नवी दिल्ली — NEET पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या सोशल मीडिया चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी ते 6 जून रोजी भारतात परतणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे दिली.

देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांचा ‘कॉकरोच’ असा उल्लेख केल्याचा दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर या शब्दावरून प्रेरित होऊन ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ नावाची ऑनलाइन चळवळ सुरू झाली. अल्पावधीतच या चळवळीला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

अभिजीत दिपके यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात नागरिकांना संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, 6 जून रोजी दिल्ली विमानतळावर आगमनानंतर समर्थकांसह जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्याच्या उद्देशाने पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे मोर्चा काढण्यात येणार आहे.
दिपके यांनी असेही म्हटले की, भारतात परतल्यानंतर विमानतळावरच अटक होण्याची भीती त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना वाटत आहे. मात्र भारत हे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने CJP च्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) खात्याच्या पुनर्सक्रियतेबाबत कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांतच ही घोषणा करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये बोलताना दिपके यांनी सांगितले की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ते सातत्याने आवाज उठवत आहेत. तसेच विविध परीक्षा प्रक्रियांमधील कथित गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या दाव्यानुसार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावरही लाखो नागरिक या मोहिमेच्या समर्थनार्थ सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले.
लखनऊ, जयपूर आणि महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये या मुद्द्यावरून निदर्शने होत असल्याचा दावा करताना दिपके यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भावना दुर्लक्षित केल्याचा आरोप केला. देशभरातील 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ झाला असल्याचा दावा त्यांनी केला असून, यामध्ये NEET, CBSE, CUET आणि SSC-GD परीक्षांशी संबंधित उमेदवारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी प्रस्तावित आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

