Home Blog Page 9

राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद; ‘महिलांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची खरी ताकद’

0

पुणे — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झालेल्या या कार्यक्रमात राहुल गांधी मंचावर येताच ‘राहुल-राहुल’ अशा घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी राजकीय भाषण न करता विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याची संधी दिली. “आज मी राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही. तुम्ही काय विचार करता आणि काय करू इच्छिता, हे मला सांगा,” असे म्हणत त्यांनी संवादात्मक पद्धतीने चर्चा केली.

महिला म्हणून नव्हे, सर्वप्रथम माणूस म्हणून पाहते

महिलांवरील नियंत्रण आणि पितृसत्ताक व्यवस्थेबाबत राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी चर्चा केली. पुरुष महिलांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का करतात, असा प्रश्न त्यांनी एका विद्यार्थिनीला विचारला.

यावर संबंधित विद्यार्थिनीने आपण स्वतःकडे सर्वप्रथम एक माणूस म्हणून पाहत असल्याचे सांगितले. ‘तू एक महिला आहेस’ अशा चौकटीत आपली ओळख मर्यादित केली जाते, तेव्हा राग येतो, अशी भावनाही तिने व्यक्त केली.

महिलांच्या हक्काला ‘हिस्सेदारी’ का?

कुटुंबातील मालमत्ता आणि हक्काच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी संवाद साधला. पुरुष कुटुंबातील हिस्सा मागतो तेव्हा त्याला ‘अधिकार’ म्हटले जाते; मात्र महिला त्याच हक्काची मागणी करते तेव्हा त्याला ‘हिस्सेदारी’ म्हटले जाते, असे त्यांनी नमूद केले.

यावर एका महिलेने सांगितले की, अनेक कुटुंबांमध्ये महिलांकडून नोकरी करण्यासोबतच घरकाम, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्याचीही अपेक्षा केली जाते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ नोकरी केल्यानंतरही घरातील जबाबदाऱ्या महिलांवरच टाकल्या जात असल्याचे तिने सांगितले.

७० कोटी महिलांची स्वप्ने ही भारताची ताकद

भारताच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना केवळ सैन्य किंवा इतर शक्तींकडे पाहण्यापेक्षा देशातील महिलांच्या क्षमतेकडे पाहण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशातील ७० कोटी महिलांची स्वप्ने आणि त्यांचे विचार हीच भारताची खरी ताकद आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

महिलांची ओळख केवळ पत्नी, मुलगी किंवा आई या नात्यांपुरती मर्यादित करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही नाती महत्त्वाची असली तरी प्रत्येक महिलेची स्वतंत्र ओळख, तिची स्वप्ने आणि तिचे विचार यांनाही तितकेच महत्त्व असले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

मनुस्मृतीचा उल्लेख करत पितृसत्ताक विचारांवर टीका

राहुल गांधी यांनी यावेळी मनुस्मृतीचा संदर्भ देत महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. बालपणी वडील, तारुण्यात पती आणि वृद्धापकाळात मुलांवर महिला अवलंबून राहावी, अशा विचारसरणीचा उल्लेख करत त्यांनी अशा मानसिकतेवर टीका केली.

दरम्यान, पुण्यातील या कार्यक्रमाला पोलिसांकडून ३० अटींसह परवानगी देण्यात आली होती. विद्यार्थिनींशी झालेल्या या संवादात महिलांचे स्वातंत्र्य, समान हक्क, कुटुंबातील भूमिका आणि स्वतंत्र ओळख हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.

