संतोष देशमुख हत्या प्रकरण : साक्षीदार दादा खिंडकर यांना भावाकडून धमकीचा आरोप

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दादा खिंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दादा खिंडकर हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते महत्त्वाचे साक्षीदार मानले जात असून, त्यांना साक्ष देऊ नये आणि प्रकरण मिटवून घ्यावे यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, दादा खिंडकर आपल्या घरी असताना त्यांचा लहान भाऊ समाधान खिंडकर याने जुना वाद उकरून काढत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी “धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस आणि ते प्रकरण मिटवून घे,” असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप आहे.
यावर दादा खिंडकर यांनी विरोध दर्शवत, “तुला या प्रकरणाशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर,” असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर शिवीगाळ व धमकावण्याचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर दादा खिंडकर यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर यांच्यात कौटुंबिक कारणांमुळे पूर्वीपासून मतभेद असल्याचेही समोर आले आहे. तसेच, यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
मात्र, एका चर्चित हत्या प्रकरणातील साक्षीदाराला स्वतःच्या सख्या भावाकडूनच साक्ष बदलण्यासाठी किंवा साक्ष न देण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाला आता नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आगामी तपासात या आरोपांमागील नेमकी पार्श्वभूमी आणि सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles