काळाबाजार करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी
बीड — जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या गंभीर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच अत्यावश्यक सेवा मोठ्या अडचणीत सापडल्या असून, या पार्श्वभूमीवर आ. संदीप क्षीरसागर यांनी आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतसविस्तर निवेदन दिले. इंधनाचा सुरळीत पुरवठा, पेट्रोल पंपांवरील काळाबाजार रोखणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी
उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सध्या जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी इंधन साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आ.क्षीरसागर यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलून नागरिकांना नियमित व सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली. विशेषतः शेतकरी वर्ग सध्या शेतीच्या महत्त्वाच्च्या कामांमध्ये व्यस्त असून, ट्रॅक्टर, पंप व शेतीच्या यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना वेळेत इंधन मिळाले नाही तर शेतीची मोठी हानी होऊ शकते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यावेळी पेट्रोल पंप चालकांकडून होत असलेल्या काळाबाजाराचाही मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला. काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने इंधन विक्री केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संकटाच्या काळात जनतेची अडवणूक करणाऱ्यांना प्रशासनाने कोणतीही सवलत देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच रुग्णवाहिकांना विनाविलंब पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत आ.क्षीरसागर यांनी विशेष लक्ष वेधले. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांना अनेक ठिकाणी इंधनासाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अडवणूक न करता रुग्णवाहिकांना तातडीने इंधन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

