अंबाजोगाई घरफोडी प्रकरण उघड; सराईत गुन्हेगारासह तीन जण ताब्यात

बीड — अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले असून, सराईत गुन्हेगारासह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील प्रभाकर रघुनाथ मुंडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. 13 मे 2026 ते 18 मे 2026 दरम्यान घडलेल्या या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी 19 मे रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 182/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305, 331(3) आणि 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, 27 मे रोजी एलसीबीच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर घरफोडीचा गुन्हा अंबाजोगाईतील सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे (रा. सैनिक कॉलनी, मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) आणि त्याच्या दोन साथीदारांनी केला आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर चोरीस गेलेल्या मालापैकी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 1.50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी शरद जोगदंड तसेच एलसीबी आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles