चौसाळा — जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून लोकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आपल्याला संधी आहे असे प्रतिपादन चौसाळा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास भिलारे यांनी व्यक्त केले. कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर भिलारे म्हणाले की लोकसंख्या वाढ ही विकसनशील राष्ट्रांमधील फार मोठी समस्या आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे उपस्थित होते. भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर वनवे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात विशद केले . अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. पंडित खाकरे म्हणाले की कुटुंब नियोजनाचे महत्त्व,लैंगिक समानता, गरीब मातांचे आरोग्य, आणि मानवाधिकार यासारख्या विविध लोकसंख्याविषयक समस्या बद्दल जागृती निर्माण करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चव्हाण सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