बिंदुसरा बंधाऱ्यामुळे बीडचा ‘ड्राय झोन’ होणार पाणीदार;आ. संदीप क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये

0

बार्शी नाका येथील पूल कम बंधार्‍याच्या कामाची पाहणी करून, काम ऑक्टोबरच्या अगोदर करण्याच्या दिल्या सूचना

बीड — शहराला होणारा विलंबाचा पाणीपुरवठा आणि पावसाची ओढ यामुळे माजलगाव धरणात सध्या अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात बीड शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस झाल्यास ते पाणी नदीमार्गे वाहून जाऊ नये, यासाठी आमदार संदीप क्षीरसागर सतर्क झाले आहेत. शहरातील बार्शी नाका येथे सुरू असलेल्या पूल कम बंधार्‍याच्या कामाला गती देऊन ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसात पाणी अडलेच पाहीजे, अशा हिशोबाने कामाची गती वाढविण्याच्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

शनिवारी (दि. २२) रोजी आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांनी बिंदुसरा नदीवर सुरू असलेल्या ‘पूलकम बंधारा’ कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पूल कम बंधार्‍याच्या माध्यमातून बीड शहरातील ५ कि.मी.च्या परिघात भूजल पातळीत मोठी वाढ होणार असल्याने आ.क्षीरसागर यांनी कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांना येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी अडवलेच पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

शहराची गरज ओळखून प्लॅन मध्ये अंशतः बदल

आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने प्रयत्न करीत हा पूलकम बंधारा मंजूर करुन आणला त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान बंधार्‍याच्या अगोदरच्या प्लॅनमुळे पाणी साठवणूक कमी होत असल्याचे लक्षात येताच आ. संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा बंधाऱ्याचा प्लॅन बदलून घेतला आहे. यामुळे आता पाणी साठवणूकीत लक्षणीय वाढ होणार आहे आणि परिणामी बंधार्‍याच्या ५ कि.मी. च्या परिघात भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत बीड शहराला मोठा फायदा होणार आहे.

शहरातील ड्राय झोन होणार पाणीदार

शहरातील काही भागात ५० ते ६० फुटावर पाणी लागतो व जवळपास १५० फूट बोअर घेतले तरी उन्हाळ्यात ही राहातं मात्र शहरातील अंकुशनगर, संत नामदेव नगर, तेलगाव नाका, दारुल उलूम ते बायपास हा भाग ड्राय झोन मानला जातो, ३०० फूट बोअर घेतले तरी पाणी लागत नाही. यामुळे आता या पूलकम बंधार्‍याने पाणी अडल्यानंतर भूजल पातळीत वाढ होऊन हा ड्राय झोन ही निश्चितपणे पाणीदार होणार आहे अशी माहिती आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली.

खांडेपारगाव शिवारात गुटख्याची वाहतूक उघड; 8.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुटखा आणि इनोव्हा कार असा एकूण 8 लाख 55 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी मौजे खांडेपारगाव शिवारातील उमरी ते खांडेपारगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिंपळनेर-बीड मार्गावरून पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार गुटखा घेऊन बीडकडे येत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

दरम्यान, खांडेपारगाव शिवारातील कच्च्या रस्त्यावर संशयित इनोव्हा कार (MH 12 GZ 1952) आढळून आली. पोलिसांनी वाहनावर छापा टाकला असता कारच्या पुढील सीटवर दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यापैकी एकाने पोलिसांची चाहूल लागताच वाहन थांबवून शेताच्या दिशेने पळ काढला, तर दुसरा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात मिळून आला.

वाहनाची झडती घेतली असता मागील सीटवर विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि वाहन असा एकूण 8,55,950 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी सचिन भिमराव माटे (वय 34, रा. भीमनगर, गेवराई) आणि रशीद सय्यद (रा. उमापूर, ता. गेवराई) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 259/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 273, 274, 223 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम , पोलीस हवालदार अर्जुन, गोविंद, पोलीस अंमलदार अश्पाक , मनोज , बबन आणि चालक पोलीस हवालदार नितीन  यांच्या पथकाने केली.

