Home Blog Page 10

गुन्हेगारी वाढली तर पोलीस ठाणे वाढणार? महाराष्ट्र सरकारने आखली नवी चौकट

0

मुंबई —  महाराष्ट्रात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 66 वर्षांनंतर सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आणि मनुष्यबळाचे नवे निकष निश्चित केले आहेत. 1960 पासून लागू असलेल्या जुन्या निकषांमध्ये बदल करून आता नवीन पोलीस ठाण्याची गरज वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे ठरवली जाणार आहे. गृह विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, यापूर्वीचे संबंधित शासन निर्णय, परिपत्रके आणि मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्यात आली आहेत.

नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी प्रस्तावित हद्दीतील मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांची संख्या हा अनिवार्य निकष करण्यात आला आहे. त्यासोबत शासनाने निश्चित केलेल्या निकषांपैकी किमान सात ते आठ निकषांची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे केवळ प्रशासकीय मागणी किंवा स्थानिक दबावाच्या आधारे नवीन पोलीस ठाणे मंजूर करता येणार नाही.

अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गानुसार पोलीस ठाण्यांची रचना

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता राज्यातील इतर पोलीस आयुक्तालये आणि पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील नवीन पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी वर्गवारी केली जाणार आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र मनुष्यबळ निश्चित करण्यात आले आहे.

नवीन पोलीस ठाणे निश्चित करताना केवळ लोकसंख्या हा आधार न ठेवता गुन्हेगारीचे प्रमाण, औद्योगिक क्षेत्र, पर्यटनस्थळे, संवेदनशील मिश्रवस्ती, न्यायालये, वाहतूक, मोर्चे आणि बंदोबस्ताची गरज यांचाही विचार केला जाणार आहे.

अ’ वर्गासाठी कोणते निकष?

जिल्हा मुख्यालय, ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र, मोठे पर्यटनस्थळ, संवेदनशील मिश्रवस्तीचे प्रमाण 35 टक्क्यांपेक्षा अधिक असलेले क्षेत्र, भाग 1 ते 5 मधील 400 पेक्षा अधिक गुन्हे, पाचपेक्षा अधिक शासकीय आस्थापना आणि त्यासाठी स्वतंत्र सुरक्षेची आवश्यकता अशा बाबी ‘अ’ वर्गासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. तसेच 25 टक्क्यांपेक्षा अधिक विस्थापित कामगार असलेले क्षेत्रही या वर्गवारीत विचारात घेतले जाऊ शकते.

ब’ वर्गासाठीही विविध निकष

तालुका मुख्यालय, ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र, भाग 1 ते 5 मधील 200 ते 400 गुन्हे, एक हजारपेक्षा अधिक औद्योगिक कामगार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा न्याय दंडाधिकाऱ्यांचे न्यायालय, वारंवार मोर्चे अथवा मोठ्या बंदोबस्ताची आवश्यकता, मोठे रेल्वे स्थानक, 15 ते 35 टक्के संवेदनशील मिश्रवस्ती आणि मोठी यात्रा, धरण, स्टेडियम किंवा पर्यटनस्थळ असलेल्या भागांचा ‘ब’ वर्गासाठी विचार केला जाणार आहे.

क’ वर्गासाठी गुन्ह्यांचा निकष

‘क’ वर्ग पोलीस ठाण्यासाठी भाग 1 ते 5 मधील 150 ते 200 गुन्ह्यांचा निकष निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय शासनाने नमूद केलेल्या इतर निकषांचीही पूर्तता तपासली जाणार आहे.

मुंबईसाठी स्वतंत्र व्यवस्था

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र निकष ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील दाट लोकवस्ती, स्थलांतरितांची संख्या, वाढते गुन्हे आणि गुन्ह्यांचे बदलते स्वरूप लक्षात घेता मुंबईतील सध्याची सर्व पोलीस ठाणी ‘अ’ वर्गात मोडतात. मुंबईत नव्याने स्थापन होणाऱ्या पोलीस ठाण्यासाठी आवश्यकतेनुसार कमाल 362 मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.

