बीड — मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेतील पिस्तूल काढून डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी समाधान खिंडकर (वय 30, रा. बेलवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या मित्रांसोबत बीड बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी रवीराज साबळे हे देखील तेथे उपस्थित होते. इंस्टाग्रामवर लाईव्ह सुरू असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मोबाईल का घेतला, अशी विचारणा केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त करत धमकी दिली. तसेच अंगरक्षकाच्या कमरेतील पिस्तूल काढून फिर्यादीच्या डोक्याला लावत “तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांच्याविरुद्धच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.