एसआयटीची ‘उंटावरून शेळ्या राखणे’ सुरूच! बीड बोगस शिक्षक भरतीत जावक रजिस्टरचे पुरावे समोर

0

बीड —  बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरण आता जावक रजिस्टरमधील नोंदींपर्यंत पोहोचले आहे. सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीतील जावक रजिस्टरमध्ये हस्तलिखित नोंदींच्या जागी टायपिंग केलेले कागद चिकटवून बोगस मान्यता आणि जावक क्रमांक नोंदविण्यात आल्याचे पुराव्यांसह उघडकिस आले आहे. यातूनच भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” किती खोलवर रुजले आहेत याची पोलखोल होऊ लागली आहे. भ्रष्टाचारातील “चंद्र” कलांनी शिक्षण विभागाच्या कारभारालाच काळोखी फासण्याचे काम केलं आहे ‌‌

यासंदर्भात इंजि. सादेक इनामदार यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग आणि एसआयटीकडे निवेदन देत संबंधित रजिस्टर ताब्यात घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या प्रकरणात माजी शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या स्वाक्षरीच्या कायम मान्यता आणि शिक्षण सेवक पदांच्या मान्यता हा महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. या मान्यतांचे जावक क्रमांक, संबंधित कालावधीतील नोंदी आणि त्यानंतर जावक रजिस्टरमध्ये करण्यात आलेले बदल यांची साखळी तपासल्यास या प्रकरणाचे अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात.

देवगुडे यांच्या स्वाक्षरीच्या मान्यता; मग जावक क्रमांक गेले कुठे?

सन २०१२ पूर्वी काही खासगी संस्थांना देण्यात आलेल्या कायम मान्यता आणि शिक्षण सेवक पदांच्या मान्यता माजी शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या स्वाक्षरीच्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र या मान्यतांचे जावक क्रमांक मूळ जावक रजिस्टरमध्ये शोधताना विसंगती आढळून येत असल्याचे पुराव्यांसह मांडण्यात आले आहे.

मान्यता अधिकृत असतील, तर त्यांचे जावक क्रमांक मूळ रजिस्टरमध्ये स्पष्टपणे असायला हवेत. मग हस्तलिखित नोंदींच्या जागी टायपिंग केलेले कागद का चिकटविण्यात आले?

हा प्रश्न आता केवळ शिक्षण विभागापुरता राहिलेला नाही; तो थेट सरकारी रेकॉर्डच्या विश्वासार्हतेशी जोडला गेला आहे.

हस्तलिखित नोंदींच्या जागी टायपिंगचे कागद!

निवेदनासोबत सादर केलेल्या पुराव्यांमध्ये जावक रजिस्टरमधील नोंदींच्या स्वरूपातील फरक दाखविण्यात आला आहे. काही ठिकाणी मूळ हस्तलिखित नोंदींच्या जागी टायपिंग केलेले कागद चिकटविण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

काही जिल्ह्याबाहेरील पत्रव्यवहाराच्या नोंदी असलेल्या जागी कथित बोगस शिक्षक मान्यता आणि शिक्षण सेवक पदांच्या मान्यतांचे जावक क्रमांक बसविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सरकारी रजिस्टरमध्ये नोंद बदलली असेल, तर बदल कोणी केला? कागद कोणी तयार केला? तो रजिस्टरला कोणी चिकटवला? आणि या सगळ्याला प्रशासकीय मान्यता कोणी दिली?

या प्रश्नांची उत्तरे तपासातून बाहेर येणे आवश्यक आहे.

मागील तारखांच्या मान्यता; पदे कुठून आली?

निवेदनात संबंधित संस्थांच्या संचमान्यता, उपलब्ध पदे आणि शिक्षक नियुक्त्यांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

मान्यता देण्यात आली त्या वेळी संस्थांकडे संबंधित पदे उपलब्ध होती का? पायाभूत पदे आधीच भरलेली असताना शिक्षण सेवकांच्या नियुक्त्यांना मान्यता कशी मिळाली? मान्यतेची तारीख, नियुक्तीची तारीख आणि जावक क्रमांक यांचा परस्पर ताळमेळ बसतो का?

या सर्व कागदपत्रांचा एकत्रित तपास झाला तरच मान्यतांची खरी साखळी स्पष्ट होऊ शकते.

जावक क्रमांक उपलब्ध नसताना रजिस्टरमध्ये नोंदी कशा?

निवेदनानुसार, काही मागील तारखेच्या मान्यतांसाठी संबंधित काळातील जावक क्रमांक उपलब्ध नसल्याने नंतर रजिस्टरमध्ये नोंदी बसविण्यात आल्याचे पुराव्यांसह मांडण्यात आले आहे.

यामुळे मूलभूत प्रश्न उभा राहतो—मान्यता आधी तयार झाल्या आणि जावक रजिस्टरमधील नोंदी नंतर तयार करण्यात आल्या का?

याचे उत्तर काढण्यासाठी कार्यालयीन पत्रव्यवहाराची कागदपत्रे पुरेशी नाहीत. मूळ जावक रजिस्टर तपासणे अनिवार्य आहे.

एसआयटीच्या ‘उंटावरून शेळ्या राखणे’ सुरूच!

बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाली; पण ज्या जावक रजिस्टरमध्ये फेरफाराचे पुरावे सादर करण्यात आले आहेत, त्याची प्रत्यक्ष तपासणी करण्याऐवजी मोबाइल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती घेतली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार झाला आहे की नाही, हे ठरविण्यासाठी मूळ रजिस्टर, त्यातील कागद, नोंदी, जावक क्रमांक आणि त्यांचा क्रम तपासणे गरजेचे असताना व्हॉट्सॲपवर कागदपत्रे मागवून आणि मोबाइलवरून माहिती घेऊन एवढ्या मोठ्या प्रकरणाचा तपास कितपत पुढे जाईल?

ही पद्धत म्हणजे ‘उंटावरून शेळ्या राखण्यासारखी’ नाही का? तपासाला गती न देता वेळ काढून धंदा करून एस आय टी एक प्रकारे भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्यासाठी प्रयत्नशील तर नाही ना? एसआयटी मॅनेज करण्यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक असल्याचे भासवून एस आय टी मॅनेज करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या “चंद्र”कला दाखवण्यात वाकबगार असलेल्या संस्थाचालकाने शिक्षकांकडून लाखो रुपयाचा निधी गोळा केल्याचं समोर आलं होतं. याच्या चर्चा शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात झाल्या गेल्या. मग एस आय टी मॅनेजचे संस्थाचालकाने खूपसलेले वावड्यांचे “मूळे” सत्य होते काय ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

व्हॉट्सॲपवरून रजिस्टरची सत्यता कशी ठरणार?

व्हॉट्सॲपवर पाठविलेला कागद आणि कार्यालयाकडून दिलेली माहिती यावरून मूळ शासकीय रजिस्टरमध्ये नंतरच्या काळात फेरफार झाला आहे की नाही, हे निश्चित करता येणार नाही.

रजिस्टरमध्ये टायपिंग केलेला कागद कधी चिकटविण्यात आला?
त्याखाली मूळ नोंद काय होती?
जावक क्रमांकांची मालिका कुठे तुटते?
कागद आणि शाईचा कालखंड काय आहे?
कोणत्या नोंदी मूळ आहेत आणि कोणत्या नंतरच्या?

हे सर्व प्रश्न मूळ रजिस्टर हातात घेऊनच तपासता येतील.

त्यामुळे एसआयटीने कार्यालयीन माहिती आणि व्हॉट्सॲप चौकशीच्या चौकटीतून बाहेर पडून प्रत्यक्ष बीड जिल्हा परिषदेत उतरून तपास करणे आवश्यक आहे.

मूळ जावक रजिस्टर ताब्यात घ्या; फॉरेन्सिक तपासणी करा

या प्रकरणात जावक रजिस्टर तातडीने सुरक्षित ताब्यात घेऊन त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हस्तलिखित नोंदी, टायपिंग केलेले कागद, चिकटविलेल्या नोंदी, जावक क्रमांकांची मालिका, कागद व शाईची स्थिती आणि नोंदींचा क्रम तपासल्यास फेरफाराचा कालावधी आणि पद्धत स्पष्ट होऊ शकते.

मग एसआयटीने मूळ रजिस्टर ताब्यात घेऊन वैज्ञानिक तपास करण्यास विलंब कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

देवगुडे यांच्यापासून रजिस्टरपर्यंत प्रत्येक कडी तपासा

या प्रकरणाचा तपास केवळ जावक क्रमांकांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. माजी शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या स्वाक्षरीच्या मान्यता, त्या मान्यतांच्या तारखा, जावक क्रमांक, संबंधित संस्थांची संचमान्यता, शिक्षक नियुक्त्या आणि जावक रजिस्टरमधील नोंदी यांचा एकत्रित ताळमेळ लावणे आवश्यक आहे.

कायम मान्यता कोणी दिली? शिक्षण सेवक पदाची मान्यता कोणी दिली? जावक क्रमांक कुठून आला? रजिस्टरमध्ये नोंद कधी झाली? आणि नोंदी बदलल्या असतील तर त्यासाठी जबाबदार कोण?

या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तपासातून मिळणे गरजेचे आहे.

दोषींवर निलंबन आणि गुन्हे दाखल करा

जावक रजिस्टरमध्ये फेरफार, बनावट नोंदी किंवा बोगस मान्यतांचा प्रकार चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच संस्थाचालकांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बोगस शिक्षक भरतीत ज्यांनी मान्यता दिली, ज्यांनी नोंदी केल्या आणि ज्यांनी या प्रक्रियेला मदत केली, त्यांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय प्रकरणाला पूर्णविराम देता येणार नाही.

कारवाई न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार 

या प्रकरणात तातडीने प्रत्यक्ष चौकशी करून कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून न्यायालयीन दाद मागण्यात येईल, असा इशारा इंजि. सादेक इनामदार यांनी निवेदनातून दिला  आहे.

आता प्रश्न एका जावक रजिस्टरचा नाही. बोगस शिक्षक मान्यता, देवगुडे यांच्या स्वाक्षरीच्या मान्यता, जावक क्रमांकातील विसंगती, रजिस्टरमधील टायपिंग केलेल्या नोंदी आणि एसआयटीची तपास पद्धत—या सर्व बाबींची स्वतंत्र आणि प्रत्यक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

पुरावे समोर ठेवून निवेदन देण्यात आले असताना एसआयटीचा तपास व्हॉट्सॲप आणि मोबाइलपुरता राहणार की प्रत्यक्ष बीडमध्ये येऊन मूळ रजिस्टर ताब्यात घेणार? आता या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे.

पेलेट गन प्रकरणात राहुल गांधींचे धरणे; दिल्ली पोलिसांकडून अखेर एफआयआर दाखल

0

नवी दिल्ली — दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. जखमी विद्यार्थी साहिल लोचव याला सोबत घेऊन राहुल गांधी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात पोहोचले. तक्रारीवर FIR दाखल करण्याची मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

20 जुलै रोजी जंतर मंतरहून संसदेकडे निघालेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान पोलिसांकडून पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारवाईत साहिल लोचवसह काही विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. साहिलच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर पेलेट गन चालवल्याचा आरोप नाकारला होता.

या प्रकरणात साहिलने तक्रार दाखल करूनही FIR नोंदवण्यात विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधी शुक्रवारी साहिलसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. FIR दाखल होईपर्यंत धरणे सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

राहुल गांधी यांच्या धरण्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर साहिल लोचवच्या तक्रारीवर FIR दाखल केली. जंतर मंतरवरील 20 जुलैच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या कथित वापरातून झालेल्या दुखापतीची चौकशी आता FIRच्या आधारे पुढे जाणार आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान गर्दी नियंत्रणासाठी नेमकी कोणती साधने वापरण्यात आली, याबाबतही तपास सुरू आहे. पेलेट गन किंवा अन्य गर्दी नियंत्रणाच्या साधनांचा वापर झाला का, यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी CRPFकडून माहिती मागवल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी आंदोलनातील कथित पेलेट गन वापराचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय चर्चेत आला आहे. आता FIRनंतर तपासात नेमके काय समोर येते आणि या प्रकरणात जबाबदारी निश्चित होते का, याकडे लक्ष लागले आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात ओबीसी समाज आक्रमक; बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

बीड — केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच पुरवणी जबाबात नाव आल्याचा उल्लेख असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचीही चौकशी करून अटक करावी, या मागण्यांसाठी ओबीसी समाज बांधवांनी शुक्रवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसर आणि नगर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ‘न्याय द्या’च्या घोषणा देत आंदोलकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते.