गडचिरोली, गोंदियासाठी विशेष मनुष्यबळ

नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गवारी लागू करण्यात आलेली नाही. नक्षलविरोधी अभियान, एलआरपी, नाकाबंदी, रोड ओपनिंग, कायदा-सुव्यवस्था आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन या भागांसाठी स्वतंत्र मनुष्यबळाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या विशेष आराखड्यात 128 मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.

बदलत्या महाराष्ट्रासाठी नवे धोरण

लोकसंख्यावाढ, वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगिक विस्तार, पर्यटनाची वाढ, वाहनांची संख्या आणि बदलत्या स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे नवे धोरण लागू केले आहे. त्यामुळे भविष्यात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करताना गुन्हेगारीचे प्रमाण आणि स्थानिक गरजांसोबत सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जाणार आहे.

खासगी शिक्षण संस्था एसआयटीच्या रडारवर; हायकोर्टाचा मोठा आदेश

0

बीडबोगस शिक्षक भरती आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील कथित अनियमिततेच्या प्रकरणात विशेष तपास पथकाला (SIT) राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांची व्यापक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. लोकप्रतिनिधी किंवा अति-महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित संस्था असल्या तरी त्यांना चौकशीपासून वगळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती आणि नियुक्त्यांमधील कथित अनियमिततेशी संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी एसआयटीने बंद लिफाफ्यात अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालाची दखल घेत न्यायालयाने एसआयटीच्या तपासाचा विस्तार संपूर्ण राज्यातील शैक्षणिक संस्थांपर्यंत करण्याचे निर्देश दिले.

राजकीय संबंध असलेल्या संस्थांचीही चौकशी

एसआयटीच्या चौकशीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एखादी संस्था लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती किंवा अति-महत्त्वाच्या व्यक्तीशी संबंधित असली तरी तिच्या व्यवस्थापनाचा विचार करून चौकशी टाळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एसआयटीचा तपास नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नसून कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर, नागपूर आणि मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्येही चौकशी सुरू असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

अफवा किंवा निराधार तक्रारींवर कारवाई नको

दरम्यान, एसआयटीने अफवा अथवा निराधार आरोपांच्या आधारे कारवाई करू नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. कोणतीही माहिती ठोस पुरावे आणि विश्वासार्ह तथ्यांच्या आधारे तपासली जावी, असे निर्देश देण्यात आले.

संस्थेशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तीकडून तक्रार किंवा माहिती प्राप्त झाल्यास, संबंधित व्यक्तीकडून आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र घेण्याची प्रक्रिया अवलंबता येईल. खोटी माहिती देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य एसआयटीला देण्यात आले आहे.

सरकारी तिजोरीचे नुकसान झाले का?

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती आणि नियुक्त्यांमध्ये नियमबाह्य बाबी घडल्या का, तसेच अशा नियुक्त्यांमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला का, याचाही तपास एसआयटीकडून केला जाणार आहे.

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन अनुदान हे करदात्यांच्या पैशातून दिले जाते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. त्यामुळे भरती प्रक्रियेत झालेल्या संभाव्य अनियमिततेचा आर्थिक परिणाम तपासणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट झाले आहे.

८९२ कर्मचाऱ्यांवरील कारवाईचीही दखल

या प्रकरणाची पार्श्वभूमी राज्यातील खासगी तसेच जिल्हा परिषद शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या तक्रारींशी संबंधित आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात अचानक मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते.

६ मे २०२६ रोजीच्या आदेशात न्यायालयाने एसआयटी आणि शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या व्यापक चौकशीबाबत चिंता व्यक्त केली होती. शिक्षक, कर्मचारी आणि व्यवस्थापनांविरोधात दाखल एफआयआर तसेच शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे आणि निलंबनाच्या कारवाईचीही न्यायालयाने दखल घेतली होती. ९ मार्चच्या व्यापक आदेशानुसार ८९२ कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचाही त्यात समावेश होता.

आता एसआयटीला राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील भरती आणि नियुक्त्यांशी संबंधित अनियमिततेची चौकशी अधिक व्यापक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासाच्या प्रगतीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी २४ सप्टेंबर २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.

