Home क्राईम शेळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद; बीड स्थानिक गून्हे शाखेची मोठी कारवाई

शेळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद; बीड स्थानिक गून्हे शाखेची मोठी कारवाई

0
13

वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरातील सहा गुन्ह्यांची उकल; स्विफ्ट कारसह ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड —  जिल्ह्यातील विविध भागांत शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीडला यश आले आहे. शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरात दिवस-रात्र शेळ्या चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत वाहन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये शेळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्याकडून सुरू होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, २५ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. सुभाष किसन विटकर, रा. गांधीनगर, बीड याने शेळी चोरीचा गुन्हा केला असून तो खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानावर आपल्या मित्रांसह थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सुभाष किसन विटकर, बेग रफीक बेग रशीद, रा. बलभीम चौक, बीड आणि इमरान चाँद शेख, रा. तेलगाव नाका, बीड या तिघांना त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी तिघांकडे शेळी चोरीबाबत चौकशी केली असता, सुभाष विटकर याने आपल्या दोन साथीदारांसह स्विफ्ट कारचा वापर करून वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरात दिवस तसेच रात्रीच्या वेळी शेळ्या चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहा गुन्ह्यांची कबुली

आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, या टोळीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेळी चोरीचे एकूण सहा गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये वडवणी पोलीस ठाण्यात तीन, नेकनूर पोलीस ठाण्यात एक, तलवाडा पोलीस ठाण्यात एक आणि धारूर पोलीस ठाण्यात एक अशा सहा गुन्ह्यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे—
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. १३९/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. १३४/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
वडवणी पोलीस ठाणे — गु.र.नं. ३२/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
नेकनूर पोलीस ठाणे — गु.र.नं. ९९/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
तलवाडा पोलीस ठाणे — गु.र.नं. २९३/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
धारूर पोलीस ठाणे — गु.र.नं. १५६/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.
अशाप्रकारे आरोपींच्या चौकशीतून वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा परिसरातील सहा शेळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान तिन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वडवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या टोळीने आणखी काही ठिकाणी शेळ्यांची चोरी केली आहे का, तसेच या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक . व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, दीपक खांडेकर, जफर पठाण, अर्जुन यादव आणि चालक गणेश मराडे यांनी सहभाग घेतला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here