Home राज्य मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; लेखी न मिळाल्यास उपोषणावर ठाम

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; लेखी न मिळाल्यास उपोषणावर ठाम

0
6

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारकडून केवळ तोंडी आश्वासने नकोत, तर प्रत्येक मागणीवर ठोस लेखी निर्णय हवा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. आज रात्रीपर्यंत लेखी आश्वासन न मिळाल्यास शनिवार, ३० मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांना फटकार, रात्री उशिरापर्यंत बैठक

बैठकीबाबत माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपात होत असलेल्या दिरंगाईबाबत मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीतच फटकारले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांशी चर्चा करून अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल, अशी माहिती सरकारच्या प्रतिनिधींनी दिल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी सरकारचे प्रतिनिधी लेखी प्रस्ताव घेऊन चर्चेसाठी येऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लेखी निर्णयाशिवाय माघार नाही”

सरकारच्या विलंबाच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे म्हणाले, “मराठा समाजाने प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक भूमिका घेत सरकारला पुरेसा वेळ दिला. मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जर सरकार खरोखरच गंभीर असते, तर आतापर्यंत लेखी आदेश आमच्या हातात आले असते. आता लेखी निर्णयाशिवाय कोणतीही माघार घेतली जाणार नाही.”

सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा

राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीबाबत बोलताना जरांगे यांनी संयमित भूमिका घेतली. “आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतरही सरकारचा कोणताही सकारात्मक लेखी प्रस्ताव घेऊन ते चर्चेसाठी आले, तर त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. आम्ही आजही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र सरकारने आता आपली भूमिका कृतीतून दाखवावी,” असे ते म्हणाले.

उन्हामुळे नागरिकांना आवाहन

उद्याचे आंदोलन अत्यंत कठोर स्वरूपाचे असेल. आपण भर उन्हात अन्न-पाण्याविना बसणार असल्याचे स्पष्ट करताना जरांगे यांनी मराठा समाजातील वृद्ध, महिला आणि लहान मुलांना अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने गर्दी न करण्याचे आवाहन केले. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काही तासांत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here