इंजिनीयर सादिक इनामदार यांच्या मते, या आदेशामुळे राजकीय संबंध किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित संस्थांनाही चौकशीच्या कक्षेत यावे लागणार आहे . दरम्यान न्यायालयाच्या आदेशामुळे बीड मधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये रुजलेली भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” उखडून  काढण्याच्या सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळणार आहे.यामूळे संस्थाचालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

शारदा प्रतिष्ठानच्या टिपरे महोत्सवाला कलाकार आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

गेवराईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे टिपरे महोत्सव यशस्वी — आ. विजयसिंह पंडित

गेवराई — शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिपरे महोत्सवा बरोबरच विविध उपक्रम राबवून गेवराई शहराचा संकृती वारसा जतन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. दोनशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या टिपरे व सोंग या लोककलेच्या कलाकारांनी हा टिपरे महोत्सव उंचीवर नेऊन ठेवले आहे, गेवराईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे टिपरे महोत्सव यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन महोत्सवाचे आयोजक आ. विजयसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठान आयोजित सहाव्या टिपरे महोत्सवाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार संजय सोनवणे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास नवले, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांच्यासह परिक्षक सर्वश्री ॲड. सुभाष निकम, विलास सोनवणे, प्रशांत रुईकर, विष्णूप्रसाद खेत्रे, प्रकाश भुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आणि २०० वर्षाची परंपरा असलेला गेवराई येथील पारंपरिक टिपरी आणि सोंग महोत्सव हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी व ही परंपरा जतन करून टिपरे व सोंग या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी आ. विजयसिंह पंडित हे शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि तरुण कलावंताना सोबत घेऊन गेल्या पाच वर्षांपासून टिपरे महोत्सवाचे आयोजन करत असून या वर्षीच्या सहाव्या व्या टिपरे महोत्सवाचे नेत्रदीपक आयोजन मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी सायं ६ वाजता बाजारतळ, गेवराई येथे करण्यात आले होते. टिपरे, सोंग, नागमंत्री, भोलोबा गीत स्पर्धा यांना स्पर्धकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. आ. विजयसिंह पंडित यांनी शिस्तबद्ध नियोजन करून हा टिपरे महोत्सव यशस्वी केला. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी टिपरे महोत्सव पाहण्यासाठी गेवराई शहरातील लहान मुले, मुली, महिला, तरुण आणि वयोवृद्ध जनतेने उत्सफुर्त गर्दी केली होती.

यावेळी स्पर्धेचे नियम आणि सुचनांची माहिती स्पर्धेचे परिक्षक ॲड. सुभाष निकम यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसभापती श्रीहरी पवार, माधव चाटे यांनी केले. टिपरे स्पर्धेत नऊ संघ आणि नागमंत्री स्पर्धत दोन संघ सहभागी झाले होते. टिपरे स्पर्धेची सुरुवात गणेश नगरच्या श्री गणेश क्रीडा मंडळ संघाने केली. यावेळी विविध मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरघोस बक्षिसानी कलाकारांचा गौरव होणार

टिपरे स्पर्धा सांघिक मध्ये प्रथम सांघिक ३३,३३३/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय सांघिक २२,२२२/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, तृतिय सांघिक ११,१११/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ ५,५५५/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ ५,५५५/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार असून
उत्कृष्ट पात्र सजावट (कला सादरीकरण करणारा संघ)) प्रथम
५,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, व्दितीय ३,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, तृतिय २,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, लक्षवेधी १,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह लक्षवेधी १,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह तसेच
उत्कृष्ट सोंगधारी कलावंत प्रथम
५,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, व्दितीय ३,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, तृतिय २,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ १,५००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह,हउत्तेजनार्थ
१,५००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह तसेच उत्कृष्ट वाद्य वादन (वैयक्तीक)
प्रथम ३,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह,ह व्दितीय २,०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, तृतिय१,५००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ
१०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ १०००/- रोख रुपये व स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

हिंगणीच्या “विश्वजीत गोरे”ची लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये मास्टर्ससाठी निवड

0

चौसाळा — जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात हे हिंगणी बु. येथील विश्वजीत गोरे याने सिद्ध करून दाखवलं. इंग्लंडमधील किंग्ज कॉलेज लंडन येथे “मास्टर्स इन न्यूरो सायन्स”या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे.

