदा लागू झाल्यानंतर विद्यमान क्लासेसना नोंदणीसाठी सहा महिन्यांची मुदत मिळेल. नोंदणी तीन वर्षांसाठी वैध राहणार असून, शुल्क, सुरक्षा, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल.

CCTV आणि अग्निसुरक्षा अनिवार्य

कोचिंग सेंटरमध्ये किमान एक महिन्याचे CCTV फुटेज जतन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर अग्निसुरक्षा आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्र घेणेही बंधनकारक करण्यात येणार आहे. तपास यंत्रणेला आवश्यकतेनुसार केंद्राची झडती घेणे, कागदपत्रे व CCTV फुटेज ताब्यात घेणे आणि परिसर सील करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

डमी स्कूल आणि इंटिग्रेटेड कोचिंगला ब्रेक

विद्यार्थ्याचे नाव शाळेत असले, तरी प्रत्यक्ष शिक्षणाचा बहुतांश वेळ कोचिंग क्लासमध्ये घालविण्याच्या ‘डमी स्कूल’ पद्धतीवर बंदी आणण्याची तरतूद मसुद्यात आहे. मान्यताप्राप्त शाळा आणि कोचिंग सेंटरमधील ‘इंटिग्रेशन’लाही मनाई करण्यात येणार आहे.

शाळा अशा प्रकारच्या नियमभंगात सहभागी असल्याचे आढळल्यास तिची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस करण्याची तरतूद आहे. याशिवाय तळघरात कोचिंग क्लास चालविण्यास पूर्ण बंदी असेल.

विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी

विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक आरोग्याचा विचार करून दररोजच्या अध्यापनाला जास्तीत जास्त पाच तासांची मर्यादा प्रस्तावित करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे बंधनकारक असेल. सुट्टीच्या दुसऱ्याच दिवशी परीक्षा घेता येणार नाही. मोठ्या सणांच्या काळातही सुट्ट्यांचे नियोजन करावे लागणार आहे.

कोचिंग सेंटरला विद्यार्थ्यांसाठी क्षमता चाचणी आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक असेल.

शुल्क वाढविता येणार नाही; क्लास सोडल्यास पैसे परत

कोचिंग सेंटरने जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम विद्यार्थ्याकडून आकारता येणार नाही. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर शुल्क वाढविण्यासही मनाई असेल.

विद्यार्थ्याने अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास न वापरलेल्या कालावधीचे शुल्क परत करावे लागेल. लागू असल्यास वसतिगृह आणि मेसचे शुल्कही १० दिवसांच्या आत परत करण्याची तरतूद आहे. क्लासच्या संकेतस्थळावर शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, शुल्क आणि परतावा धोरण जाहीर करणे बंधनकारक असेल.

गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या नियुक्तीवर निर्बंध

भारतीय न्याय संहिता किंवा जुन्या भारतीय दंड संहितेनुसार ज्याच्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल आहे, अशा व्यक्तीची शिक्षक किंवा कर्मचारी म्हणून नियुक्ती करता येणार नाही. या बाबतीत महाराष्ट्राचा प्रस्ताव राजस्थान आणि आसामच्या तुलनेत अधिक कठोर असल्याचे दिसून येते.

नियमभंग केल्यास ५० लाखांपर्यंत दंड

प्रस्तावित कायद्यात नियमभंगासाठी कठोर दंडाची तरतूद आहे.

  • किरकोळ उल्लंघनासाठी १ ते ५ लाख रुपये दंड
  • पुनरावृत्ती झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड
  • नोंदणीशिवाय क्लास चालविणे, खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात करणे यांसारख्या गंभीर उल्लंघनांसाठी १० ते ५० लाख रुपयांपर्यंत दंड
  • गरजेनुसार केंद्राचे निलंबन, बंद किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई

POCSO किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंदर्भातील कायद्यांतर्गत तक्रार प्राप्त झाल्यास २४ तासांच्या आत कारवाई करण्याची जबाबदारीही कोचिंग सेंटरवर टाकण्यात आली आहे.

१३ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

मसुद्यानुसार १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या जानेवारी २०२४ मधील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किमान वय १६ वर्षे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम कायद्यात या वयोमर्यादेबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणानंतर सुमारे तीन महिन्यांनी महाराष्ट्र सरकारने कोचिंग क्षेत्राच्या नियमनासाठी हा मसुदा आणला आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या १३ आरोपींपैकी नऊ जण महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले होते. लातूर आणि पुणे या राज्यातील प्रमुख कोचिंग केंद्रांशी संबंधित बाबींचीही तपासात चर्चा झाली होती.

