बीड ग्रामीण पोलिसांचा तपास पूर्ण; CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांनंतर न्यायालयात अहवाल सादर होणार
बीड — जिल्ह्यातील चर्चित धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यातील परस्पर तक्रारींच्या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना मिळालेल्या CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे धनंजय पंडितराव देशमुख (रा. मस्साजोग, ता. केज) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात समाधान खिंडकर आणि इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दुसरीकडे, समाधान बाबुराव खिंडकर (रा. बेलवाडी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 192/2026 दाखल करण्यात आला होता. या तक्रारीत धनंजय देशमुख आणि इतर दोन ते तीन जणांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
CCTV तपासात धक्कादायक निष्कर्ष
दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज जप्त करून त्याची सखोल पडताळणी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड अथवा संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही.
30 मे 2026 रोजी रात्री 10.05 ते 12.00 या कालावधीतील फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, फिर्यादींनी नमूद केलेली कोणतीही घटना त्या फुटेजमध्ये घडल्याचे दिसून आले नाही.
साक्षीदारांच्या जबाबातूनही तक्रारी खोट्या
तपासादरम्यान घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. हे जबाब BNSS कलम 105 अंतर्गत ई-साक्ष पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर दोन्ही तक्रारी तथ्यहीन आणि खोट्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
न्यायालयात सविस्तर अहवाल सादर होणार
दोन्ही फिर्यादींनी जाणूनबुजून खोटी माहिती देत पोलीस आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल संबंधित न्यायालयात सादर करण्यात येणार असून, खोटी तक्रार देणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बीड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही वैयक्तिक किंवा इतर कारणांसाठी पोलीस व न्याय यंत्रणेचा गैरवापर करू नये. खोटी तक्रार देणे, दिशाभूल करणारी माहिती पुरवणे किंवा खोटे आरोप करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.




