केज — बीड जिल्ह्यातील केज शहरात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुण पित्याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसांत त्याच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या दुहेरी शोकांतिकेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी केज येथील रहिवासी रसूल गफूर सय्यद यांची नात अप्शा सय्यद ही धनेगाव येथील मांजरा प्रकल्प परिसरात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. मुलगी बुडत असल्याचे पाहताच तिचे वडील अहमद रसूल सय्यद यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली.
विशेष म्हणजे अहमद यांना पोहता येत नव्हते. तरीही त्यांनी जीवाची पर्वा न करता मुलीला सुरक्षित बाहेर काढले. मात्र पाण्याची खोली आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते स्वतः गाळात अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेतून सय्यद कुटुंब सावरत असतानाच आणखी एक दु:खद प्रसंग घडला. शिवसेनेच्या शिवसंवाद मेळाव्यानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे, भरत गोगावले आणि अन्य नेते 29 मे रोजी केज येथे आले होते. दिवंगत अहमद सय्यद यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्कालीन मदत योजनेतून सहाय्य मिळावे, यासाठी अहमद यांची पत्नी, मुले आणि वडील रसूल सय्यद निवेदन देण्यासाठी मेळाव्यात गेले होते.
मेळाव्यातील प्रचंड गर्दी आणि तीव्र उष्णतेमुळे रसूल सय्यद यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घाम फुटणे आणि घबराट होऊ लागल्याने कार्यकर्त्यांनी तातडीने जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला.
मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंब अद्याप सावरले नसताना अवघ्या 18 दिवसांत वडिलांचाही मृत्यू झाल्याने सय्यद कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे केज शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी सय्यद कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.

