गेवराई: अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, 8 लाखांचा ट्रॅक्टर जप्त

बीड — जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत 8 लाख 6 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. या प्रकरणी संबंधित वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार तसेच गेवराई तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी कारवाईचे नियोजन केले.

दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या दरम्यान हिंगणगाव परिसरात पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना हिंगणगावकडून पाथरवाला गावाच्या दिशेने जाणारा महिंद्रा अर्जुन 555 DI कंपनीचा ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांचे पथक पाहताच चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पलायन केले.

तपासादरम्यान ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली ट्रॉली ही अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यासाठी वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी दाखल करण्यात आली असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 330/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 305(E) तसेच खाण व खनिज (विकास व नियमन) अधिनियम 1957 च्या कलम 4 व 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जंजाळ, पोलीस हवालदार हंबर्डे, कल्याण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर, गोरक्ष डोके, पोटे तसेच होमगार्ड सुतार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles