परळी — खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आडबाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून परळी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश भरत नागरगोजे (वय २७, रा. जिरेवाडी) असे आहे.
खेळण्यासाठी गेली, मात्र घरी परतलीच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पीडित मुलगी गावातील मारुती मंदिर परिसरात खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
कुटुंबीयांनी मंदिर परिसरासह गावात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, काही वेळ ती आढळून आली नाही.
घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली
दरम्यान, काही वेळानंतर मुलगी घरी परतली. ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर तिने आरोपी आकाश नागरगोजे याने खेळत असताना फूस लावून तिला एका आडबाजूच्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने परळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोक्सो अंतर्गत गुन्हा; आरोपी अटकेत
तक्रारीच्या आधारे परळी पोलिसांनी आकाश नागरगोजे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करत आरोपीला तातडीने अटक केली आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परळी पोलीस करत असून, तपासातील निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

