गेवराई (बीड) — बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत गेवराई तालुक्यातील जातेगाव येथून ₹7 लाख 75 हजार 540 किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. हा गुटखा शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अंकुश वरपे , पोलीस हवालदार गोविंद राख , पोलीस अंमलदार बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे हे उपविभाग गेवराई हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जातेगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील एका इसमाने आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ छापा टाकला. छाप्यामध्ये जातेगाव शिवारातील ‘मळा’ येथील शेतातील ऊसाच्या पिकामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यामधून विविध कंपन्यांचा ₹7,75,540 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अमोल महादेवराव धोंडरे (वय 30, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 218/2026 नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274 आणि 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अंकुश वरपे, पोलीस हवालदार गोविंद राख, पोलीस अंमलदार बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