या मोर्चात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनस्थळी सुरू असलेल्या उपोषणाचीही भेट घेऊन घुले कुटुंबीयांशी संवाद साधला.

१७ दिवसांपासून घुले कुटुंबीयांचे उपोषण

विलास घुले यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या १७ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासह कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाने या उपोषणाची दखल घ्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विलास घुले हत्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मोर्चाच्या मार्गावर झळकले ‘ते’ बॅनर; बीडमध्ये चर्चेला उधाण

दरम्यान, मोर्चाच्या मार्गावर लागलेल्या एका बॅनरने या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘गड्याहो, मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार?’ असा सवाल या बॅनरमधून करण्यात आला होता.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाला दीड वर्षाहून अधिक काळ उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा मुद्दा या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला. एकाच समाजातील दोन हत्या प्रकरणांमध्ये न्यायासाठी होणाऱ्या आंदोलनांमध्ये दुजाभाव का, असा सवाल त्यातून करण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली.

मोर्चादरम्यान काही वेळातच हे बॅनर हटवण्यात आले. मात्र, त्याची चर्चा दिवसभर बीड जिल्ह्यात सुरू होती.

मकोका आणि तातडीच्या अटकेची मागणी

विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, मकोका लागू करावा आणि आरोपींना तातडीने अटक करावी, अशी ठाम मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. तसेच घुले कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याचा मोर्चेकऱ्यांचा दावा असून, त्याचीही चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. या आरोपांबाबत संबंधित तपास यंत्रणेने अधिकृत भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे.

विलास घुले हत्या प्रकरणातील तपास, आरोपींवरील कारवाई आणि घुले कुटुंबीयांच्या मागण्यांकडे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष

आष्टीत कृत्रिम दूधाचा काळा धंदा सूरूच;एफडीए झोपेत, पोलिसांनी जप्त केला 72 गोण्या भेसळयुक्त पावडरचा साठा

0

आष्टी — नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ करणारा कृत्रिम दूध निर्मितीचा धंदा आष्टी तालुक्यात पुन्हा बिनधास्त सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने या धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धाकानंतर काही काळ कृत्रिम दूध आणि भेसळीच्या धंद्याला काही प्रमाणात लगाम बसल्याचे चित्र होते. मात्र त्यानंतर FDA च्या कारवाईतील शिथिलतेचा फायदा घेत भेसळखोरांनी पुन्हा डोके वर काढल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय राहते आणि अखेर पोलिसांना कारवाई करावी लागते, ही बाब अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

पोलिसांच्या धडक कारवाईने भेसळखोरांचा पर्दाफाश

आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्ससमोर पोलिसांनी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम.एच — 13 सीयू — 4141 अडवून तपासणी केली. वाहनामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडरच्या 47 गोण्या आढळून आल्या.

चालकाची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वी आणखी 25 गोण्या आष्टीतील हर्षद हॉटेलसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये उतरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणीही कारवाई केली.

दोन्ही ठिकाणांहून एकूण 72 गोण्या भेसळयुक्त पावडर आणि बोलेरो पिकअप असा 2 लाख 69 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एफ डी ए च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांची वाहतूक तालुक्यात सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाच्या यंत्रणेला याचा थांगपत्ता कसा लागला नाही? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

दूध हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थ असताना भेसळखोरांवर नियमित छापे, नमुना तपासणी आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पावडर सापडते, यामुळे FDA च्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

भेसळखोरांना कारवाईची भीती राहिली नाही, तर त्यामागे केवळ प्रशासनाची उदासीनता आहे की भेसळखोर आणि संबंधित अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळे कारवाईला जाणीवपूर्वक ब्रेक लावला जात आहे, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

तिघांवर गुन्हा; एकाला अटक

या प्रकरणी वाहनचालक सुशांत उर्फ बाबु लक्ष्मण गोपाळघरे (वय 20, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), मालाचे मालक हरीदास एकनाथ गोपाळघरे आणि माल स्वीकारणारा कैलास हंबर्डे (रा. आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबु गोपाळघरे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