विश्वजीतने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. आधुनिक विज्ञानातील संशोधनासाठी महत्त्वाच्या असलेल्या Neuroscience विषयात जगातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी मिळणे ही त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

विश्वजीत गोरे याच्या यशाबद्दल गोरे इंग्लिश स्कूलच्या संस्थापक व मुख्याध्यापिका अंजली गोरे, संचालक अॅड. चंद्रकांत गोरे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या संधी मिळवता येतात, हे विश्वजीतच्या यशाने अधोरेखित झाले आहे.

त्याच्या या कामगिरीमुळे  ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींसाठी प्रेरणा मिळणार आहे. विश्वजीतच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनाच्या वाटचालीसाठी चौसाळा परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डी वाय एस पी अशोक च्या मार्गदर्शनाखाली वर्षाची कारवाई 50 लाखाची गांजा शेती उघड

0

वडवणी — तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथे ऊस आणि कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांच्या कारवाईत तब्बल ११६ गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, ही झाडे सहा ते सात फूट उंचीची आहेत. जप्त गांजाची किंमत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हरिश्चंद्र पिंपरी येथील संदीपान विठ्ठलराव शिंदे (वय ४०) यांच्या शेतात ऊस आणि कापसाचे पीक आहे. या पिकांच्या आड गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शेतात कारवाई केली असता ऊस-कापसाच्या पिकामध्ये गांजाची ११६ झाडे आढळून आली.

पोलिसांनी गांजाची झाडे ताब्यात घेतली असून घटनास्थळी पंचनामा आणि वजन करण्याची प्रक्रिया सुरू होती. वजन व पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जप्त मुद्देमालाची अधिकृत किंमत स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेतीतील नियमित पिकांच्या आड अमली पदार्थाच्या पिकाची लागवड केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई डीवायएसपी अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा , उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आदींच्या पथकाने केली.

सिझेरियनवेळी डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच ठेवले ग्लोज, टिश्यू पेपर; बीड जिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार

0

बीड — बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर १९ वर्षीय महिलेच्या पोटात ग्लोज आणि टिश्यू पेपर राहिल्याचे आढळून आले आहे. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच महिलेची प्रकृती बिघडली. पोटात राहिलेल्या या साहित्यामुळे संसर्ग वाढला आणि अखेर महिलेला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे तब्बल पाच तासांची शस्त्रक्रिया करून पोटातील साहित्य बाहेर काढण्यात आले.

वडवणी तालुक्यातील संध्या सुरज गायकवाड (वय १९) यांना १ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसूतीनंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले.

घरी गेल्यानंतर संध्या गायकवाड यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर शस्त्रक्रियेदरम्यान पोटात साहित्य राहिल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात हातमोजे आणि टिश्यू पेपर आढळले. पोटात हे साहित्य राहिल्याने गंभीर संसर्ग झाला होता. संसर्गाची तीव्रता वाढल्याने तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करून पोटातील साहित्य बाहेर काढण्यात आले.

मात्र संसर्ग गंभीर असल्याने संध्या गायकवाड यांची प्रकृती अद्याप अत्यंत चिंताजनक आहे. त्या सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

नवजात मुलीला आईच्या दुधापासून वंचित राहण्याची वेळ

सिझेरियनदरम्यान संध्या गायकवाड यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात बाळाला गेल्या १० ते १२ दिवसांपासून आईचा स्पर्शही मिळालेला नाही. आई रुग्णालयात उपचार घेत असल्याने चिमुकली आईच्या दुधापासूनही वंचित राहिली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न

शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात ग्लोज आणि टिश्यू पेपर राहणे आणि त्यानंतर गंभीर संसर्ग होऊन जीवाला धोका निर्माण होणे, हा प्रकार बीड जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.

या घटनेमुळे रुग्णालयातील शस्त्रक्रियेदरम्यान साहित्याची मोजदाद, रुग्णाची तपासणी आणि ऑपरेशननंतरची वैद्यकीय देखरेख याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एका तरुण आईचा जीव धोक्यात आल्यानंतरही प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात अशा प्रकारांना आळा कसा बसणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वैद्यकीय आणि प्रशासकीय चौकशी होणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गोदाकाठावरचा डोमकावळा पकडला; 70 हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद

0

गेवराई — सध्या गोदावरीला प्रशासनातील डोमकावळ्यांनी वेठीस धरला असून नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडले जात आहेत. असाच लचके तोडायला सोकलेला विलास राजेंद्र मोराळे नावाचा तलाठी लाच घेताना लात लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केला.

अनधिकृत वाळू उपसा आणि हायवा वाहतुकीला सुरळीतपणे परवानगी देण्यासाठी तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. तलाठी संघटनेचे अध्यक्ष विलास मोराळे यास मंगळवारी (दि. 18) 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

गेवराई तालुक्यातील म्हाळजपिंपळ परिसरात अनधिकृत वाळू उपसा आणि केन्या व हायवा वाहनांची वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी मोराळे यांने तक्रारदाराकडे 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार गेवराई शहरातील बेदरे कॉम्प्लेक्स परिसरातील एका खासगी कार्यालयात 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विजय मोराळे यांना पथकाने रंगेहात पकडले.

या कारवाईनंतर गेवराईच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाच मागणी आणि स्वीकार प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

शेषराव वीर यांच्या उपोषणाची दखल नाही; प्रशासनाचा घातला तेरावा

0

बीड —  विविध मागण्यांसाठी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शेषराव वीर हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तेरा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.उपोषणाच्या तेराव्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी आणि उपोषणकर्त्याला भक्कम पाठिंबा देण्यासाठी दि.17ऑगस्ट 2026 रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘निष्क्रिय प्रशासनाच्या तेराव्याचा विधी लोकशाही मार्गाने घालण्यात आला.


नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंतवाडी येथे महिलांशी झोंबाझोंबी करणार्‍या आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा पीडितेला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या लेडीज कॉन्स्टेबल तुरुकमारे व कॉन्स्टेबल बांगर यांच्यावर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाला जबाबदार असलेले तहसीलदार चंद्रकांत शेळके व मंडळाधिकारी नाईकवाडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
याशिवाय नवगण राजुरी ता.जि.बीड येथील गणेश घुले यांचा हायवा गाडीने चिरडून घातपात केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पठाण यांचे निलंबन करून सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा,यासह अन्य मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्राण गेला तरी चालेल पण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेषराव वीर यांनी घेतल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून मागण्यांवर योग्य तो तोडगा काढावा,अन्यथा या आंदोलनाचे लोण जिल्हाभर पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, आंदोलकांचे मार्गदर्शक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,ऑल इंडिया पँथर सेनेचे राज्य प्रवक्ते नितीन सोनवणे,किष्किंदा पांचाळ,आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे,राजकुमार कदम,शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस, ज्ञानेश्वर राऊत,शिवराय फुले शाहू आंबेडकर आघाडीचे भीमराव कुटे, आपचे शहराध्यक्ष सय्यद सादेक, हनुमान घोडके,माऊली शिंदे,दत्ता सुरवसे,जयसिंग वीर,राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचे विठ्ठलराव डोळस, नारायण सावंत,रफिक पठाण, सुंदर वाघमारे,राजेश वडमारे,पप्पू धन्वे,मीठूभाऊ पवार,राधाबाई घुले यांच्यासह विविध पक्ष,संघटना व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्राचा दबदबा; गोयल, तावडे, भारती पवारांना मोठी जबाबदारी

0

मुंबई — भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे मिळाली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती झाली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या तिन्ही नियुक्त्यांमुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्राचे राजकीय आणि संघटनात्मक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

पियुष गोयलांकडे पुन्हा आर्थिक जबाबदारी

पियुष गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून सध्या ते उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आता पक्षाने पुन्हा त्यांच्यावर आर्थिक व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या कुटुंबाचीही भाजपशी दीर्घकाळाची राजकीय नाळ आहे. त्यांच्या आई चंद्रकांता गोयल या भाजपच्या माजी आमदार होत्या, तर वडील वेदप्रकाश गोयल यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम केले होते.

