बीड — नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरसुंबा येथील ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळावर पोलिसांनी छापा टाकून जुगार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह एकूण ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मांजरसुंबा येथील विराज बिअर बारच्या वरच्या मजल्यावर ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. सदर मंडळाला शासनाचा परवाना असला तरी परवान्यातील अटींनुसार तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास मनाई आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासणीत या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
क्लबमध्ये जुगारासाठी विशेष व्यवस्था
पोलिसांच्या कारवाईदरम्यान मंडळाच्या ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे आणि उपस्थितीच्या नोंदी आढळून आल्या. याशिवाय उपस्थित व्यक्तींच्या अंगझडतीमध्ये ५५ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन मिळून आले.
तसेच कारवाईदरम्यान वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
१९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात विलास ज्ञानोबा नाईकवाडे, राम बारीकराव बहिरवाळ, अशोक भालचंद्र वेदपाठक, राहुल सुखाहारी गदळे, उत्तरेश्वर किसन खिंडकर, शेख अशोक शेख रफीक, सज्जाद खान शफीक खान पठाण, राजेंद्र नारायण जाधव, भरत बलभीमराव काळुंके, संतोष जालींदर चादर, मेघराज योगीराज ढोकणे, महादेव नारायण शिंदे, कानिफनाथ गणेश हुंबे, शेख समी शेख नईम, संदीप पिलाजी गोरे, निजामोद्दीन बक्षुद्दीन शेख, शकीलभाई युनूसभाई वोहरा, विष्णू अर्जुन निमुडे आणि संदीप छत्रभुज खोटे अशा एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
परवान्यातील अटींचे उल्लंघन करून जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भारत यांच्या पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक बीड नवनीत, अपर पोलीस अधीक्षक चेतना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बीड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