मसुदा अंतिम स्वरूपात लागू झाल्यास कोचिंग सेंटरची नोंदणी, शुल्क, शिक्षकांची नियुक्ती, विद्यार्थ्यांचे मानसिक व शैक्षणिक आरोग्य, सुरक्षा, जाहिरात आणि प्रशासनावर कठोर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्षेत्राच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

गेवराईत अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; 35.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — धुळे-सोलापूर महामार्गावरून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर बीड स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. गेवराई परिसरातील हॉटेल डिसेंटसमोर पहाटे केलेल्या या कारवाईत सुमारे 15 ब्रास वाळूसह अशोक लेलँड ट्रक असा एकूण 35 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे यांच्या पथकाकडून गेवराई परिसरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी धुळे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल डिसेंटसमोर एका ट्रकमधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष पहाटे सुमारे 2.30 वाजता छापा टाकला. यावेळी अशोक लेलँड कंपनीचा केशरी रंगाचा MH-26-BE-0115 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 15 ब्रास वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा पास नसल्याचे वाहनातील व्यक्तींनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणात जितेंद्र राजेंद्र नेमाणे (23) आणि गणेश राजेंद्र नेमाणे (24), दोघे रा. नारायणगाव, ता. अंबड, जि. जालना, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रक आणि वाळू असा एकूण 35 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 503/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर आणि गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस अंमलदार मनोज परजणे, बबन सलगर आणि अश्पाक सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सदावर्तें विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा; मनोज जरांगेंवरील वक्तव्याने वाद पेटला

0

बीड — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असतानाच बीडमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रस्तावित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये काढलेल्या विराट मोर्चादरम्यान केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत तसेच शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर जरांगे समर्थकांकडून आक्षेप घेण्यात आला.

जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप करत समर्थक गंगाधर काळकुटे यांनी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सदावर्ते यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाची भूमिका घेत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही प्रतिआंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली असतानाच सदावर्ते यांच्याविरोधातील या कारवाईने बीडमधील वातावरण आणखी चर्चेत आले आहे.

दरम्यान, सदावर्ते यांच्या भाषणातील नेमकी वक्तव्ये, त्यांचा संदर्भ आणि तक्रारीतील आरोप याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट होणार आहे.

दुसरीतील बालिकेवर सामूहिक अत्याचार;जाब विचारताच आईला मारहाण 

0

केज — तालुक्यातील लाडेगाव येथे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या बालिकेवर दोन जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित बालिकेच्या आईने आरोपींच्या घरी जाऊन जाब विचारला असता आरोपींच्या नातेवाईकांनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १ मे ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वैभव विष्णू अंबाड आणि मयूर चंद्रकांत अंबाड यांनी बालिकेला विविध कारणांचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मे महिन्यात पहिल्यांदा बालिकेला आमिष दाखवून घरी बोलावण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर संबंधित दोघांनी पुढील काळातही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित बालिकेची आई आरोपींच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. यावेळी लक्ष्मण नरसु अंबाड आणि चंद्रकांत लक्ष्मण अंबाड यांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने २१ ऑगस्ट रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून वैभव अंबाड, मयूर अंबाड, लक्ष्मण अंबाड आणि चंद्रकांत अंबाड या चौघांविरुद्ध लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पावसाचा खंड, बीड-शिरूरमध्ये खरीप पिके करपली; पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या – डॉ. योगेश क्षीरसागर

0

बीड —  बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर कासार तालुक्यात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाने या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने संयुक्त पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदतीसह पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, बीड व शिरूर कासार तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. प्रारंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, ऐन सोयाबीन शेंगा भरण्याच्या आणि कापूस पाते -बोंड धरण्याच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पावसाने दीर्घकाळ दडी मारली. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक भागांत उभी पिके करपून गेली आहेत. पावसाअभावी परिसरातील नदी-नाले, विहिरी आणि साठवण तलावांमधील पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पर्यायी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतीबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. बियाणे, खते, औषधे व मशागतीसाठी कर्ज काढून केलेला खर्चही आता वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महसूल, कृषी व संबंधित यंत्रणांमार्फत दोन्ही तालुक्यातील गावनिहाय पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना निकषानुसार तत्काळ आर्थिक सहाय्य, पीकविम्याची भरपाई आणि शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.