बीड — जायकवाडी धरणातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लोकल आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.२९ रोजी जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात शेतकरी, शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांविषयी संवेदना असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.
डॉ. ढवळे म्हणाले की, दुष्काळाचे सावट असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील नेते टाळाटाळ करत आहेत. मराठवाडा, विशेषतः बीड जिल्हा, सिंचनाच्या मोठ्या अनुशेषाला सामोरे जात आहे.

कोकणातील १६८ टीएमसी अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन असून, हे काम नियोजित वेळेत पूर्ण करून बीड जिल्ह्यातील शेतीला पाणी मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच गोदावरी–सिंदफणा नदीजोड प्रकल्प तातडीने राबवून त्यासाठी सर्व्हे करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच कोकणातून येणाऱ्या १६८ टीएमसी पाण्यातून बीड जिल्ह्याला किती पाणी देता येईल, याचा स्वतंत्र सर्व्हे करावा. गेवराई तालुक्यातून जाणारा उजवा कालवा आणि माजलगाव धरणातून जायकवाडी धरणाला मिळणारे पाणी पूर्ववत करण्यात यावे, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.
या सर्व मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले आहे.