विनोद तावडेंचे राष्ट्रीय संघटनेतील स्थान कायम

महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील अनुभवी नेते म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.

भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत चिटणीस आणि त्यानंतर सरचिटणीस म्हणून काम केलेल्या तावडे यांची आता पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या संघटनात्मक राजकारणात त्यांचे स्थान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. भारती पवारांवरही मोठी जबाबदारी

माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय चेहऱ्याला राष्ट्रीय संघटनेत स्थान मिळाल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीलाही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे

भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने राज्याचा राष्ट्रीय संघटनेतील प्रभाव अधोरेखित झाला आहे. पियुष गोयल यांच्याकडे आर्थिक व्यवस्थापन, विनोद तावडे यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी आणि डॉ. भारती पवार यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपद अशी महत्त्वाची विभागणी झाली आहे.आगामी काळात महाराष्ट्रातील संघटनात्मक विस्तार आणि निवडणूक रणनीतीसाठी भाजप या तिन्ही नेत्यांच्या अनुभवाचा कशा पद्धतीने वापर करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा; मोठ्या प्रकल्पांवर येणार नियंत्रण?

0

पुणे — पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा मसुदा साखर आयुक्तालयाने शासनाकडे सादर केला होता. मात्र, शासनाने मसुद्यात काही दुरुस्त्या आणि बदल सुचवले आहेत. त्यावर संबंधित विभाग व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुधारित मसुदा पुन्हा शासनाकडे सादर केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत गूळ व्यवसायाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वी शेतकरी स्वतःच्या किंवा परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन पारंपरिक पद्धतीने गुऱ्हाळात गूळ तयार करीत होते. आता मात्र मोठ्या गुंतवणुकीसह प्रतिदिन शेकडो टन उसाचे गाळप करणारे गूळ उत्पादन प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.

मोठ्या गूळ प्रकल्पांवर सध्या स्वतंत्र नियंत्रण नाही

साखर कारखान्यांप्रमाणे मोठ्या गूळ उत्पादन प्रकल्पांच्या कामकाजावर सध्या स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था नाही. त्यामुळे ऊस खरेदीची पद्धत, शेतकऱ्यांना मिळणारा दर, उत्पादन प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि इतर औद्योगिक नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रस्तावित कायद्यानुसार दररोज २५ टन किंवा त्यापेक्षा अधिक ऊस गाळप क्षमता असलेल्या गूळ उत्पादन प्रकल्पांचा कायद्याच्या कक्षेत समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या गूळ प्रकल्पांच्या कामकाजासाठी स्वतंत्र नियम आणि नियंत्रण व्यवस्था निर्माण होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

शासनाच्या सूचनांनुसार मसुद्यात बदल

साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या मसुद्यावर शासनस्तरावर विचार करण्यात आला आहे. काही तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्याची तसेच अधिक चर्चा करण्याची गरज असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांशी चर्चा करून मसुद्यात आवश्यक बदल केले जाणार आहेत.

याबाबत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, गूळ उद्योगासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा शासनाला पाठविण्यात आला होता. शासनाकडून काही दुरुस्त्या व बदल सुचविण्यात आले आहेत. त्यावर संबंधितांशी चर्चा करून आवश्यक बदल करण्यात येतील. यासंदर्भात या आठवड्यात बैठक होणार असून, त्यानंतर सुधारित मसुदा शासनाला सादर केला जाईल.

शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या गूळ उत्पादन प्रकल्पांना अधिक स्पष्ट नियम, नियंत्रण आणि नियमनाच्या चौकटीत आणले जाण्याची शक्यता आहे.