गेवराई — गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून चार ट्रॅक्टर आणि चार लोखंडी केन्या असा एकूण 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 8 सप्टेंबर 2026 रोजी गेवराई उपविभागातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत सुरळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरला लोखंडी केन्या जोडून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सुरळेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी काही जण ट्रॅक्टर आणि लोखंडी केन्यांच्या सहाय्याने वाळू उपसा करताना आढळून आले.
पोलिसांनी कारवाई करत सोमनाथ शिवाजी मोरे (वय 27), आदेश ज्ञानेश्वर भंडारे (वय 21), सचिन भाऊराव लिबॉरे (वय 24), तिघेही रा. सुरळेगाव, ता. गेवराई, जि. बीड, तसेच विकास अनित तोतरे (वय 25, रा. गुळज, ता. गेवराई) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे चार ट्रॅक्टर आणि चार लोखंडी केन्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 32 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अर्जुन यादव, पोलीस अंमलदार बबन सलगर, मनोज परजणे, अश्पाक सय्यद आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