पोलिसांनी धाड टाकली; आता FDA वर कारवाईची वेळ

आष्टीतील या कारवाईने केवळ भेसळयुक्त पावडरचा साठा उघड केलेला नाही, तर दूध भेसळीच्या संपूर्ण साखळीवरच प्रकाश टाकला आहे. पावडर कुठून आली, कोणासाठी आणली होती, तिचा वापर कुठे आणि किती दिवसांपासून होत होता, या सर्व बाबींचा तपास होणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर FDA च्या स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका, यापूर्वी झालेल्या कारवाया, केलेल्या तपासण्या आणि भेसळखोरांविरोधातील नोंदी यांचीही चौकशी झाली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणात कारवाई करणाऱ्यांपेक्षा कारवाई न करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

दरम्यान ही कारवाई  पोलीस निरिक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक नाना सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. वाघमोडे, पो‌ ह. तागड, जगताप, वाणी, सजगणे व गुजर यांनी केली असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

साखरेच्या दरात विक्रमी उसळी; घाऊक दर 7,500 रुपये क्विंटल, बीडमध्ये किरकोळ भाव 80 रुपयांवर

0

बीड — राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, घाऊक बाजारात साखरेचा भाव तब्बल 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. बीड जिल्ह्यात किरकोळ बाजारात 65 रुपये किलोच्या आसपास मिळणारी साखर आता 80 रुपये किलोच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत आहे.

साखरेच्या दरातील ही वाढ सणासुदीच्या काळात होत असल्याने ग्राहकांची चिंता आणखी वाढली आहे. चहा, मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असतानाच बाजारातील उपलब्ध साठा कमी झाल्याने दरवाढीला आणखी वेग आल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

साखरेचा साठा घटल्याचा परिणाम

2025-26 च्या साखर हंगामात देशातील साखरेचा वापर उत्पादनाच्या तुलनेत अधिक झाल्याने कारखान्यांकडील उपलब्ध साठा कमी होत गेला. परिणामी बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आणि साखरेच्या दरात सातत्याने वाढ होऊ लागली.

याशिवाय साखर निर्यातीला देण्यात आलेली परवानगी आणि त्यातून झालेली निर्यात याचाही देशांतर्गत उपलब्ध साठ्यावर परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारातील पुरवठा आणि मागणी यामधील तफावत वाढल्यास साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून साठेबाजीवर नियंत्रणाचे प्रयत्न

साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखर विक्रेत्यांकडील साठ्यावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी घाऊक विक्रेत्यांना 30 दिवसांचा साखर साठा ठेवण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा 15 दिवसांवर आणण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई किंवा साठेबाजी होऊ नये आणि बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

साखर आयातीचाही विचार

देशांतर्गत साखरेचा साठा आणि वाढते दर लक्षात घेता सरकारकडून साखर आयातीचा पर्यायही विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आयातीचा निर्णय, बाजारातील उपलब्ध साठा आणि आगामी उत्पादन यावर पुढील काळातील साखरेच्या दराची दिशा अवलंबून राहणार आहे.

सध्या घाऊक बाजारातील विक्रमी दर आणि बीडसह राज्यातील विविध भागांत किरकोळ बाजारात वाढलेले भाव पाहता, साखरेच्या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढल्यास साखरेचे दर कुठपर्यंत पोहोचतात, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रसूती दरम्यान जिल्हा रुग्णालयात मातांचे जीव धोक्यात, पाठराखण करणाऱ्या डॉ. सोळंकेच्या निलंबनाची मागणी

0

बीड — बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. या प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांना निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बीडमध्ये माता व बाल रुग्णालय उभारले आहे. मात्र, याच रुग्णालयातील प्रसूती उपचारांबाबत गंभीर तक्रारी समोर येत असल्याने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सिझेरियननंतर महिलेच्या प्रकृतीबाबत गंभीर आरोप

