गेवराई — सध्या गोदावरीला प्रशासनातील डोमकावळ्यांनी वेठीस धरला असून नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडले जात आहेत. असाच लचके तोडायला सोकलेला विलास राजेंद्र मोराळे नावाचा तलाठी लाच घेताना लात लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केला.
अनधिकृत वाळू उपसा आणि हायवा वाहतुकीला सुरळीतपणे परवानगी देण्यासाठी तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. तलाठी संघटनेचे अध्यक्ष विलास मोराळे यास मंगळवारी (दि. 18) 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
गेवराई तालुक्यातील म्हाळजपिंपळ परिसरात अनधिकृत वाळू उपसा आणि केन्या व हायवा वाहनांची वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी मोराळे यांने तक्रारदाराकडे 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार गेवराई शहरातील बेदरे कॉम्प्लेक्स परिसरातील एका खासगी कार्यालयात 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विजय मोराळे यांना पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर गेवराईच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाच मागणी आणि स्वीकार प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