वडवणी येथील १९ वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पोटात वैद्यकीय हातमोजे आणि सर्जिकल कापड राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संसर्ग झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

संसर्गामुळे आतडे आणि गर्भाशय काढण्याची वेळ आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या घटनेत नेमकी चूक कुणाची झाली, उपचार प्रक्रियेत कोणत्या पातळीवर निष्काळजीपणा झाला, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या मृत्यूच्या घटनांचीही चौकशीची मागणी

बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलांच्या मृत्यूच्या यापूर्वीच्या घटनांचाही तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. छाया गणेश पांचाळ आणि मुस्कान शेख यांच्या मृत्यूच्या घटनांनंतरही नातेवाईक व सामाजिक संघटनांनी कारवाईची मागणी केली होती. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली मात्र, चौकशीच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

गेल्या महिन्यात शेख मुस्कान यांच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर संध्या गायकवाड यांच्या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातील व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

प्रसूतीदरम्यान रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच वैद्यकीय नियमांनुसार संबंधितांच्या वैद्यकीय परवान्याबाबतही योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यातील एका प्रकरणात गर्भवती महिलेला १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने उपचारास विलंब झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर बीडमधील प्रकरणातही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सोमवारी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाचा इशारा

बीड जिल्हा रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाच्या घटनांची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांना निलंबित करावे, अशी मागणी पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.

शिवसेना पक्ष-चिन्हावर सिब्बलांची धनुष्यबाण गोठवण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

0

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या मालकीचा वाद सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाच मिळावे, अशी मागणी मांडतानाच सिब्बल यांनी पर्यायी युक्तिवाद म्हणून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयासमोर केली.

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल, अशा पद्धतीने तिचा अर्थ लावता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. २१ जून आणि १९ जुलै रोजी पक्षातील परिस्थिती जशी होती, त्याच घटनांचा विचार केला पाहिजे. त्यानंतर मिळालेल्या राजकीय पाठिंब्याचा आधार घेतल्यास पक्षांतराला प्रोत्साहन मिळू शकते, असा मुद्दा त्यांनी मांडला.

नंतर मिळालेला पाठिंबा ग्राह्य धरता येणार नाही

सिब्बल यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरविरोधी तरतुदींवर राहिला. सत्तेवर असलेल्या व्यक्तीला नंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय पाठिंबा मिळणे स्वाभाविक असू शकते; मात्र त्या नंतरच्या पाठिंब्याच्या आधारे पक्षाच्या मूळ मालकीचा दावा मजबूत करता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यांच्या मते, २१ जून आणि १९ जुलै रोजीची परिस्थिती महत्त्वाची असून त्यानंतर घडलेल्या घटनांचा वापर पक्षांतराला वैधता देण्यासाठी करता येणार नाही.

शिवसेना नाव ठाकरे यांचेच असल्याचा दावा

सिब्बल यांनी न्यायालयासमोर स्पष्टपणे मांडले की, ‘शिवसेना’ हे नाव ठाकरे यांचेच आहे आणि शिंदे गटाला हे नाव व चिन्ह मिळण्याचा न्याय्य हक्क निर्माण होत नाही. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हाचा वापर केला असला तरी त्या वापरातून त्यांच्या बाजूने कोणताही स्वतंत्र न्याय्य हक्क निर्माण होत नाही, असा दावा त्यांनी केला.

मात्र, न्यायालयाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला नाही आणि ते शिंदे गटालाही देण्यायोग्य नसल्याचे ठरवले, तर दोन्ही गोष्टी गोठवाव्यात, असा सिब्बल यांचा पर्यायी युक्तिवाद आहे.

हा माझा पर्यायी युक्तिवाद

सिब्बल यांनी आपल्या भूमिकेतील हा मुद्दा पर्यायी युक्तिवाद म्हणून मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लाभाचा उपभोग घेण्यास शिंदे गट पात्र नव्हता, असा ठाकरे गटाचा दावा आहे; त्यामुळे त्या लाभाच्या आधारे आता शिंदे गटाला कोणताही न्याय्य हक्क सांगता येणार नाही.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.